maharashtra politics blog | Sarkarnama

राजकीय वळणांचे केंद्रबिंदू 

अतुल क.तांदळीकर 
रविवार, 30 सप्टेंबर 2018

राजकारणात काहीही घडू शकतं केव्हां काय घडेल याचा नेम नसतो.हे निरंतर चालत आलं आहे.गेल्या दोन दशकात तर सामान्यांना हे घडू शकतं याचा सहज अंदाज आलेला असतो.प्रकाश आंबेडकरांनी एमआयएमचे ओवेसी यांच्याशी केलेला घरोबा, हर्षवर्धन देशमुखांची लोकसभा लढण्याची महत्वाकांक्षा, भाजपचे हेवीवेट गडकरींच्या गावात भाजपचा पराभव,,आंबेडकरांच्या सभेमुळे सुशिलकुमार शिंदेंना धडकी या घडामोडी अनेक वळणांचे केंद्रबिंदू आहेत..

या घडामोडींमुळे काय होणार याचा अंदाज आलेला असला तरी त्यामुळे राज्यातील राजकारणाची चव बिघडणार की रूचणार हे पाहणे देखील औत्सुक्‍याचे ठरणार आहे. प्रकाश आंबेडकरांनी दलित व्होट बॅंक आपल्या ताब्यात ठेऊन राज्यातील राजकीय पक्षांच्या नेत्यांपुढे निवडणूक काळात नेहमीच आव्हान कायम ठेवले आहे. मुस्लीमांची व्होट बॅंक काबीज करणारे एमआयएमचे ओवेसी यांच्याशी हातमिळवणी करून त्यांनी त्यांच्या व्होट बॅंकेवर निर्भर असणाऱ्या प्रमुख राजकीय पक्षांना धडकी भरविली आहे. 

सोलापूरातील आंबेडकरांच्या सभेतील गर्दीने हे सिद्ध केले आहे.ओवेसींच्या सभांचे देखील असेच परिणाम असतात, जळगाव महापालिका निवडणूकीसाठी आपल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ ऐनवेळेवर येऊन केवळ एक सभा घेणाऱ्या ओवेसींनी आपल्या पक्षाच्या तीन उमेदवारांना महापालिकेत धाडले आहे, हा इतिहास जुना नाही. त्याउलट गडकरींच्या गावात भाजपचा पराभव होणे ही गोष्ट दखल घेण्यासारखी नाही असे म्हणणे देखील योग्य ठरणार नाही. 

या घडामोडींमुळे राज्यातील राजकारणाची दिशा बदलू शकते, या राजकीय घडामोडी पक्षांना स्वस्थ बसू देणाऱ्या नाहीत,आधीच उमेदवारांची वानवा असलेल्या या राजकीय पक्षांना अशा घडामोडींपासून सावध करणाऱ्या या घडामोडी आहेत. 

भविष्यात राजकीय वातावरण आणखी गतिमान होणार आहे, राजकारणाची वाटचाल नेहमीच असामान्य असते. 
नुकतीच मुंबईत भाजपा आणि त्या अगोदर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची बैठक आटोपली आहे,यात या नेत्यांनी जे चिंतन केले आहे त्याचा रोख पाहता सध्या विरोधक असणाऱ्या पक्षांना एकजूट दाखविण्याशिवाय आणि सत्तेत असलेल्या पक्षाला आपल्या कामगिरीस लोकांपुढे प्रभावीरित्या नेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. हे सर्व सत्तेत येण्यासाठी उतावीळ आहेत मात्र त्यांचे स्वत:च संभ्रमात असणे हे लोकांसाठी गोंधळात टाकणारे आहे. 

विरोधक खोटे आरोप करीत असल्याचे सत्तेतील नेते आता लोकांना सांगत आहेत, तर सत्ताधाऱ्यांनी राज्याची वाट लावल्याचे विरोधक सांगत आहेत.अद्याप निवडणूका घोषित झालेल्या नाहीत मात्र येणारा काळ त्याची प्रतीक्षा करतोय,राष्ट्रवादी,भाजप,कॉंग्रेस,शिवसेना या चार प्रमुख पक्षांच्या सभोवती घुटमळणारे राजकारण आंबेडकर-ओवेसींच्या मिलनाने जसे चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे तसे ते येणाऱ्या काळात अनेक अनाकलनीय घडामोडींनी ढवळून निघेल यात संदेह नाही. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख