मुख्यमंत्रिपदाच्या स्वप्नातून आता तरी बाहेर पडा!

"मला आजही वाटते मी मुख्यमंत्री आहे", असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आज बेलापुरमधील एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
मुख्यमंत्रिपदाच्या स्वप्नातून आता तरी बाहेर पडा!
Devendra FadnavisSarkarnama

नवी मुंबई : "मला आजही वाटते मी मुख्यमंत्री आहे" या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या वक्तव्यावर आता काँग्रेसने (Congress) प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय जनता पक्ष (Bjp) सत्तेवरून पायउतार होऊन दोन वर्ष झाली तरी देवेंद्र फडणवीस यांना आजही तेच मुख्यमंत्री (Chief minister) असल्याचा भास होत आहे. दोन वर्षापासून फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत हे वास्तव त्यांनी अजूनही स्विकारलेले नाही. पण या स्वप्नातून बाहेर पडून त्यांनी वास्तव स्विकारले पाहिजे, असा सल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी दिला आहे.

"मला आजही वाटते मी मुख्यमंत्री आहे", असे देवेंद्र फडणवीस आज बेलापुरमधील एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले. फडणवीसांच्या याच वक्तव्याचा धागा पकडून अतुल लोंढे यांनी त्यांच्यावर टीका केली. लोंढे म्हणाले की, फडणवीस यांना सत्तेचा मोह सुटलेला दिसत नाही. सत्ता हातातून जात आहे असे दिसताच त्यांनी पहाटेचा प्रयोग करुन पाहिला, पण त्यांचे ते मुख्यमंत्रीपद हे औटघटकेचे ठरले. त्यानंतरही ते सतत "मी पुन्हा येईन" "मी पुन्हा येईन", म्हणत बसले पण पुन्हा काही संधी मिळाली नाही.

महाविकास आघाडीचे सरकार आज पडणार, उद्या पडणार, या तारखेला पडणार, चार दिवसानंतर पडणार अशा ज्योतिषाच्या तारखा सांगूनही झाल्या पण राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार काही जात नाही, उलट ते आजही भक्कम आहे. पण फडणवीसांना मात्र शेखचिल्लीसारखे आजही स्वप्नातच मग्न आहेत. त्यामुळे त्यांनी स्वप्नातून बाहेर पडावे आणि आपण सध्या मुख्यमंत्री नाही तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहोत हे वास्तव स्विकारले पाहिजे, असेही लोंढे म्हणाले. जनतेचा महाविकास आघाडीवर विश्वास असून जनता भाजपला कायम विरोधी पक्षातच पाहू इच्छिते, त्यामुळे त्यांनी मनाची तयारी करून वास्तव स्विकारावे अशी कोपरखळीही त्यांनी फडणवीसांना मारली.

देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते महिला मासळी विक्रेत्यांना परवाना वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ

बेलापूरच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या पुढाकाराने श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या माध्यमातून नवी मुंबईतील गरजू रुग्णांच्या आरोग्य सेवेसाठी सर्व सुविधांयुक्त रुग्णवाहिका व एपीएमसीमधील व्यापारी-माथाडी यांना टाकाऊमधून टिकाऊ तयार करण्यात आलेली सर्व सुविधांयुक्त प्रसाधनगृह बस यांचा लोकार्पण सोहळा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. सोबतच त्यांच्या हस्ते महिला मासळी विक्रेत्यांना परवाना वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ देखील करण्यात आला.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोणत्या पदावर आहे, हे महत्त्वाचे नाही. गेली दोन वर्षे एक दिवसही घरी न थांबता मी जनतेत मिसळतो आहे, सामान्य जनतेची कामे करतो आहे. आमची लोकोपयोगी कामे सुरूच आहेत, त्यामुळे मी आजही मुख्यमंत्री असल्याचे मला वाटते.

Related Stories

No stories found.