Dombivali : शिवसेना विरुद्ध शिंदे समर्थक भिडले, ठाकरेंशेजारी शिंदेंचा फोटो लागलाच!

Eknath Shinde यांचा बालेकिल्ला असलेल्या शहरात मोठी रस्सीखेच
Shiv sena Vs Shinde Dombiwali
Shiv sena Vs Shinde Dombiwali sarkarnama

डोंबिवली : ठाणे, कल्याण-डोंबवली या शहरांत शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या गटात संघर्ष होणे अपेक्षित होते. डोंबविली येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत हा संघर्ष उडालाच. या शाखेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे छायाचित्र लावण्यासाठी शिंदे समर्थक मोठ्या संख्येने आला. शिंदे समर्थकांनी जोरदार दबाव टाकत शिंदे यांचा फोटो उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्राशेजारी लावण्यात अखेरीस यश मिळवले. त्यावरून दोन्ही गटात हमरीतुमरी झाली. पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. मात्र शिंदे समर्थक मोठ्या संख्येने असल्याने त्यांचेही फारसे काही चालले नाही.

मुख्य कार्यालयात श्रीकांत शिंदे यांचे छायाचित्र लावण्यास मात्र शिवसैनिकांना जोरदार विरोध केला. या मध्यवर्ती कार्यालयातच श्रीकांत शिंदे यांचे संपर्क कार्यालय शेजारच्या खोलीत आहे. तेथे ते लावावे का, यावरून दोन्ही गटांत नंतर बोलणी सुरू झाली. ..

डोंबिवलीतील राजकीय वातावरण चिघळणार

शिवसेना कोणाची यावरुन शिंदे गट व ठाकरे गट यांच्यातील राजकीय वाद चिघळत चालला आहे, त्याचे प्रत्यत आज दिसून आले. 8 ऑगस्ट पर्यंत शेवटची मुदत असल्याने सभासद नोंदणीसाठी मोठ्या हालचाली शहरात सुरु आहेत.

शिवसेेनेचे डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर यांची अटक आणी जामीनावर सुटका यानंतर आता शिवसेना सभासद नोंदणी कार्यक्रमावरुन वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सभासद नोंदणीच्या जाहीर कार्यक्रमाची सूचना शिंदे गटाने केल्यानंतर ठाकरे समर्थक गटाने शिवसैनिकांना कोणत्या गटाचा फॉर्म तुम्ही भरत आहात याची पडताळणी करा, असे बजावले आहे. बाळासाहेबांच्या नावे जनमानसांत संभ्रम निर्माण केला जात असल्याचे सांगत कार्यकर्त्यांना भावनिक साद घालत नोंदणी फॉर्म कोणाचे भरता याकडे कटाक्षाने लक्ष द्या असे आवाहन केले आहे.

शिवसेना कोणाची यावरुन सध्या ठाणे जिल्ह्यात ठाकरे समर्थक व शिंदे समर्थक जोरदार प्रयत्न करत आहेत. ठाणे जिल्ह्यात शिंदे यांचा पगडा जास्त असल्याने ठाकरे समर्थकांकडून शिवसेना पक्षाची ताकद येथे वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाढदिवसाच्या दिवशी पक्षातील कार्यकर्त्यांना भावनिक साद घालत प्रतिज्ञापत्र लिहून देण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर शिंदे गटानेही कार्यकर्त्यांकडून शपथपत्र लिहून घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर सभासद नोंदणीसाठी सध्या जोरदार प्रयत्न केले जात आहेत. यासर्व घडामोडींचे डोंबिवलीत तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत.

सभासद नोंदणीवरुन वाद होऊन शिवसेनेचे डोंबिवली शहर प्रमुख खामकर यांना पोलिस कोठडीची हवा खावी लागली होती. शिंदे गटाकडून दबाव टाकला गेला तरी आम्ही वाकणार नाही असे यावेळी कट्टर शिवसैनिक व महिला आघाडीने दाखवून दिले. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातर्फे मंगळवारी सायंकाळी डोंबिवलीत सभासद नोंदणीचा भव्य शुभारंभ करण्यात येणार आहे. पूर्वेतील पूर्वेतील सर्वेश हॉल येथे हा कार्यक्रम होणार आहे. जास्तीत जास्त संख्येने कार्यकर्त्यांनी येथे जमून सभासद नोंदणी करावी असे संदेश समाज माध्यमातून व्हायरल होत आहे. याला ठाकरे समर्थक गटाकडून उत्तर दिले जात असून ठाकरे समर्थक गटाने देखील कार्यकर्त्यांना आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. डोंबिवलीतील राजकीय वातावरण चिघळत चालल्यामुळे पोलिसांचा देखील येथे कस लागणार असल्याचे दिसते.

शिंदे गटाकडून व्हायरल होणारा संदेश

हिंदुत्व हा आपला शिवसेनेचा आणि हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा श्वास. आपण सर्व त्या विचाराने प्रेरित होवूनच शिवसेनेस भरघोस मतदान करीत आलेलो आहोत.त्याच शिवसेनेच्या हिंदुत्वाचा जाज्वल विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब हा वसा घेवून पुढे निघाले आहेत आणि त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. डोंबिवली विधानसभा आणि कल्याण ग्रामीण विधानसभा येथील शिवसेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी , नगरसेवक , नगरसेविका, विभागप्रमुख , उपविभागप्रमुख , शाखाप्रमुख , गटप्रमुख , युवा व युवती सेना आणि महिला आघाडी व समस्त शिवसैनिक यांनी त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपणही कटिबद्ध होऊ या आणि सभासद नोंदणी करून शिवसेनेचे हिंदुत्वाचे विचार सर्वदूर पसरवू या आणि सभासद नोंदणी कार्यक्रमास उपस्थित राहून हिंदुत्ववादी शिवसेनेचे सभासद व्हा, असा मेसेज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.

ठाकरे समर्थकांकडून व्हायरल होणारा संदेश

तर याला उत्तर देण्यासाठी शिवसेने कडून "शिवसेना पक्षाची प्राथमिक सदस्य नोंदणी 19 जून 2022 पासून चालू झालेली आहे. त्या सदस्य फॉर्म "A' वर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे,पक्षप्रमुख मा.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांचा फोटो असलेला फॉर्म आहे,परंतु काही समर्थक शिवसेनेच्या नावाने सदस्य नोंदणी 2 ऑगस्ट 2022 रोजी चालू करणार आहेत,परंतु सदर नोंदणी शिंदे समर्थकांची असून कोणताही पक्ष नसताना बाळासाहेबांचे नाव घेऊन जन माणसात संभ्रम निर्माण करून नोंदणी करू पहात आहेत.परंतु सुज्ञ नागरिकांना आणि शिवसैनिकांना विनंती आहे की,अश्या प्रकारच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका.शिवसेना एकच आहे ती फक्त बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे यांचीच" असा मेसेज केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in