महाराष्ट्राने एनपीआर थांबवावा, एनआरसी रद्द करावा : योगेंद्र यादव

महाराष्ट्राने एनपीआर थांबवावा, एनआरसी रद्द करावा : योगेंद्र यादव

कऱ्हाड : महाराष्ट्रात दलित, अदिवासी समाज मोठ्या प्रमाणात असून राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) विरोधात त्यांची राज्यभर आंदोलने सुरू आहेत. त्याचे दायित्व स्वीकारून महाराष्ट्रातील सरकारने एनपीआरला थांबवावे, एनआरसी कायदा रद्द करावा, असे आवाहन दिल्ली येथील स्वराज्य अभियान संघटनेचे संस्थापक योगेंद्र यादव यांनी केले. क्षणाचाही विलंब न लावता महाराष्ट्र सरकारने एनआरसी कायद्यासंदर्भात विधानसभेचा ठराव करून राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीची (एनपीआर) तयारी झाल्याची केलेली घोषणा मागे घ्यावी, असे आवाहनही बडोदा (गुजरात) येथील पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनीही केले. 

उंडाळे (ता. कऱ्हाड) येथे कार्यक्रमानिमित्त आले होते. श्री. यादव, डॉ. देवी यांनी संयुक्तरित्या पत्रकारांशी संवाद साधला. दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाच्या प्रश्‍नावर योगेंद्र यादव म्हणाले, दिल्लीच्या निवडणुकीत हिंदू - मुस्लिमच्या मुद्याला धरून सुरू असलेले राजकारण जनतेने नाकारल्याचा आनंद होत आहे. देशातील लोकांना काय पाहिजे हे भाजप या निकालातून शिकले असेल. एनआरसीपेक्षा देशात नॅशनल रजिस्ट्रेशन ऑफ अन-एम्पॉलयमेंट हवे आहे. देशात बेरोजगारी जास्त सल्याने बेरोजगारांची नोंदणी करा, शेतीची अवस्था बिकट असल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांचे समाधान करावे. त्यावर इलाज करणे गरजेचे आहे. 

महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीसंदर्भात ते म्हणाले, महाविकास आघाडी लिखित स्वरूपात धर्मनिरपेक्ष म्हणवून घेत असली तरी एनआरसी, सीएए, एनपीआरमध्ये ती धर्मनिरपेक्ष आहे का, याची परिक्षा होईल. डॉ. गणेश देवी म्हणाले, देशात 19 डिसेंबर 2019 ला संविधानावर मोठा घाला घातला आहे. पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तानच्या शरणार्थींना नागरिकत्व देण्याच्या कार्यवाहीनंतर धर्माच्या नावावर नागरिकत्व नक्की करण्यात येईल, असा केलेला कायदा संविधानांच्या मुल्यांच्या विरोधात आहे. देशभरात त्याविरोधात आंदोलने सुरू आहेत. दोन महिन्यांपासून ही आंदोलने सुरू आहेत. केंद्र सरकारने कायदा परत घ्यावा. हम भारत के लोग च्या माध्यमातून 20 राज्यातील 100 पेक्षा अधिक संघटानांनी एकत्र येवून केंद्राला चर्चा करण्याबाबत निरोप पाठवला आहे. नागरिकत्व, नागरिक, संविधान, स्वातंत्र्यांचा इतिहास याचा विचार करून चुकीचे पाऊल मागे घ्यावे. त्यासाठी 1942 च्या स्वातंत्र्य संग्रामात महत्वपूर्ण भूमिका बजावलेल्या उंडाळे गावातूनच नव्या लढ्याचा निर्धार देशासमोर मांडत आहोत. 

राज्य सरकारला आवाहन करताना डॉ. देवी म्हणाले, 1942 चा लढा मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानावर झाला, संधिवन ज्यांनी लिहिले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे. पुरोगामीचा विचार, राज्यघटनेचा वारसा, प्रगतशील राज्य या सगळ्याच्या एकत्रित जबाबदारीमुळे राज्य सरकारने क्षणाचाही विलंब न लावता विधासभेचा ठराव करावा. शिवाय राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीची तयारी झाल्याची केलेली घोषणा मागे घ्यावी. तसे न केल्यास छत्रपती शिवाजी, छत्रपती शाहू, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांची नावे घेण्याची पात्रता कमी होईल. 


अन्यथा एक एप्रिलपासून बहिष्कार.... 
"हम भारत के लोग' हे राष्ट्रीय संघटन आम्ही तयार केले असून त्याद्वारे देशात सीएए , एनआरसी व एनपीआरला विरोध करण्यासाठी व देशात भारत जोडो आंदोलन सुरू केले जाईल असे सांगून योगेंद्र यादव म्हणाले, डॉ. गणेश देवी त्याचे राष्ट्रीय संयोजक असून कार्यकारणीत संयोजनाची माझ्यावर जबाबदारी आहे. देशातील शंभरहून अधिक संघटनांचे त्याद्वारे व्यापक समन्वय आहे. 22 फेब्रुवारीला मौलाना आझाद पुण्यतिथी असून 23 मार्चला भगतसिंग यांचा हुतात्मा दिन असल्याने या काळात संपूर्ण देशात अभियान चालेल. एक एप्रिलपासून देशात होणाऱ्या एनपीआरला विरोध करण्यासह त्यावर बहिष्कार घालण्याचे आवाहनही केले आहे. एनपीआर, एनआरसी, सीएएवर चर्चेसाठी बोलवण्यासंदर्भात गृहमंत्री अमित शाह यांना पत्रव्यवहार केला आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळून त्यात देशातील लोकांचे म्हणणे त्यांना सांगू. केंद्र सरकार एनपीआरचा निर्णय मागे घेतील, अशी आशा असून तसे न झाल्यास एक एप्रिलपासून देशात एनपीआरच्या बहिष्काराची प्रक्रिया सुरू होईल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com