
Water Demand by karnataka : कर्नाटकमधील काही जिल्हात पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटकमधील कृष्णा नदीपात्र कोरडा पडू लागल्याने सीमेवरील गावे तहानलेली आहेत. त्यामुळे पाण्यासाठी कर्नाटकला महाराष्ट्राकडे साकडं घालावं लागत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कोयना धरणातून कृष्णा नदीत अतिरिक्त तीन टीएमसी पाणी सोडण्याची विनंती करणारे पत्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे.
जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठी असणाऱ्या गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लोकांना आणि जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे.कर्नाटकातील उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये तीव्र उन्हाळी परिस्थिती अजूनही कायम आहे. मानव आणि पशुधनांना घरगुती वापरासाठी पाण्याची गरज भासत आहे. उत्तर कर्नाटक भागात अद्याप मान्सून सुरू झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्राने तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी या अर्जात केली आहे.
महाराष्ट्राकडून दरवर्षी बेळगाव आणि बागलकोट जिल्ह्यातील सीमावर्तीय गावांना मानवतेच्या दृष्टिकोनातून पाणी दिले जाते. बेळगाव सीमाप्रश्नावरुन दोन्ही राज्यात वारंवार वाद निर्माण होत असतो. मध्यंतरी कोयनेची उंची देखील वाढविण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारकडून झाला. तसे झाल्यास त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील सांगलीला बसू शकतो. त्यामुळे महाराष्ट्राचा त्याला विरोध आहे. कृष्णा नदीचा पाणीसाठा हा दोन्ही राज्याच्या परस्पर संमतीने सुरक्षित ठेवला जातो. उन्हाळ्यात कर्नाटकाला गरज भासल्यास महाराष्ट्र कृष्णेचे पाणी कर्नाटकाला देते. आता देखील बेळगाव आणि बागलकोट जिल्ह्यात पाणीटंचाई असून, कर्नाटकाला आता ही पाण्याची गरज भागविण्यासाठी महाराष्ट्राला साकडे घालावे लागणार आहे.
Edited by: Rashmi Mane