शिवाजीमहाराज आणि संभाजीमहाराजांविषयी वावगं बोलणं महाराष्ट्र खपवून घेणार नाही : डॉ. अमोल कोल्हे 

शिवाजीमहाराज आणि संभाजीमहाराजांविषयी वावगं बोलणं महाराष्ट्र खपवून घेणार नाही : डॉ. अमोल कोल्हे 

कोरेगाव भीमा : छत्रपती संभाजी महाराज यांचा ज्वलंत व खरा इतिहास जगापुढे आणणाऱ्या 'स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज' मालिकेचे व कलाकारांच्या यशाचे श्रेय हे छत्रपती शिवाजीमहाराज व छत्रपती संभाजीमहाराज यांच्या पुण्याईला तसेच त्यांना हदयात साठवणाऱ्या शंभुभक्तांनाच आहे. यापुढे राजांविषयी वावगं बोलणं महाराष्ट्र खपवून घेणार नाही, हेच या मालिकेचे खरे यश असल्याचे या मालिकेचे निर्माते व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. 

आजवरच्या प्रवासात छत्रपती शिवाजी महाराज व संभाजीराजांचा ज्वलंत इतिहास मांडण्यांचा शक्‍य तेवढा प्रामाणिक प्रयत्न केला असून राहून गेले ते पूर्ण करण्यासाठी जीवंत असेपर्यंत कटीबद्ध राहण्याची ग्वाहीही डॉ. कोल्हे यांनी दिली. 

'स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज' मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाल्यामुळे ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असताना या मालिकेत काम करणाऱ्या संपूर्ण टीमने डॉ. कोल्हे यांच्या समवेत काल (शुक्रवारी) वढू बुद्रुक व तुळापूर येथे येऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी डॉ. कोल्हे यांच्यासह त्यांचे सहकारी जगदंब क्रिएशन्सचे डॉ. घनश्‍याम राव, विलास सावंत तसेच मालिकेतील सर्व कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते. 

सुरवातीला वढु बुद्रुक येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने डॉ. कोल्हे यांच्यासह सर्व कलाकारांचा संभाजी महाराजांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शिरूर-हवेलीचे आमदार ऍड. अशोक पवार, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड तसेच महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक तसेच जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, वढुच्या सरपंच सुरेखा शिवले, उपसरपंच रमाकांत शिवले आदी उपस्थित होते. 

डॉ. कोल्हे म्हणाले, "" जेव्हा जेव्हा वढु तुळापूरला यायचो, त्यावेळी खंत असायची की आमच्या धाकल्या धन्याचे कर्तृत्व आभाळभर असताना ते सांगायला आम्ही कमी पडतो. आणि म्हणून या मालिकेचे वेगळे स्वप्न घेवून गेली आठ नऊ वर्षे धडपडत होतो, मालिकेत संभाजीमहाराजांचा इतिहास मांडण्याची संधी दिल्याने हे स्वप्न साकारले. आजवर महाराजांचा हा धगधगता इतिहास मांडताना जे काही शक्‍य होतं ते दाखवण्यांचा प्रामाणिक प्रयत्न केला.'' 

बाहेरच्या राजांचे टिचभर असलेले कार्य हात भर सांगतात, माझ्या राजांचे काम तर आभाळभर आहे, ते सांगायला जन्मही कमी पडेल. मात्र जगभरातल्या शंभुभक्तांनी जे प्रेम मालिकेला दिले त्यामुळेच ही स्वप्नपुर्ती होवू शकली. हे सर्व यश छत्रपती शिवाजीमहाराज व संभाजीराजांच्या पुण्याईचे असून आम्ही केवळ निमित्त असल्याचे सांगताना यापुढे राजांविषयी वावगं बोलणे महाराष्ट्र खपवून घेणार नाही, हेच या मालिकेचे खरे यश असल्याचेही डॉ. कोल्हे म्हणाले. 

माझा अभिनेता ते नेता असा प्रवास झाला असला तरीही येथे या भूमिवर पाऊल ठेवल्यावर मी नेता, अभिनेता नव्हे तर केवळ शंभूभक्त असतो असेही डॉ. कोल्हे म्हणाले. 

यावेळी तुळापुरचे सरपंच रुपेश शिवले, उपसरपंच राहुल राऊत व आजी माजी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com