ठाकरे सरकारला टक्केवारीतच रस ; बहुजन पोरांविषयी देणंघेणं नाही

''जर घोटाळ्याची पूर्व कल्पना होती आणि गृहखातेही राष्ट्रवादीकडे असताना सुद्धा त्यांना मध्यरात्री दीड वाजता परिक्षा रद्द का करावी लागली,'' असा सवाल पडळकरांनी आव्हाडांना विचारला आहे.
Uddhav Thackeray, Gopichand Padalkar
Uddhav Thackeray, Gopichand Padalkarsarkarnama

मुंबई : म्हाडाच्या परीक्षा आजपासून सुरु होणार होत्या. त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी टि्वट करीत ही माहिती दिली आहे. आव्हाडांनी विद्यार्थ्यांची क्षमा मागत ही माहिती दिली आहे. याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. आता या परीक्षा जानेवारीमध्ये होणार आहेत. या परीक्षांबाबत गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांच्याकडे आल्या आहेत. काही लोक पैसे घेत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

म्हाडाच्या परीक्षेवरुन भाजपचे नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे. ''जर घोटाळ्याची पूर्व कल्पना होती आणि गृहखातेही राष्ट्रवादीकडे असताना सुद्धा त्यांना मध्यरात्री दीड वाजता परिक्षा रद्द का करावी लागली,'' असा सवाल पडळकरांनी आव्हाडांना विचारला आहे.

पडळकर म्हणाले, ''प्रस्थापितांचे बोलघेवडे जितेंद्र आव्हाड गृह निर्माण खात्याचा दर आठवड्याला एक्सेल शीट मध्ये न चुकता हिशोब घेतात. पण बहुजन पोरांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या म्हाडा नोकरी बाबत लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. आठवड्याभरापासून म्हाडाचे नोकर भरती परिक्षामध्ये घोटाळे होणार असं स्वतःच सांगत त्यात बळी पडू नये म्हणून प्रसारमाध्यातून आवाहन करीत आहेत. जर त्यांना घोटाळ्याची पूर्व कल्पना होती आणि गृहखातेही राष्ट्रवादीकडे असतानासुद्धा त्यांना मध्यरात्री दीड वाजता परिक्षा रद्द का करावी लागली?

''प्रस्थापितांच्या सरकारला फक्त आणि फक्त टक्केवारी गोळा करण्यातच रस आहे. एक एक पै गोळा करून परिक्षेसाठी पोहचलेल्या बहुजन पोरांविषयी, नोकरी अभावी आत्महत्या करणाऱ्या बहुजन पोरांविषयी ठाकरे सरकारला काहीही देणंघेणं नाही," असा आरोप पडळकरांनी केला आहे.

Uddhav Thackeray, Gopichand Padalkar
गोपीनाथ मुंडे असते तर, युती कायम राहिली असती!

म्हाडाच्या भरती परीक्षेमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा आहे. काही जणांनी भरतीसाठी मध्यस्थांना पैसे दिले असल्याची चर्चा आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे म्हाडाची परीक्षा (mhada exam 2021) पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी देखील आरोग्य खात्याच्या परीक्षेत पेपर फुटीचे प्रकरण समोर आले होते. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने आता विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

''पेपर पुढे ढकलला का ? पेपर फुटला हे असेल तर मग का त्यांच्यावर कार्यवाही नाही केली तुम्हाला तर आधीच कळलं होत तर मग आधीच cancel करायला पाहिजे मॅडम , आम्ही परिस्थिती नसताना १०००-२००० खर्च करून बस बंद असल्याने औरंगाबादहून आलो. आता कळलं की exam cancel आरोग्य विभागाच्या परीक्षेचे पण तसचं झालं. mhada पण तसचं, सरकार काय करणार तो पर्यंत आमची मानसिकता खचत आहे एका exam ला किती वेळेस जावे, अशी आमची परिस्थिती नाही, '' अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांना व्यक्त केली.

आरोग्य विभागाची परीक्षाही ऐनवेळी पुढे ढकलल्याने परीक्षार्थी त्रस्त झाले होते, आता म्हाडाची परीक्षा देखील काही कारणाने पुढे ढकलण्यात आल्याचे शनिवारी मध्यरात्री म्हाडाने पत्र प्रसिद्ध करून उमेदवारांना कळविले, तोपर्यत अनेक विद्यार्थी हे आपल्या गावाहून परीक्षा केंद्रांकडे रवाना झाले होते. प्रवाशात त्यांना ही परीक्षा पुढे ढकलल्याचे कळल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com