राष्ट्रवादीला सत्तेत आणणे हेच ध्येय : रोहीत पवार

राजकीय टीका करायला हरकत नाही, पण खालच्या पातळीवर जाऊन कोणी आमच्या नेत्यांबद्दल कोणी वैयक्तिक टीका केली तर ती सहन करण्याचे कारण काय? अशा टिकेला सडेतोड उत्तर दिले गेलेच पाहिजे. मात्र त्यासाठी आपण खालच्या पातळीवर जाण्याची गरज नाही, सांगत होते राष्ट्रवादीचे युवा नेते रोहीत पवार. सरकारनामा फेसबुक लाइव्हवर दिलेल्या मुलाखतीत आपले राजकीय मुद्दे स्पष्टपणे मांडले. सकाळचे संपादक सम्राट फडणीस यांनी ही मुलाखत घेतली.
राष्ट्रवादीला सत्तेत आणणे हेच ध्येय : रोहीत पवार

प्रश्न : राजकीय विषयावरील ट्रोलिंग कसे सहन करता व त्याला उत्तर देता का ? 
उत्तर : राजकीय ट्रोलिंगला अजिबात घाबरत नाही. कुणाबद्दल आपण स्वत: बोलत नाही. मात्र असं कुणी बोललं तर आपण ते सहन करू नये. त्या आर्टिकलमधील भाषा चुकीची होती. आमच्या नेत्याबद्दल चुकीची गोष्ट तुम्ही बोलत होता. त्यावर लोक काय म्हणतील, असा विचार न करता अशा लोकांविरोधात बोललेच पाहिजे. अशा पद्धतीने बोलल्यानंतर आपण त्याला उत्तर दिलेच पाहिजे. जे लिहलं होतं त्यातली भाषा बघा आपण. अत्यंत चुकीची भाषा होती. असं कुणी लिहिता कामा नये. या प्रकारची भाषा आणि त्यानंतर होणाऱ्या ट्रोलिंगला कुणीच घाबरू नये, असं मला वाटतं. 

प्रश्न : राज्य सरकारच्या कामाकडे आपण कशा दृष्टीने पाहता ? 
उत्तर : या सरकारने आधीच्या योजना नाव बदलून आणल्या. नाव बदलले हरकत नाही. साऱ्याच योजना चुकीच्या आहेत, असे माझे मत नाही. मात्र यांनी अनेक आश्‍वासने दिली. कौशल्य विकास योजना, मुद्रा लोन, स्मार्ट सीटी, शेतकऱ्यांच्या अनेक योजना, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अशा अनेक योजना आहेत. यातील पूर्ण काहीच केले नाही. जे शक्‍य नाही अशी आश्‍वासने दिली. ती पूर्ण करता आली नाहीत. याप्रकारे लोकांची फसवणूक करण्यात येत आहे. कोणतेही सरकार असो त्यांनी दिलेला शब्द पाळायला हवा. विकासाबद्दल तुम्ही बोलत होता आता कुणीच बोलत नाही. आमचा अजेंडा फसवा होता हे तुम्ही सांगत आहात. याचा अर्थ युवकांना तुम्ही खोटं बोलायला सांगत आहात का? विकेंद्रीकरण हा राज्यघटनेचा पाया आहे. डॉ. आंबेडकरांनी यावरच भर दिला होता. आता मात्र केंद्रीकरणाच्या दिशेने चालला आहेत. जिल्हा नियोजन समितीची नवी रचना पाहता केंद्रीकरणावर या सरकारचा भर आहे. केंद्रीकरण करून त्याचा वापर हे राजकारणासाठी करणार आहेत. सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या बाबतीत बोलायचे तर सत्तेत राहून हे सरकारच्या विरोधात बोलत आहेत. मात्र सत्तेत असलेले भाजपा-शिवसेना एकत्रच आहेत हे जनता विसरणार नाही. 

प्रश्न : तुमची राजकीय वाटचाल पाहता तुम्ही जिल्हा परिषदेपुरते मर्यादीत राहणार नाही, असे दिसते. तुमजे राजकीय व्हीजन काय आहे. 
उत्तर : आम्ही सलग 15 वर्षे सत्तेत होतो. आता विरोधात आहे. आता आपल्या विचाराची पार्टी राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत आणणे हे प्रमुख उद्दीष्ट आहे. यासाठी युवकांचे संघटन सुरू आहे. माझ्यावर आमच्या पार्टीवर प्रेम करणारे काही कार्यकर्ते इतर पक्षात असतील. प्रवाहातून दूर गेले असतील तर अशा काहीसे दूर गेलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पक्षाला सत्तेत आणण्याचे प्रमुख काम करणार आहे. 

प्रश्न : गेल्या चार वर्षात भ्रष्टाचाराचा मुद्दा फारसा पुढे आला नाही. मात्र गेल्या निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसच्या बाबतीत घराणेशाहीचा मुद्दा पुढे आला होता. आता पुन्हा हा मुद्दा पुढे येत नाही का ? 
उत्तर : उमेदवारी मिळताना एकवेळ घराणेशाही आपण म्हणू शकतो. पवारसाहेब, अजितदादा, सुप्रिया सुळे माझे आईवडील तसेच आजोबा अप्पासाहेब पवार यांच्या कामाची पोचपावती म्हणून मला उमदेवारी मिळाली. मात्र निवडून आल्यानंतर मस्त घरी झोपलो असतो तर ती घराणेशाही ठरली असती. निवडून आल्यानंतर लोकांमध्ये गेलो. त्यांचे प्रश्‍न समजावून घेतले. ते सोडविण्याचा प्रयत्न केला. शिक्षण, रोजगार, महिला, युवक यांचे अनेक प्रश्‍न आहेत.त्यात काही काम करण्याचा प्रयत्न केला. यापुढील काळात उमेदवारी मिळण्यासाठी कदाचित घराणेशाही चालू शकेल. मात्र पुन्हा निवडून येण्यासाठी घराणेशाही कामाला येणार नाही. त्यासाठी लोकांमध्ये जाऊन काम करावे लागेल, असे मला वाटते. 

प्रश्न : पक्षाच्या संघटनेकडे पाहताना तुम्हाला काही त्रुटी जाणवतात का ? आणि त्यावर रोहीत पवार, तरूण नेता म्हणून काय सुचवाल?
उत्तर : सलग 15 वर्षे सत्तेत असल्यामुळे काही प्रमाणात शिथिलता आली असेल. प्रत्येकाबाबतीत असे होत असते. अडचणी कायम असतात. त्यातून मार्ग काढावा लागतो. आता पक्षात सर्व आघाड्यांवर सक्रियता वाढली आहे. विविध सेल काम करीत आहेत. युवक, महिला अशा सर्व आघाड्यावर काम सुरू आहे. या काळात पवारसाहेबांचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्याचे काम आम्हा सर्वांना करावे लागणार आहे. 

प्रश्न : शरद पवार यांच्या राजकारणाकडे कसे पाहता ? 
उत्तर : सत्तेत असो व नसो सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करण्याची भूमिका पवारसाहेबांची असते. कोणताही निर्णय घेताना त्याचा सामान्यांच्या जीवनावर काय परिणाम होईल याचा विचार पवारसाहेब करीत असतात. सामान्यांचा फायदा होईल, असे अनेक निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. साहेब चुकीचा निर्णय कधी घेत नाहीत यावर आमचा ठाम विश्‍वास आहे. ते देशपातळीवर काम करीत असताना आम्ही सारे ठामपणे त्यांच्यामागे उभे आहोत. त्यांचा विचार, त्यांचे काम सामान्य माणसापर्यंत नेण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. 

प्रश्न : महाराष्ट्र समजून घेताना आपण त्याकडे नेमके कसे पाहता. राज्याबाबत आपले नेमके व्हीजन काय आहे. ? 
उत्तर : महाराष्ट्राचा विचार करताना शिक्षण, आरोग्य, युवक, कलाक्षेत्र, महिला व क्रिडा याबाबत राज्य पातळीवर मोठे काम करण्याची आवश्‍यकता आहे. आज असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या आणि संख्येने मोठ्या असलेल्या या वर्गाचे प्रश्‍नदेखील मोठे आहे. धारावीसारख्या मोठ्या झोपडपट्टीत जाऊन तेथे व्यवसाय करणाऱ्या लोकांचे प्रश्‍न समजावून घेण्याचा प्रयत्न मी केला. नोटबंदीमुळे अडचणीत वाढ झाल्याची या लोकांची भावना आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना असंघटीत क्षेत्रातील लोकांवर त्याचा काय परिणाम होईल याचा विचार धोरणकर्त्यांनी करण्याची गरज आहे. किल्लारी भूकंपाला 25 वर्षे नुकतीच पूर्ण झाली. तेथे जाऊन त्या लोकांशी बोलण्याचा त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. आरोग्य क्षेत्रात मोठे काम करण्याची गरज आहे. एकुणच काय तर राज्य पातळीवर काम करताना लोकांच्या नेमक्‍या अडचणी लक्षात घेऊन काम करण्याची गरज आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com