
Mumbai News: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत मोठं भाष्य करताना उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदासाठी उत्तम चेहरा आहेत असं विधान केलं होतं. राऊतांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. उध्दव ठाकरेंच्या पंतप्रधानपदावरुन सुरु झालेली चर्चा थांबत नाही याचवेळी आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाबाबत ठाकरे गटाच्या आमदारानं मोठं विधान केलं आहे.
ठाकरे गटाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज वरळीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं. या कार्यक्रमात विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांनी आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील असं विधान केलं. यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
आमदार सुनील शिंदे म्हणाले, रश्मी वहिनी तुम्ही कार्यक्रमाला आलात. ही वरळी शिवसेनेची आहे. ही वरळी उद्धव ठाकरे यांची आहे. ही वरळी आदित्य ठाकरे यांचीच असेल. वहिनी मी तुम्हाला शब्द देतो की, आदित्य ठाकरे( Aaditya Thackeray) इथूनच मुख्यमंत्री होतील. आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर याच मंचावर आम्ही त्यांचा सत्कार करु असा शब्द आमदार शिंदे यांनी रश्मी ठाकरेंना दिला आहे.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
युवासेनेचे प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला आहे. ठाकरे म्हणाले, आपण मुंबईकरांचा पैसा जपून वापरत होतो. हा पैसा आता त्यांच्या आवडत्या मित्रांमध्ये आणि कंत्राटदारांमध्ये वाटला जाणार आहे. शेतकरी हैराण आहे. आमच्यावेळी शेतकऱ्यांपर्यंत कर्जमुक्ती पोहोचली होती. आता फक्त गद्दार आनंदी आहेत, मला वाटतं ते पण नसेल कारण मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीये असा टोलाही ठाकरेंनी लगावला.
महिलांना शिव्या देणारे मंत्रिमंडळात...
तसेच अजून मंत्रिमंडळात एकही महिला नाही ही खंत आहे. टीव्हीवर मंत्र्यांकडून महिलांचा अपमान केला जातोय. महिलांना शिव्या देणारे देखील मंत्रिमंडळात आहेत अशी बोचरी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आताच्या आर्थिक सर्व्हेक्षण अहवालात फक्त 40 खोके एकदम ओके किंवा 40 गद्दार एकदम ओके असं लिहिलं असतं तरी झालं असतं. महाराष्ट्र कुठेही ओके दिसत नाही. अवकाळीवर पंचनामांचे आदेश दिले. मात्र कारवाई होत नाही असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.