कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने राज्याची तिसऱ्या टप्प्याकडे वाट : ठाकरे व टोपेंची कसोटी

सध्या राज्यात 17 हजार 151 व्यक्‍ती घरगुती अलगीकरण कक्षात तर 960 व्यक्‍ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
rajesh tope-thackray
rajesh tope-thackray

सोलापूर : राज्यात आणखी 22 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आता रुग्णांची संख्या 215 वर पोहचली आहे. नवीन रुग्णांमध्ये मुंबईत सर्वाधिक 10 तर पुण्यात पाच, नागपुरात तीन, नगरमध्ये दोन आणि सांगली, बुलडाणा व जळगावात प्रत्येकी एका रुग्णाची भर पडली आहे. आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली. लॉकडाउन (संचारबंदी) असतानाही नागरिक घराबाहेर पडण्याचे प्रमाण वाढू लागल्याने विषाणूचे संक्रमण सुरुच असल्याचे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

राज्यात रविवारी (ता. 29) एकूण 394 जण विविध रुग्णालयात भरती झालेले आहेत. 18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील विविध विलगीकरण कक्षात आजपर्यंत चार हजार 210 जणांना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी तीन हजार 453 जणांचे नमुने निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर 203 जणांचे नमुने पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी 35 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 17 हजार 151 व्यक्‍ती घरगुती अलगीकरण कक्षात तर 960 व्यक्‍ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले. कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रणाची पूर्वतयारी म्हणून राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.
-
बरे झालेल्या रुग्णांना लेखी प्रतिज्ञापत्र बंधनकारक
राज्यातील 35 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडले आहे. मात्र, पुढील 14 दिवस कुटुंबासह समाजातील कोणत्याही व्यक्‍तींच्या संपर्कात येणार नाही, असे लेखी प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले आहे. बरे होऊन घरी गेलेला रुग्ण घराबाहेर फिरताना दिसल्यास त्याच्यावरही कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे. पुढील 14 दिवस काय करायचे आणि काय करणार नाही, याबाबत त्यांच्याकडून लेखी घेण्यात आले आहे.
-
सीमा बंदकडे नाही लक्ष
परजिल्ह्यातून अथवा परराज्यातून कोणीही येवू नये या हेतूने राज्यातील जिल्ह्यांच्या व राज्याच्या सीमा बंद केल्या आहेत. मात्र, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुलर्क्षामुळे अद्याप लोक बिनधास्तपणे ये- जा करीत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे जीवनावश्‍यक वस्तू खरेदीच्या नावाखाली शहर-जिल्ह्यातील वर्दळ पुन्हा सुरु झाली आहे. तत्पूर्वी, राज्याने आता दुसरा टप्पा पार करुन तिसऱ्या टप्प्याची वाट धरल्याने आगामी काळात ठोस निर्णय घेण्याची तयारी सरकार स्तरावरुन सुरु झाली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com