सदावर्तेंची घरी जाण्यासाठी धडपड; एकाचवेळी ४ न्यायालयांमध्ये जामिनावर सुनावणी

Gunratna Sadavrte | कोल्हापुरनंतर अकोला आणि पुणे पोलिसांना ताबा मिळण्याची शक्यता, बीड, सोलापूर पोलिसांच्याही रडारवर
सदावर्तेंची घरी जाण्यासाठी धडपड; एकाचवेळी ४ न्यायालयांमध्ये जामिनावर सुनावणी
Gunratna Sadavrte Sarkarnama

मुंबई : सिल्वर ओक हल्ल्याला चिथावणी देणे, एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा करणे, मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान भडखाऊ वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण करणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणे अशा विविध आरोपांमुळे अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavrte) यांच्यामागे महाराष्ट्रभरातील पोलिसांचा ससेमिरा लागला आहे. यापूर्वी त्यांना यातील आरोपांमुळे मुंबई (Mumbai Police) आणि सातारा पोलिसांनी (Satara Police) ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता सदावर्तेंचा ताबा मिळवण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आले आहे.

आज साताऱ्यात जामिन मिळवल्यानंतर आणि मुंबईत न्यायालयीन कोठडी कायम ठेवण्यात आल्यानंतर कोल्हापूर आणि अकोला पोलिसांनी मुंबई न्यायालयात सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी दावा केला. मात्र यात कोल्हापूर पोलिसांचा दावा पहिल्यांदा आल्यामुळे सदावर्ते यांची आजची रात्र कोल्हापुरमध्ये जाणार आहे. कोल्हापूर पोलिसांकडून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, आजच त्यांना आर्थर रोड कारागृहातून घेवून पोलिस कोल्हापुरकडे रवाना झाले आहेत. कोल्हापुरमध्ये सदावर्ते यांना जामिन किंवा न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतरच त्यांना अकोला पोलिस ताब्यात घेणार आहेत.

Gunratna Sadavrte
सदावर्तेंना सातारा न्यायालयाकडून जामीन मंजूर

दरम्यान सदावर्ते यांनी कोल्हापूर आणि अकोला न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. कोल्हापूरमध्ये काल सुनावणी पार पडली. मात्र आवश्यक कागदपत्रे न उपलब्ध झाल्याने कालची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या अर्जावर आता गुरुवारी सुनावणी होणार आहे. तर अकोला सत्र न्यायालयात देखील सदावर्ते यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. यावर आज सुनावणी पार पडली. मात्र ही सुनावणी शुक्रवार पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. याशिवाय मुंबई पोलिसांनीही आज सदावर्तेंच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. मात्र त्यांची न्यायालयीन कोठडी कायम ठेवण्यात आली आहे.

Gunratna Sadavrte
सदावर्ते अडकताच त्यांच्या पत्नी जयश्री पाटील गायब; पोलीस संरक्षणही सोडलं!

मुंबई सत्र न्यायालयाने न्यायलयीन कोठडी कायम ठेवल्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. यावर उद्या सुनावणी होणार आहे. याशिवाय बीडमध्ये दाखल गुन्हाच्या पार्श्वभूमीवर सदावर्तेंच्या वतीने आज संध्याकाळी बीड सत्र न्यायालयात देखील अंतरिम जामीन मिळावा यासाठी अर्ज केला आहे. यावर २२ तारखेला सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता सदावर्ते यांना नेमके कधी घरी जायला मिळणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.