पक्षाच्या गोटात : 'बसप' आणि 'सप' आघाडी होण्याची शक्यता कमीच

समाजवादी आणि बहुजन समाज पक्ष यांची राष्ट्रीय पातळीवर आघाडी फिस्कटल्याने महाराष्ट्रात त्यांनी वेगळी चूल मांडल्यास आश्‍चर्य नाही. समाजवादी पक्षाच्या कॉंग्रेस आघाडीसोबत वाटघाटी सुरू आहेत.
पक्षाच्या गोटात : 'बसप' आणि 'सप' आघाडी होण्याची शक्यता कमीच

हुजन समाज पक्ष (बसप) आणि समाजवादी पक्ष (सप) यांनी हातात हात घालून लोकसभेची निवडणूक लढवली होती; मात्र राष्ट्रीय पातळीवर फारसे रंग भरले गेले नसल्याने ही आघाडी दुभंगली आहे. बहुजन समाजाची मते दलित उमेदवारांना मिळत नसल्याची टीका करत बसपच्या अध्यक्ष मायावती यांनी 'सप'ला रामराम केला. उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या पोटनिवडणुकीतही हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत त्यांच्या आघाडीची शक्‍यता मावळली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा पातळीवर त्यांच्या स्वतंत्र बैठकाही सुरू आहेत. 

'सप'ला तगडा स्पर्धक 
झोपडपट्टीतील मतदारांना आकर्षित करणाऱ्या "सप'ला महाराष्ट्रात 'एमआयएम'च्या रुपाने तगडा स्पर्धक मिळाला. इतकेच नव्हे, तर एमआयएमचा राज्यातला पहिला खासदारही औरंगाबादमधून निवडून आल्याने सपचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्यासमोर पक्षविस्ताराचे जबरदस्त आव्हान आहे. अशा स्थितीत सपला कॉंग्रेसच्या आधाराची गरज वाटणे साहजिकच आहे. किंबहुना, सद्यःस्थितीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही सपची गरज अधिक आहे. सपने धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत जाण्याची तयारी दाखवली आहे. त्यादृष्टीने आझमी यांच्या कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत काही बैठकाही झाल्या. त्यात कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपस्थित होते. सपने कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे आठ ते 10 जागांची मागणी केली आहे. या जागांवर एकमत झाले, तर सप आघाडीसोबत जाण्याची शक्‍यता आहे; मात्र गतवेळच्या विधानसभा निवडणुकीवेळी आघाडीचे गुऱ्हाळ अखेरपर्यंत सुरू राहिले आणि सप आघाडीबाहेर राहिला. मानखुर्द विधानसभा मतदारसंघाच्या एका जागेवर सपला यश मिळवता आले. 

'बसप'चे बैठकांचे सत्र 
बहुजन समाज पक्षाने प्रत्येक जिल्ह्यात बैठकांचे सत्र सुरू केले आहे. इतकेच नव्हे, तर मुंबईतील 36 विधानसभा जागांवर प्रत्येकी तीन उमेदवारांची यादीही तयार असल्याची माहिती पक्षाचे मुंबई अध्यक्ष सुरेश विद्यासागर यांनी दिली. विधानसभा निवडणुकीत 288 मतदार संघ बसप लढवणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधारे बसपने मतदारसंघाची 'ए', 'बी' आणि 'सी' अशी वर्गवारी केली आहे. लोकसभा निवडणुकीत 20 हजारांहून अधिक मतदान झालेल्या विधानसभा मतदारसंघांकडे अधिक लक्ष दिले जाणार आहे. बसपने असे एकूण 45 मतदारसंघ निवडल्याचेही विद्यासागर यांनी सांगितले. 16 ऑगस्टनंतर उमेदवार निश्‍चित करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचेही ते म्हणाले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com