Maharashtra Politics Medical Department | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

गिरीश महाजनांच्या पीएंकडे वैद्यकीय कक्षाचा कारभार : अनेकांच्या भुवया उंचावल्या

तुषार खरात
शुक्रवार, 28 जुलै 2017

लोक काहीही आरोप करतात. त्याकडे दुर्लक्ष करून आपण काम करीत राहिले पाहीजे, आणि मी माझे काम चांगल्या प्रकारे करीत आहे. - रामेश्वर नाईक

मुंबई : राज्याच्या कानाकोप-यातील हजारो रूग्णांना मदत मिळवून देणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेट्ये यांची नियुक्ती महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे संचालक या पदावर झाली. त्यामुळे रिक्त झालेल्या 'मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षा'ची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांचे पी.ए. रामेश्वर नाईक यांच्याकडे देण्यात आली आहे.

महाजन यांच्याकडे काम करीत असताना नाईक यांच्याविषयी वैद्यकीय शिक्षण खात्यातील अधिका-यांमध्ये प्रचंड नाराजी होती. असे असताना त्यांच्यावर कारवाई होण्याऐवजी त्यांना एक प्रकारे पदोन्नतीच दिल्याने मंत्रालय वर्तुळात व वैद्यकीय खात्यातील अधिकारी – डॉक्टरांच्या भुवया उंचावल्या आहेत. नाईक हे महाजन यांचे पीए असले तरी वैद्यकीय शिक्षण खात्याचा संपूर्ण कारभार नाईक हेच सांभाळत होते. वैद्यकीय अधिकारी, रूग्णालयांचे अधिष्ठाता यांच्या बैठका घेणे, त्यांना तोंडी आदेश देणे, फाईल्स हाताळणे इतके त्यांचे प्रस्थ या खात्यात पसरले होते. सांगितलेल्या सुचनांचे पालन केले नाही म्हणून नाईक यांनी अनेक अधिष्ठात्यांवर कडक कारवाई सुद्धा केली आहे. अनेकांकडे तर त्यांनी राजीनामे सुद्धा मागितले आहेत, अशी माहिती सूत्रांनी 'सरकारनामा'ला दिली.

विशेष म्हणजे, नाईक हे मंत्र्यांचे पी.ए. असले तरी ते नुकतेच लंडनला एका वैद्यकीय दौ-यासाठी जाऊन आल्याचेही या सूत्रांनी सांगितले. याबाबत, नाईक यांच्याशी संपर्क साधला असता, "लोक काहीही आरोप करतात. त्याकडे दुर्लक्ष करून आपण काम करीत राहिले पाहीजे, आणि मी माझे काम चांगल्या प्रकारे करीत आहे.'' असे त्यांनी सांगितले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख