भास्कर जाधवांनी अजितदादांसमोर शब्द दिला आणि शिवसैनिक बिथरले...

भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या वक्तव्यामुळे चिपळूणमधील राजकीय वातावरण तापले आहे
भास्कर जाधवांनी अजितदादांसमोर शब्द दिला आणि शिवसैनिक बिथरले...
Bhaskar Jadhav, Ajit Pawarsarkarnama

चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार शेखर निकम (Shekhar Nikam) यांच्यामागे खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी दिली. त्याची गंभीर दखल माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या समर्थकांनी घेतली. चव्हाण यांच्या समर्थनासाठी त्यांचे कार्यकर्ते पुढे आले आहेत. कोणी कितीही पंख छाटले तरी चव्हाण पुन्हा उभारी घेतील, अशा प्रकारचे संदेश सोशल मीडियावर (social media) पाठवले जात आहेत. त्यामुळे जाधव यांचे वक्तव्य सदानंद चव्हाण समर्थकाना झोंबल्याचे दिसत आहे.

खरवते येथे सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) चिपळूणच्या दौऱ्यावर आले होते. या वेळी आमदार जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना यापुढे मी शेखर निकम यांच्यामागे खंबीरपणे उभा आहे, असे सांगितले. त्यांच्या या वाक्याचा आता लोक सोयीनुसार अर्थ काढू लागले आहे तर काहींना याची भीतीही वाटत आहे.

Bhaskar Jadhav, Ajit Pawar
दिल्लीप्रमाणे राज्यातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न : पवारांचा गंभीर आरोप

अजित पवार यांच्या साक्षीने जाधव यांनी आमदार निकम यांच्याशी मैत्री करण्यासाठी हात पुढे केला. यातून जाधव यांनी पवार यांचाही विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. जाधव जे बोलतात ते करून दाखवतात, याचा अनेकांना अनुभव असल्यामुळे ते आता खरच शेखर निकम यांच्यामागे उभे राहिले तर चिपळूणमधील शिवसेनेचे भवितव्य काय, असा प्रश्न जाधव समर्थक विचारत आहेत. जाधव गुहागर विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करत असले तरी चिपळूणमध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांची मते विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरतात. ही मते जरी शेखर निकम यांच्या मागे उभी राहिली तरी निकम यांना निवडणूक जिंकण्यासाठी गावोगावी आणि वाडीवाडीवर फिरण्याची गरज नाही.

निकम यांना साथ देण्याची भूमिका जाधव यांनी घेतल्यामुळे त्याचा परिणाम चिपळूणमधील चव्हाण समर्थकांवर झाला. कोणी कितीही माझे पंख छाटले तरी मी पुन्हा उभारी घेईन, मला पाडू शकेल, अशी भिंत अजून तयार झालेली नाही, अशा प्रकारचे संदेश सोशल मीडियावरून पाठवले जात आहेत. त्यावर बाळासाहेब ठाकरे आणि चव्हाण यांचे फोटो आहेत. चव्हाण आणि जाधव यांचे काही दिवसांपूर्वी बिनसले. सावर्डे परिसरात दोघांनी वेगवेगळ्या सभा घेऊन एकमेकांवर अप्रत्यक्ष टीका केली होती. चव्हाण चिपळूणमधून पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे जाधवांच्या वाक्याचा चव्हाण समर्थकांनी योग्य तो अर्थ काढल्याचे सांगितले जात आहे.

Bhaskar Jadhav, Ajit Pawar
ठाकरेंनी सुरूवात केली अन् अन्य राज्येही पंतप्रधान मोदींवर तुटून पडली!

मागील विधानसभा निवडणुकीत चव्हाण यांचा पराभव झाल्यानंतर चिपळूण तालुक्यातील शिवसेनेत मरगळ आलेली आहे. ती दूर करण्यासाठी आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूणमध्ये लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. मात्र, जाधव अजूनही चिपळूणमध्ये सक्रिय झाले नाहीत. शेखर निकम मतदार संघात मजबूत बांधणी करत असताना जाधव हेच त्यांच्यासमोर आव्हान उभे करू शकतात असा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे. परंतु जाधव यांना चिपळूणमध्ये का सक्रिय करून घेतले जात नाही, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.