पुणे जिल्ह्यात शेकापची शिस्तबद्ध बांधणी करणार - भाई  जयंत पाटील 

"सरसकट कर्जमाफीसाठी आमची सुकाणू समिती कटिबद्ध असून डाव्यांच्या हाती शेतकऱ्यांचे हित जपण्याच्या चाव्या शेतकऱ्यांनी ज्या विश्वासाने दिल्या आहेत, तो विश्वास आम्ही सार्थ करण्यासाठी सरकारकडे आग्रह धरून आहोत.सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे . कशी देता येईल याचा अभ्यास शासनाने केला नसेल परंतु शासनाने जाहीर केलेली 34 हजार कोटीच्या कर्जमाफीत सरसकट कर्जमाफी होऊ शकते हे आम्ही शासनाला पटवून देऊ ,"असा विश्वास आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
jayant-patil-shekap
jayant-patil-shekap

नेरळ : "  देशात भांडवलदारांचे राज्य आले आहे, त्यांच्या पाशातून  देशाला वाचविण्यासाठी कॉंग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याची जबाबदारी आता आपल्यावर येऊन पडली आहे , " असे उदगार भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी काढले. दुसरीकडे राज्यातील कष्टकरी जनता शेकापकडे पाहत असून डाव्यांनी एकत्र आले पाहिजे असे ठाम प्रतिपादन पाटील यांनी केले. 

नेरळच्या कोतवालवाडी ट्रस्टच्या मैदानावर शेतकरी कामगार पक्षाच्या 70 व्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलत होते. शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी भर पावसात शेकापच्या वर्धापन दिनातील सर्वात देखणे आयोजन केल्याबद्दल त्यांनी कर्जत तालुक्‍यातील कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

 वर्धापन दिन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जमलेले तरुण यांची संख्या लक्षात घेऊन आपण आधी शेकापचा इतिहास सांगत असल्याचे प्रतिपादन करून  आमदार पाटील यांनी पक्षाच्या इतिहासाचा धावता आढावा घेतला. 

जयंत पाटील यावेळी म्हणाले , " हे वर्षे रायगड जिल्हा शेकापसाठी सर्वात लाभदायी आहे याचा मला  आनंद आहे .   कोकण पदवीधर मतदार संघातील निवडणूकीच्या निमित्ताने  शेतकरी कामगार पक्षाला सात जिल्ह्यात पोहचन्यायाची  संधी आहे .  शेकाप वाढतो आहे हे स्पष्ट होत आहे. त्याचवेळी रायगड जिल्हा परिषदेत शेकापने कधीही 23 जागा जिंकल्या नव्हत्या, तो चमत्कार यावेळी प्रथमच घडला असून आम्ही शब्द दिल्याप्रमाणे कमी सदस्य निवडून येऊन देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसला अध्यक्षपद दिले आहे.त्यावर टीका होईल परंतु आम्ही बांधिलकी आणि दिलेला शब्द नेहमी पाळतो. "

"  नीलिमा पाटील यांच्यावर त्या निर्णयामुळे अन्याय झाला असेल पण पुढील जिल्हा परिषद अध्यक्षा या नीलिमा पाटील असतील" , असे जाहीर करून   जयंत पाटील पुढे म्हणाले , "पनवेल महापालिकेत आम्हाला सत्ता मिळाली नाही, परंतु शेतकरी कामगार पक्षाच्या इतिहासात एखाद्या महापालिकेत आम्ही पहिल्यांदा 27 जागा जिंकल्या आहेत. हे काही थोडके नाही. "

" देश आज भांडवलदारांच्या हातात गेला असून सत्तेवर बसलेल्या आरएसएसचे किती लोक स्वातंत्र्य चळवळीत होते याचा अभ्यास केला तर एकही नाही असे उत्तर मिळते. त्यामुळे देशासाठी त्याग करणारे बाजूला गेले असून देश स्वातंत्र्य होण्यासाठी खरे योगदान देणारा  कॉंग्रेस पक्ष आज अडगळीत पडला आहे . काँग्रेसला   वाचविणे ही आमची जबाबदारी आहे ."

  जयंत पाटील म्हणाले , " देश भांडवलदारांच्या जोखडातून सोडविण्यासाठी कॉंग्रेस बरोबर आमची डावी चळवळ अधिक तीव्र करण्याची गरज असून त्यासाठी डाव्या विचारांच्या पक्षांना एकत्र करण्याची गरज निर्माण झाली आहे.आम्ही रायगड वर वरचष्मा राखला असून आम्हीच रायगडचे राजे आहोत आणि त्यात कोकणात आम्ही शिरकाव करीत आहोत .

  पुणे जिल्ह्यात शेकापचा आमदार आम्हाला निवडून आणयचा आहे,त्यासाठी शिस्तबद्ध बांधणी सुरू आहे . आम्ही आता चौथ्या पिढीकडे सूत्रे दिली आहेत, हे संपूर्ण राज्यात शेकापच्या नेतृत्वाने या आधी केले असते तर शेकापचे 25 हुन अधिक आमदार राज्यात निवडून येत राहिले असते. 

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाची सुरुवात नेरळ गावातून मिरवणूक काढून झाली, त्या मिरवणुकीत 100 हुन अधिक घोडे आणि बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. तर प्रमुख नेते हे रथावर स्वार झाले होते. मुख्य सभामंडपात उभारण्यात आलेली क्रांतीज्योत शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी प्रज्वलित केली,तर ध्वजारोहण पुणे जिल्हा चिटणीस राहुल पोकळे यांच्या हस्ते करण्यात आले. 

वार्षिक अहवाल वाचन जिल्हा चिटणीस आणि विधान परिषद सदस्य बाळाराम पाटील यांनी केले. यावेळी माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस मंडळाची घोषणा केली असून रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांची नवीन जिल्हा चिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली. 

यावेळी रायगड, ठाणे, पुणे, मुंबई आणि औरंगाबाद जिल्ह्यात अन्य पक्षतील कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला.वर्धापन दिन सोहळ्यात जेष्ठ नेते विवेक पाटील, आमदार धैरशील पाटील,आमदार बाळाराम पाटील,पक्षाचे मुंबई चिटणीस एस व्ही जाधव,पुणे जिल्हा चिटणीस राहुल पोकळे उपस्थित होते

डाव्या चळवळीचे मिलिंद रानडे, माजी मंत्री मीनाक्षी पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील,सभापती डी बी पाटील,नारायण डामसे, नगरध्यक्ष प्रशांत नाईक, जेष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत जयवंत, लक्ष्मण पेमारे, विलास थोरवे,कर्जत तालुका चिटणीस सुदाम पेमारे,नवीन तालुका चिटणीस प्रवीण पाटीलआदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com