निष्ठावंत नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भाजप आमदार चव्हाण म्हणाले...

चव्हाण आणि पाटील यांची मैत्री कायम असल्याचे बोलले जात असले तरी आमदार चव्हाण हे पाटील यांची पक्षाविषयीची नाराजी दूर करण्यात अपयशी ठरले आहेत.
Ravindra Chavan-Mahesh Patil
Ravindra Chavan-Mahesh PatilSarkarnama

डोंबिवली : भारतीय जनता पक्षाचे आमदार रवींद्र चव्हाण (ravindra chavan) यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे महेश पाटील (Mahesh patil) यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या अचानक पक्ष सोडण्याने आमदार चव्हाण यांना देखील धक्का बसला असून आम्ही कुठे तरी कमी पडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. तर महेश पाटील यांनीदेखील चव्हाण हे जुने मित्र असून आमची मैत्री आजही कायम असल्याचे सांगितले. चव्हाण आणि पाटील यांची मैत्री कायम असल्याचे बोलले जात असले तरी आमदार चव्हाण हे पाटील यांची पक्षाविषयीची नाराजी दूर करण्यात अपयशी ठरले आहेत. (After entry of loyal corporators in ShivSena, BJP MLA Ravindra Chavan said....)

भारतीय जनता पक्षातील आक्रमक चेहरा, आमदारकीचे प्रबळ दावेदार, ग्रामीण भागात भाजपचे प्रस्थ वाढविणारे अशी महेश पाटील ओळख होती. भाजप आमदार चव्हाण यांचे ते खंदे समर्थक समजले जात होते. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर ते पक्षात अधिक आक्रमकतेने काम करीत होते. शिवसेनेचे भाऊ चौधरी यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांच्या प्रतिमेची गाढवावरुन प्रतिकात्मक धिंड काढली होती. त्यानंतर भाजपचे डोंबिवली ग्रामीणचे अध्यक्ष माजी नगरसेवक महेश पाटील यांनी चौधरींच्या तोंडाला काळे फासले होते. भाऊ चौधरी हे मित्र असून देखील पक्षाला महत्व देत पाटील यांनी चौधरी यांच्या तोंडाला काळे फसले होते. त्यानंतर त्यांच्या प्रभागात भाजपची ताकद वाढली आणि शिवसेनेचे महत्व कमी झाले.

त्यांना एका गुन्ह्यात अटक होऊन ते कारागृहामध्ये गेले होते. तीन वर्षे न्यायालयीन कोठडीत घालवल्यानंतर आता त्यांची जामिनीवर सुटका झाली आहे. पाटील यांना जामीन मिळू नये, यासाठी काही राजकीय मंडळी जोर लावत असल्याची त्यावेळी चर्चा होती. पक्षातील पदाधिकाऱ्यांचा विरोध आणि जवळच्या लोकांकडून न होणारे सहकार्य यामुळे पाटील नाराज असून ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्यांची सुटका झाल्यानंतर समर्थकांनी झळकावलेल्या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा फोटो झळकला होता. यावरून त्यांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित झाला होता. त्यावर अखेर सोमवारी (ता. २२ नोव्हेंबर) शिक्कामोर्तब झाले.

आमदार चव्हाण म्हणाले, नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशावर प्रसिद्धी माध्यमांकडून ही गोष्ट कळली. एवढी वर्षे ज्यांनी पक्षात काम केले असे काम करणारे कार्यकर्ते सोडून जातात. त्यावेळी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दुःख होते. आम्ही कुठे तरी कमी पडलो असे वाटते. ते पक्ष का सोडून गेले हे त्यांनाच माहीत, त्यांना शुभेच्छा असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

प्रवेश सोहळ्यात बोलताना महेश पाटील हे भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असे बोलल्याने सर्वांच्या नजरा वळल्या. पाटील यांनी लगेच सवय झाली असल्याचे सांगत वेळ मारून नेली. त्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला असता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्वसमावेशक काम आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची समानतेची वागणूक, कामाची पद्धत यामुळे आपण शिवसेनेत प्रवेश केला. रवींद्र चव्हाण हे जुने मित्र असून मैत्री कायम राहील. मैत्री व राजकारण वेगळे असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com