भाजपला अडचणीत आणणारं भाषण पाहताच राज्यपाल थेट सभागृहातून बाहेर?

Mahavikas Aaghadi | Governor Bhagatsingh Koshyari | BJP : वाचा ७२ मुद्द्यांचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे सविस्तर अभिभाषण
Bhagat Singh Koshyari controversial statements |Maharashtra assembly budget 2022
Bhagat Singh Koshyari controversial statements |Maharashtra assembly budget 2022sarkarnama

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय (Maharashtra assembly budget session 2022) अधिवेशनाला आजपासून (गुरूवार) सुरूवात झाली. मात्र आजचा पहिलाच दिवस प्रचंड वादळी ठरला. भाजपने अधिवेशन सुरु होण्यापूर्वी सभागृहाच्या आवारात आणि त्यानंतर सभागृहाच्या आतमध्ये मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी मोठा गदारोळ केला. तर सत्ताधारी महाविकास आघाडीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन निषेध आंदोलन केले.

मात्र हाच सगळा गोंधळा राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान देखील सुरु राहिल्याने काही मिनिटांतच भाषण थांबवून कोश्यारी सभागृहातून निघून गेले. ज्यावेळी अभिभाषण करण्यासाठी राज्यपाल कोश्यारी उभे राहिले तेव्हा सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे सभागृहात मोठा गोंधळ झाला. तेव्हा कोश्यारी यांनी आपले भाषण थांबवले आणि राष्ट्रगीत होण्यापूर्वीच सभागृहातून काढता पाय घेतला. मात्र राज्यपालांनी गोंधळामुळे नाही तर भाजपला अडचणीत आणणारं भाषण असल्यामुळे सभागृहातून काढता पाय घेतला अशा चर्चा आजच्या दिवसाचे कामकाज स्थगित झाल्यानंतर सुरु झाल्या.

राज्यपाल कोश्यारी यांच्या अभिभाषणात बंगळूरमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा विटंबना झाल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला होता. याशिवाय बेळगावमध्ये मराठी भाषिक जनतेवर कर्नाटक शासनाने दडपशाही केलेल्या कृत्य याचा उल्लेख निंदनीय असा होता. कर्नाटक राज्यात सध्या भाजपची सत्ता असल्यामुळे भाजपला चांगल्याच अडचणीत तयार झाल्या असत्या. त्यामुळेच राज्यपालांनी भाषण वाचणे टाळले अशी चर्चा सभागृहाच्या आवारात सुरू होती. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यपाल कोश्यारी यांना तुम्ही महाराष्ट्राचे राज्यपाल की कर्नाटकचे राज्यपाल असा सवाल विचारला आहे.

Bhagat Singh Koshyari controversial statements |Maharashtra assembly budget 2022
भाषण न करता राज्यपाल निघून गेले ; 'शिवाजी महाराज की जय' घोषणांनी सभागृह दणाणले

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अभिभाषणात नेमके काय होते?

सभापती महोदय, अध्यक्ष महाराज व राज्य विधानमंडळाचे सन्माननीय सदस्यहो,

1. राज्य विधानमंडळाच्या, 2022 या वर्षातील पहिल्या अधिवेशनात आपणा सर्वांचे स्वागत करताना, मला अतिशय आनंद होत आहे.

2. माझे शासन, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महान द्रष्टे व समाजसुधारक यांसारख्या महान व्यक्तींनी घालून दिलेल्या उच्च आदर्शांचे सतत अनुसरण करीत आहे.

3. माझ्या शासनाचा, महाराष्ट्राच्या सीमावर्ती क्षेत्रातील मराठी भाषिक जनतेच्या हक्कांसाठी उभे राहण्याचा निर्धार आहे. 16 डिसेंबर, 2021 रोजी बेंगळुरूमध्ये झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा आणि बेळगाव मधील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर शाई फेकल्याच्या कृत्याचा माझे शासन तीव्र निषेध करीत आहे. विवादग्रस्त सीमावर्ती क्षेत्रातील मराठी भाषिक जनतेवर कर्नाटक शासनाने केलेली दडपशाहीची कृत्ये निंदनीय आहेत.

4. राज्य, गेल्या दोन वर्षांपासून कोविड-19 या सार्वत्रिक साथरोगाशी लढा देत आहे. आपले आप्तस्वकीय गमावलेल्या व्यक्तींप्रती, मी मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि या सार्वत्रिक साथरोगाचा मुकाबला करण्यासाठी मदत केलेल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या व आघाडीवरील कोरोना योद्धयांच्या शौर्याला व निःस्वार्थ सेवेला मी वंदन करतो.

5. आतापर्यंत, महाराष्ट्राने, कोविड-19 संसर्गांच्या तीन लाटांचा सामना केला आहे. राज्यात आलेली दुसरी लाट ही, पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक तीव्र होती. राज्यात, मार्च ते जून 2021 या कालावधीत, जवळपास 40 लाख इतके कोविड-19 नवीन रुग्ण आढळून आले. ही लाट सर्वोच्च पातळीवर असताना, महाराष्ट्रात दररोज 65,000 हून अधिक नवीन संक्रमित रुग्ण आढळून येत होते. सर्वोच्च सक्रिय रुग्ण संख्या, सुमारे 7 लाख इतकी होती.

6. माझे शासन, ऑगस्ट व सप्टेंबर 2020 मधील संसर्गाच्या पहिल्या लाटेनंतर संपूर्ण तयारीत होते. परिणामी, जेव्हा पुढची लाट मार्च ते जून 2021 दरम्यान राज्यात आली तेव्हा, 6500 सुविधा केंद्रांमध्ये, 4 लाख 50 हजार विलगीकरण खाटा, 40,000 आयसीयु खाटा, 1 लाख 35 हजार ऑक्सिजन खाटा व 15,000 हून अधिक व्हेंटिलेटर या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. 600 हून अधिक प्रयोगशाळांमध्ये चाचणी करण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत.

7. वैद्यकीय ऑक्सिजनची उपलब्धता हा, अल्पकालीन अडथळा होता. त्यावेळी, दररोज 1,700 मेट्रिक टन इतकी सर्वाधिक ऑक्सिजनची आवश्यकता असताना, महाराष्ट्र राज्यात केवळ 1,250 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्माण केला जात होता. सुमारे दोन आठवडयांपर्यंत असलेली दररोजची अंदाजे 450 मेट्रिक टन इतकी ऑक्सिजनची तूट, भारतीय हवाई दल व भारतीय रेल्वे यांच्या सहकार्याने दूर केली.

8. राज्याची द्रवरूप ऑक्सिजनची साठवण क्षमता वाढवण्यासाठी माझ्या शासनाने विविध निर्णय घेतले. एप्रिल व मे 2021 मधील तीव्र लाटेतील तीन दिवसांच्या सर्वाधिक मागणी इतकी साठवण क्षमता निर्माण करण्याचा निर्णय घेतला. अतिरिक्त 5,000 मेट्रिक टन साठवण क्षमतेचे नियोजन केले होते. त्यापैकी, 2,700 मेट्रिक टन साठवण क्षमता आधीच तयार करण्यात आली आहे.

9. “मिशन ऑक्सिजन स्वावलंबन” या अंतर्गत, माझ्या शासनाने, ऑक्सिजन उत्पादन प्रोत्साहन धोरण अंमलात आणले आहे. आजमितीस, एकूण 1,870 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून 114 नवीन ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प राज्यात उभारले जात आहेत. यामुळे आपली ऑक्सिजन उत्पादन क्षमता, 1,480 मेट्रिक टनांनी वाढेल आणि यात आपण स्वावलंबी होऊ.

10. महाराष्ट्राने, कोविड-19 मुळे मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या पात्र वारसाला, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, 1,40,000 पेक्षा अधिक प्रकरणांमध्ये, प्रत्येकी 50,000 रुपयांची भरपाई प्रदान केली आहे.

11. जानेवारी 2021 मध्ये, कोविड-19 लसी पहिल्यांदाच उपलब्ध झाल्या तेव्हा, महाराष्ट्र राज्य हे, एका विशिष्ट कालावधीसाठी, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींची सर्वाधिक संख्या असलेले राज्य तसेच लसीकरणाच्या मात्रा दिलेल्या एकूण संख्येच्या बाबतीत आघाडीवर असलेले राज्य होते.

12. आजपर्यंत, महाराष्ट्रातील जवळपास 91 टक्के प्रौढ लोकसंख्येला कोविड-19 लसीची किमान एक मात्रा मिळाली आहे आणि 70 टक्के प्रौढ लोकसंख्येचे संपूर्ण लसीकरण झालेले आहे. 15 ते 18 वर्षे वयोगटातील 57 टक्यांपेक्षा अधिक मुला-मुलींना लसीची पहिली मात्रा मिळाली आहे. आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना, आघाडीवरील कोरोना योद्ध्यांना व 60 वर्षे वयावरील नागरिकांना लस प्रभाववर्धक मात्रा देण्यास देखील सुरुवात झालेली आहे.

13. “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” ही अभिनव आरोग्य तपासणी मोहीम, मागील वर्षापासून राबविण्यात येत आहे. माझ्या शासनाने, लसीकरणाची व्याप्ती आणखी वाढवण्यासाठी अनेक नवनवीन उपाययोजना हाती घेतल्या आहेत. डिसेंबर 2021 मध्ये, “हर घर दस्तक” मोहीम राबविण्यात आली आणि लसीकरण पथकांनी, सुमारे 35,000 गावांना व जवळपास 55 लाख कुटुंबांना भेटी दिल्या. या मोहिमेमध्ये दिलेल्या लसीच्या पहिल्या मात्रेची संख्या 1 कोटी 25 लाखांपेक्षा अधिक आणि लसीच्या दुसऱ्या मात्रेची संख्या 28 लाखांपेक्षा अधिक होती. महाविद्यालयात जाणाऱ्या युवकांसाठी 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2021 या कालावधीत, “युवा स्वास्थ्य” मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत, 1 लाख 8 हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना, महाविद्यालयाच्या परिसरातच कोविड-19 लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

14. कोविड-19 संसर्गाची तिसरी लाट, डिसेंबर 2021 च्या तिसऱ्या आठवड्यात सुरू झाली. पूर्वनियोजन व लसीकरण मोहीम यांमधील राज्याच्या अत्यंत सक्रिय भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या आरोग्य सुविधांवर कोणताही लक्षणीय भार पडला नाही. डिसेंबर 2021 व जानेवारी 2022 या महिन्यांमध्ये राज्यात सुमारे 10 लाख 50 हजार इतक्या कोविड-19 नवीन रुग्णांची नोंद झाली असली तरी, मृत्युचे प्रमाण 0.1 टक्यापेक्षा कमी होते.

15. कोविड-19 नामनिर्देशित शासकीय रुग्णालयांमध्ये, सर्व कोविड-19 रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत. “महात्मा फुले जीवनदायी योजने”अंतर्गत सूचीबद्ध केलेल्या खाजगी रुग्णालयांकरिता, वाजवी दर निश्चित करण्यात आले आहेत. कोविड-19 रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयांबरोबरच, खाजगी रुग्णालयांमध्ये देखील खाटा राखून ठेवण्यात आल्या आहेत. खाजगी रुग्णालयांतील उपचार, प्रयोगशाळा चाचण्या, सीटी स्कॅन, मास्क, इत्यादींचा खर्च, सार्वजनिक हितासाठी विनियमित करण्यात आला आहे.

16. कोविड-19 रुग्णांची काळजी घेताना, आपला जीव गमावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना, “प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत”, प्रत्येकी 50 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे. आतापर्यंत, अशा 195 लाभार्थ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली असून आणखी 64 प्रकरणे सध्या विचाराधीन आहेत.

17. माझ्या शासनाने, कोविड-19 सार्वत्रिक साथरोगामुळे आईवडील गमावलेल्या मुला-मुलींना, 5 लाख रुपयांचे एकरकमी आर्थिक सहाय्य दिले आहे.

18. कोविड-19 सार्वत्रिक साथरोगामुळे पतीचे निधन झालेल्या विधवांना, विद्यमान शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी “वात्सल्य” अभियान सुरू केले आहे.

19. कोविड-19 सार्वत्रिक साथरोगामुळे कुटुंबातील कर्तापुरुष गमावलेल्या ग्रामीण भागातील विधवांना उपजीविकेची सन्मानजनक साधने व रोजगार उपलब्ध होण्याकरिता, माझ्या शासनाने, “वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना” सुरू केली आहे.

20. सार्वत्रिक साथरोगाचा प्रतिबंध करण्यासाठी उत्तम कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना, “कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजने” अंतर्गत, 30 लाख रुपयांपासून 1 कोटी रुपयांपर्यंत पुरस्कार देण्याचे माझ्या शासनाने घोषित केले आहे.

21. माझ्या शासनाने, सार्वत्रिक साथरोगामुळे आर्थिक ताण सहन कराव्या लागलेल्या, राज्यभरातील 56,000 कलाकारांना व 847 संघटनांना 35 कोटी रुपये इतके एकरकमी आर्थिक सहाय्य दिले आहे.

22. माझ्या शासनाने, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुपर स्पेशालिटी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चची स्थापना करण्यास मान्यता दिली असून ही अशा प्रकारची देशातील पहिलीच संस्था आहे. याद्वारे, 17 पदव्युत्तर पदवी व 11 अतिविशेषोपचार पाठ्यक्रम चालविले जातील आणि या ठिकाणी 615 खाटांचे रुग्णालय देखील असेल.

23. महाराष्ट्र राज्याने केलेल्या कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची, माननीय सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय व जागतिक आरोग्य संघटना या स्तरांवर दखल घेण्यात आली असून या संबंधात, मुंबई शहर हे, अन्य शहरांसाठी पथदर्शक शहर ठरले आहे.

24. कोविड-19 सार्वत्रिक साथरोगामुळे आलेल्या आर्थिक मंदीमुळे माझ्या शासनाला आर्थिक निर्णय घेणे अधिक आव्हानात्मक झाले होते. केंद्र सरकारकडून राज्याला 18 फेब्रुवारी 2022 पर्यंत प्रदेय असलेली वस्तू व सेवा कराची 29,942 कोटी रुपयांची नुकसानभरपाई न मिळाल्यामुळे हे आव्हान आणखी तीव्र झाले.

25. तथापि, राज्य शासनाने, ही आर्थिक चणचण असून देखील, आर्थिक कार्ये पुन्हा सुरू करण्याची व्यवस्था केली, औद्योगिक गुंतवणूक आकर्षित केली आणि त्याच वेळी, पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेतला. या कठीण काळात, राज्य शासनाने, समाजातील दुर्बल घटकांचे दु:ख कमी करण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले. राज्यातील जनतेला आर्थिक लाभ व अन्न सुरक्षा देणाऱ्या योजनांवर विशेष भर देण्यात आला.

26. कोविड-19 सार्वत्रिक साथरोगाच्या कालावधीत अर्थव्यवस्थेत मंदी असून देखील, माझ्या शासनाने, “मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0” अंतर्गत, 98 गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या असून त्यामध्ये 1 लाख 89 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा आणि 3 लाख 30 हजार रोजगार निर्मितीचा अंतर्भाव आहे.

27. “माझी वसुंधरा अभियान-एक” या अंतर्गत, माझ्या शासनाने, 21 लाख 94 हजार झाडे लावली आणि 1,650 नवीन हरित क्षेत्रे निर्माण केली. परिणामी, 3 लाख 71 हजार टन कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन कमी होण्यास मदत झाली. “माझी वसुंधरा अभियान-दोन” यास राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून त्याअंतर्गत सुमारे 12,000 नावे नोंदविली आहेत.

28. शालेय मुलां-मुलींमध्ये हवामान बदलाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी, माझे शासन, इयत्ता 1 ली ते 8 वीसाठी पर्यावरण अभ्यासक्रम विकसित करीत आहे.

29. नीती आयोगाने, माझ्या शासनाचे इलेक्ट्रिक वाहन धोरण मान्य केले आहे व त्याची प्रशंसा केली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत, इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीत, 157 टक्क्यांनी वाढ झाली आहे. माझ्या शासनाने, 7,000 इलेक्ट्रिक वाहन मालकांना, त्यांच्या वाहनांची किंमत कमी करून प्रोत्साहन दिले आहे. इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत, आघाडीच्या उद्योगसमूहांकडून 9,000 कोटी रुपयांचे गुंतवणूक प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यातून सुमारे 10,000 रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे.

30. हवामान बदलाच्या प्रभावाशी जुळवून घेण्यासाठी व प्रभाव कमी करण्यासाठी, माझ्या शासनाने, मुख्यंमत्री यांच्या अध्यक्षतेखाली व उप मुख्यमंत्री यांच्या सह-अध्यक्षतेखाली, महाराष्ट्र वातावरणीय बदल परिषदेची स्थापना केली आहे.

31. स्कॉटलंड येथे झालेल्या 26 व्या कॉप परिषदेमध्ये, हवामान बदलाचा सामना करण्याच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांची दखल घेतल्याने, अंडर 2 कोलिशन लीडरशिप अवॉर्ड, 2021 चा भाग असलेला “प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्व” पुरस्कार माझ्या शासनाने जिंकला आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की, हा पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य आहे.

32. माझ्या शासनाने, गरजू लोकांना भोजन पुरविण्याकरिता “शिवभोजन योजना” सुरू केली आहे. सार्वत्रिक साथरोगाच्या कालावधीत 2 कोटी 70 लाख थाळ्या मोफत पुरविल्या आहेत आणि 3 कोटी 68 लाख थाळ्या प्रत्येकी 5 रुपयांत पुरविल्या आहेत. सध्या, राज्यात 1,526 केंद्रे कार्यरत असून फेब्रुवारी, 2022 पर्यंत 8 कोटींपेक्षा अधिक शिवभोजन थाळ्या वितरित करण्यात आल्या आहेत.

33. 2020-21 या हंगामात, किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांकडून 20 लाख 36 हजार मेट्रिक टन धानाची व भरड धान्याची विक्रमी खरेदी केली आहे. 2020-21 च्या खरीप हंगामामध्ये, 50 क्विंटल पर्यंतच्या धानासाठी, प्रति शेतकरी, प्रति क्विंटल 700 रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कम दिली आहे. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत, एकूण 1,200 कोटी रुपये थेट जमा करण्यात आले आहेत.

34. माझ्या शासनाने, किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत, सुमारे 1 कोटी 25 लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आणि सुमारे 5 लाख शेतकऱ्यांना, 7,097 कोटी रुपये प्रदान केले. त्याचप्रमाणे, 1 लाख 34 हजार शेतकऱ्यांकडून रुपये 1,148 कोटी किंमतीचा 23 लाख 52 हजार क्विंटल हरभरा खरेदी केला. एकूणच, माझ्या शासनाने, गेल्या वर्षी, शेतकऱ्यांना 9,445 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम प्रदान केली आहे.

35. माझ्या शासनाने, अत्याचार व ॲसिड हल्ल्यातील पीडित महिलांना व मुलींना, “मनोधैर्य” योजनेअंतर्गत, 10 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले आहे.

36. माझ्या शासनाने, अनाथ झालेल्या मुला-मुलींना, शिक्षणात व नोकरीत एक टक्का आरक्षण दिले आहे.

37. रत्नागिरी, रायगड व इतर क्षेत्रांमध्ये आलेल्या तौक्ते चक्रीवादळापासून ते महापुरासारख्या अनेक नैसर्गिक आपत्तींना, राज्याने तोंड दिले आहे. या आपत्तींमध्ये, 461 जणांचा मृत्यू झाला आणि 7,360 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीची सार्वजनिक मालमत्ता नष्ट झाली. माझ्या शासनाने, या आपत्तींना तत्परतेने व प्रभावीपणे प्रतिसाद दिला आणि याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून 15,000 कोटी रुपये आणि राज्याच्या अर्थसंकल्पातून अतिरिक्त 5,500 कोटी रुपये उपलब्ध करून दिले.

38. माझ्या शासनाने, भविष्यातील नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरिता कोकण प्रदेशासाठी, 3,200 कोटी रुपयांचे पॅकेज देखील मंजूर केले आहे.

39. माझ्या शासनाने, सूक्ष्म सिंचन संच बसविलेल्या शेतकऱ्यांना, “शाश्वत कृषी सिंचन योजने” अंतर्गत परिपूरक अर्थसहाय्य म्हणून 200 कोटी रुपये वितरित केले आहेत.

40. माझ्या शासनाने, शेतकऱ्यांच्या सेंद्रिय कृषी उत्पादनांच्या प्रमाणीकरणासाठी अकोला येथे महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणीकरण संस्थेची स्थापना केली आहे.

41. माझ्या शासनाने, “आझादी का अमृत महोत्सव” साजरा करण्यासाठी 500 कोटी रुपये मंजूर केले आहेत. माझ्या शासनाने, “आझादी का अमृत महोत्सव” या अंतर्गत, ग्रामपंचायत स्तरावर, देशातील सर्वाधिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

42. यावर्षी, केंद्र सरकारने, “आझादी का अमृत महोत्सव” या निमित्त, 20 ते 25 डिसेंबर, 2021 या कालावधीत सुशासन सप्ताह साजरा केला. केंद्र सरकारच्या सुशासन निर्देशांक अहवालानुसार, 2019-20 व 2020-21 यावर्षी, माझ्या शासनाचा देशात दुसरा क्रमांक आला याचा मला अभिमान वाटतो.

43. माझ्या शासनाने, आशियाई विकास बँकेकडून अर्थसहाय्य मिळालेल्या, 5,000 कोटी रुपये किंमतीच्या प्रकल्पास मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत, सुमारे 1,000 कि.मी. लांबीच्या रस्त्यांची दर्जावाढ व काँक्रिटीकरण करण्यात येईल. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यास देखील मान्यता देण्यात आली असून त्याअंतर्गत, 10,000 कोटी रुपये खर्चातून 2,000 कि.मी. रस्त्यांची दर्जावाढ करण्यात येईल.

44. 8,654 कि.मी. लांबीच्या रस्त्यांच्या विकासाकरिता हायब्रीड ॲन्युईटी योजना राबविण्यात येत आहे. हायब्रीड ॲन्युईटी योजनेअंतर्गत, एकूण 138 पॅकेजेस निश्चित करण्यात आले असून 3,675 कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.

45. माझ्या शासनाने, “हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग” या, 701 कि.मी. लांबीच्या महामार्गाचे 77 टक्के बांधकाम पूर्ण केले आहे. हा महामार्ग, नागपूर ते गोंदिया व गडचिरोली ते नागपूर पर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय माझ्या शासनाने घेतला आहे.

46. माझ्या शासनाने, रायगड जिल्ह्यातील रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी पर्यंतच्या सागरी महामार्गाचे चौपदरीकरण व काँक्रिटीकरण पूर्ण करण्याचे काम देखील हाती घेतले आहे.

47. माझ्या शासनाने, मुंबईतील सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचे 50 टक्के काम पूर्ण केले असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबईमधील वाहतूक अधिक वेगवान व सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

48. माझ्या शासनाने, पुणे शहरातील रिंग रोडसाठी भूसंपादन कार्य हाती घेतले आहे.

49. कोविड-19 सार्वत्रिक साथरोगाच्या काळात वर्गात प्रत्यक्ष भरणाऱ्या शाळा बंद असूनही, माझ्या शासनाने, “माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी” व “अभ्यासमाला” या उपक्रमांतर्गत, विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू ठेवले. इयत्ता 1 ली ते 12 वीसाठी दिक्षा ॲपद्वारे दररोज विषयनिहाय अभ्यास साहित्य प्रसारित केले. सन 2020-21 मध्ये, दिक्षा ॲपच्या वापरात, महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले.

50. माझ्या शासनाने, शाळा सुरू होण्यापूर्वीच इयत्ता 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना, “समग्र शिक्षा अभियाना”अंतर्गत, मोफत पाठ्यपुस्तकांचे घरपोच वाटप केले आहे. सर्व शाळांमध्ये, द्विभाषिक पुस्तके सुरू केली जात आहेत.

51. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 488 शाळांचा, राज्यातील आदर्श शाळा म्हणून विकास करण्यात येत आहे.

52. माझ्या शासनाने, संशोधन क्षमता सुधारण्यासाठी राज्यातील सहा विद्यापीठांमध्ये तंत्रज्ञान विकास व तंत्रज्ञान हस्तांतरण केंद्रे स्थापन केली आहेत. राज्यात, तीन समूह विद्यापीठे, दोन नवीन आदर्श पदवी महाविद्यालये व एक नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन केले जात आहे.

53. माझ्या शासनाने, वन हक्क अधिनियम, 2006 ची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. आतापर्यंत, 1,82,483 हेक्टर जमिनीचा समावेश असणारे, 1,92,845 वैयक्तिक वन हक्क दावे तसेच 12,73,797 हेक्टर जमिनीचा समावेश असणारे, 8,220 सामूहिक वन हक्क दावे मान्य करण्यात आले आहेत.

54. माझ्या शासनाने, अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत वसतिगृह सुविधा मिळण्यासाठी, त्यांच्या कुटुंबांच्या वार्षिक उत्पन्न मर्यादेत, 2 लाख 50 हजार रुपयांवरून 8 लाख रुपये वाढ केली आहे. माझ्या शासनाने, अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांकरिता, पोलीस शिपाई भरतीसाठी भरतीपूर्व निवासी प्रशिक्षण योजना देखील सुरू केली आहे.

55. डिजिटल स्वाक्षरी केलेल्या सात-बारा उताऱ्यांच्या प्रती, नि:शुल्क वितरित करण्याचा निर्णय, माझ्या शासनाने घेतला आहे.

56. माझ्या शासनाने, राज्यात 15 ऑगस्टपासून ई-पीक पाहणी प्रकल्प सुरू केला असून आतापर्यंत, 95 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे.

57. माझ्या शासनाने, रोजगार हमी योजनेशी संबंधित असलेल्या फळबाग योजनेनुसार, “मागेल त्याला शेततळे” या योजनेअंतर्गत, सुमारे 1 लाख 50 हजार शेततळी पूर्ण केली आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या वनस्पतींच्या पुनरुज्जीवनासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

58. माझ्या शासनाने, धनगर समाजाच्या विकासासाठी 13 योजना मंजूर केल्या आहेत. या वर्षी, धनगर समाजातील 5,300 विद्यार्थ्यांना, नामांकित इंग्रजी निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला आहे.

59. माझ्या शासनाने, दरवर्षी, 1 जानेवारी रोजी कोरेगाव-भिमा येथे “शौर्य दिन” साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

60. माझ्या शासनाने, मुंबईतील वरळी, ना.म.जोशी मार्ग व नायगाव येथील बी.डी.डी. चाळींच्या पुनर्विकासाचे काम हाती घेतले आहे. बी.डी.डी. चाळींमध्ये राहत असलेल्या अंदाजे 15,500 भाडेकरूंना, 500 चौरस फूट क्षेत्रफळाच्या सदनिकांचे वाटप करण्यात येणार आहे.

61. माझ्या शासनाने, राज्यातील 391 शहरांमध्ये व नगरांमध्ये, “प्रधानमंत्री आवास योजनेची (नागरी)” अंमलबजावणी केली आहे. या योजनेअंतर्गत, 15 लाख 38 हजार निवासी घरे मंजूर करण्यात आली आहेत. माझ्या शासनाने, या योजनेसाठी राज्य शासनाचा हिस्सा म्हणून आतापर्यंत, 1,739 कोटी रुपये दिले आहेत.

62. माझ्या शासनाने, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 500 चौरस फुटापर्यंत चटईक्षेत्र असलेल्या निवासी सदनिकांना, मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.

63. माझ्या शासनाने, राज्यामध्ये एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली लागू केली असून यामुळे राज्यातील नागरिकांना घर बांधणी परवानगी मिळणे सुलभ होईल.

64. 2021 मध्ये नागरी स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर होते हे सांगण्यास खूप आनंद होत आहे.

65. माझ्या शासनाने, “प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत” 9 प्रकल्प पूर्ण केले असून 2 लाख 64 हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण केली आहे. “बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत”, 19 प्रकल्प पूर्ण केले असून 3 लाख 77 हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण केली आहे.

66. माझ्या शासनाने, एकूण 2,636 मेगावॅट स्थापित क्षमतेचे 34 जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित केले आहेत आणि एकूण 160 मेगावॅट स्थापित क्षमतेचे 39 लघु जलविद्युत प्रकल्प खाजगीकरणातून कार्यान्वित केले आहेत.

67. माझ्या शासनाने, “जल जीवन मिशन” अंतर्गत, ग्रामीण भागातील, 97 लाख 58 हजार घरांना नळ जोडण्या पुरविल्या आहेत.

68. माझ्या शासनाने, पुणे-नाशिक सेमी-हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या आर्थिक सहभागास मान्यता दिली आहे.

69. कोविड-19 सार्वत्रिक साथरोगाच्या दुसऱ्या लाटेच्या कालावधीत, प्रत्येक ऑटोरिक्षा चालकाला 1,500 रुपये आर्थिक सहाय्य दिले आहे.

70. महिला व बालकांविरुद्धच्या अपराधांना आळा घालण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्याकरिता आणि अशा प्रकरणांचे जलदगतीने अन्वेषण करण्यासाठी व जलदगतीने न्यायचौकशी करण्यासाठी राज्य विधानमंडळाने, गेल्या अधिवेशनात शक्ती विधेयक संमत केले आहे.

71. माझ्या शासनाने, वडगाव-मावळ येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) तसेच अलिबाग येथे कुटुंब न्यायालय स्थापन केले आहे.

72. माझ्या शासनाने, सर्व शासकीय विभागांमध्ये मराठीचा वापर करणे अनिवार्य करण्यासाठी महाराष्ट्र राजभाषा अधिनियमात सुधारणा केली आहे. मराठी भाषेशी संबंधित असलेल्या कामकाजाचे संनियत्रण करण्यासाठी एक राज्य स्तरीय समिती आणि अनेक जिल्हा स्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

सन्माननीय सदस्यहो, या अधिवेशनामध्ये, नवीन वित्तीय वर्षाचे अर्थसंकल्पीय प्रस्ताव, विनियोजन विधेयके आणि इतर विधिविधाने आपल्या विचारार्थ मांडण्यात येतील. महाराष्ट्राला अधिकाधिक समृद्धीकडे नेण्यासाठी, सन्माननीय सदस्य, कामकाजात सहभाग घेतील व या प्रस्तावांवर आपली अभ्यासपूर्ण मते मांडतील, असा मला विश्वास आहे.

पुन्हा एकदा, आपणा सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा.

जय हिंद! जय महाराष्ट्र!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com