
सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेससोबत (NCP) गेल्यास शिवसेना (Shivsena) संपणार, याची कुणकुण मला आधीपासूनच होती. त्याबाबत खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना फोन करून कल्पनाही दिली होती; परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. ती भीती आज सत्यात उतरली, अशी आठवण शिंदे गटाचे नेते ब्रिगेडियर सुधीर सावंत (Sudhir Sawant) यांनी सांगितली. (I gave the idea to Uddhav Thackeray that Shiv Sena will end if he goes with NCP : Sudhir Sawant)
सावंत यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेनेबाबत उद्धव ठाकरेंशी झालेल्या बोलणीसंदर्भात सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यासाठी केलेले काम आणि त्यांची कामाची पद्धत लक्षात घेता २०२४ ला सुद्धा तेच मुख्यमंत्री असतील. जनता त्यांना पुन्हा एकदा स्वीकारेल, असा दावाही सावंत यांनी केला.
ते म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात मी दादागिरी विरोधात लढलो. मला दादागिरीचे राजकारण आवडत नाही. त्यामुळे शिवसेना म्हणून अधिकृत नाव आणि चिन्ह मिळाले असले तरी जिल्ह्यात दादागिरी करून काहीच मिळविणार नाही. त्यामुळे सच्चा शिवसैनिकांनी आता खऱ्या शिवसेनेत यावे.
सावंत म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शिंदे यांनी चांगले काम केले. अनेक धडाकेबाज निर्णय घेतले. त्यामुळे त्यांच्याबद्दल जनमानसात चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे. वसंतदादा पाटील यांच्यानंतर चांगला मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाचा निकालसुध्दा आता शिंदे गटाच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे आता आम्हीच खरे शिवसैनिक आहोत. काही झाले तरी आता शिंदेंना मुख्यमंत्रिपदावरून कोणी हटवू शकत नाही. पुढच्या निवडणुकीनंतर सुध्दा तेच मुख्यमंत्री असतील.
शिवसेना म्हणून अधिकृत नाव आणि पक्ष चिन्ह मिळाल्यानंतर अनेक शिवसैनिक तसेच अन्य पक्षांतील कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. नारुर-हिर्लोक येथे सोमवारी मोठे प्रवेश झाले. आता जिल्ह्यात अन्य ठिकाणी सुध्दा मोठ्या प्रमाणात शिवसैनिक प्रवेश करणार आहेत. त्यामुळे भविष्यात सिंधुदुर्गात पक्ष संघटना बळकट झालेली दिसेल. अनेक कार्यकर्ते शिवसेनेच्या वाटेवर आहेत. जिल्ह्यातील दहशतवाद अजून संपलेला नाही. आपण कालही दशहतवादाच्या विरोधात होतो आणि यानंतरची लढाई सुध्दा त्याच दिशेने असणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.