Corona patient oxygen .jpg
Corona patient oxygen .jpgSarkarnama

काळजी घ्या! राज्यात रुग्णांचा आलेख चढताच; ऑक्सिजनच्या मागणीही दिडपट वाढ

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णासंख्येचा आलेख दिवसेंदिवस चढताच असून मेडिकल ऑक्सिजनच्या मागणीतही दिडपट वाढ झाल्याने चिंतेत भर पडली आहे. गुरुवारी राज्यात तब्बल ३६ हजार २६५ नवीन रुग्णांचे निदान झाले होते, तर १३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काल (शुक्रवार) दिवसभरात राज्यात ४० हजार ९२५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर २० कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

दुसऱ्या बाजूला राज्यात मेडिकल ऑक्सिजनच्या मागणीतही कमालीची वाढ झाली आहे. राज्यात सध्या दिवसाला ४२४ मेट्रीक टन मेडिकल ऑक्सिजनची मागणी होत आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हिच मागणी दिवसाला २७० ते ३०० मेट्रीक टन होती. त्यामुळे सर्वसाधारण मेडिकल ऑक्सिजनच्या मागणीत दिडपट वाढ झाली आहे. मात्र ही मागणी पूर्ण करण्यासाठी राज्याकडे मेडिकल ऑक्सिजनचा मुबलक साठा असून कमतरता भासणार नाही आणि पहिल्या किंवा दुसऱ्या लाटेसारखीही परिस्थिती निर्माण होणार नाही असा दावा अन्न आणि औषध प्रशासनाने केला आहे.

पहिल्या, दुसऱ्या लाटेत कोरोनावरील उपचाराधीन रुग्णांच्या एकूण १० टक्के रुग्णांना ऑक्सिजन गरज भासत होती. त्यामुळे दिवसाला केवळ २०० ते ३०० मेट्रीक टन मागणी असलेल्या मेडिकल ऑक्सिजनच्या मागणीत अचानक वाढ होवून ती ८५० मेट्रीक टन झाली होती. पुढे काही दिवसातही ही मागणी तब्बल १ हजार ५०० मेट्रीक टनापर्यंत पोहचली होती. त्यामुळे मेडिकल ऑक्सिजनची कमालीची कमतरता भासली होती. अगदी परराज्यातुनही ऑक्सिजन मागवा लागला होता.

दुसऱ्या लाटेतही ऑक्सिजनची ही मागणी दिवसाला १६०० ते १८०० मेट्रीक टनापर्यंत गेली होती. पण जुलैमध्ये रुग्णसंख्या कमी होत आल्यानंतर ही मागणी पुन्हा २७० ते ३०० मेट्रीक टनपर्यंत कमी झाली होती. मात्र आता राज्यात तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर मेडिकल ऑक्सिजनच्या मागणीत पुन्हा वाढ होत असून ही मागणी ४२४ मेट्रीक टनापर्यंत वाढली आहे. ७०० मेट्रीक टनापर्यंत ऑक्सिजनच्या मागणीत वाढ झाल्यानंतर राज्यात ऑटो लॉकडाऊन होईल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहिर केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com