अमली पदार्थाबाबत गृहमंत्री वळसे पाटलांनी घेतला महत्वाचा निर्णय
Dilip Walse Patilsarkarnama

अमली पदार्थाबाबत गृहमंत्री वळसे पाटलांनी घेतला महत्वाचा निर्णय

पोलिस, उद्योग आणि अन्न व औषध प्रशासन विभागांनी संयुक्तपणे कारवाई करण्यासाठी समिती स्थापन करण्याच्या सूचना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मुंबई : नशा येणाऱ्या पदार्थांची विक्री ऑनलाइन मार्केटिंगच्या माध्यमातून होत असल्याच्या तक्रारी राज्यात वाढत आहेत. सद्यस्थितीत बंद असलेल्या कारखान्यांचा अमली पदार्थाच्या उत्पादनासाठी वापर केला जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. अशा सर्व ठिकाणी पोलिस, उद्योग आणि अन्न व औषध प्रशासन विभागांनी संयुक्तपणे कारवाई करण्यासाठी समिती स्थापन करण्याच्या सूचना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

राज्यातील व विशेषतः मुंबईतील अमली पदार्थ विरोधी कारवाईचा आढावा काल मंत्रालयात आयोजित बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी घेतला. या बैठकीला अपर मुख्य सचिव गृह मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव अपील व सुरक्षा आनंद लिमये, पोलिस महासंचालक संजय पांडे (Sanjay Pandey), मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagarale), अपर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था राजेंद्र सिंग, विनीत अग्रवाल, सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील, मिलिंद भारंबे उपस्थित होते.

Dilip Walse Patil
आयकर विभागाचे धाडसत्र दुसऱ्या दिवशीही सुरुच

राज्यात अमली पदार्थांच्या वाढत्या व्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी गृह विभागाने कठोर धोरण स्वीकारले असून अमली पदार्थांविरोधात कारवाईसाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलिस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली अमली पदार्थ विरोधी कक्ष निर्माण करण्याचे निर्देश यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

सद्यस्थितीत राज्यात अमली पदार्थांची वाढती आवक आणि सेवन हा चिंतेचा विषय बनला आहे. नशेच्या अमलाखाली असल्याने गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढत आहे. हे सर्व पोलिस विभागाने गांभीर्याने घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम निश्चित करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले. पोलिस यंत्रणेने अमली पदार्थ प्रकरणी कारवाई करताना सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. या व्यवहारात गुंतलेल्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात यावी, राज्यातील वाढत्या अमली पदार्थाच्या वापरावर सक्तीने नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी दक्ष रहावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

अलीकडच्या काळात शाळकरी मुले व युवा वर्गात अमली पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढले आहे. अमली पदार्थ म्हणून काही औषधी द्रव्याच्या वापर होत आहे. या विक्रीवर निर्बंध आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना अन्न व औषध विभागाच्या सहकार्याने निश्चित करण्यात याव्यात, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.