सरकारनामा विशेष : उद्धव ठाकरें साठी शरद पवारांचा 'मेघे-मेटे' फॉर्म्युला..! 

राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य होण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवे डावपेच रचले आहेत. उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर पाठवण्यासाठी २००० सालचा 'मेघे - मेटे' फार्म्यूला वापरून महाविकास आघाडी सरकार वरचे संशयाचे ढग दूर करण्याचा यशस्वी डाव टाकला आहे
Sharad Pawar Took Lead to Save Uddhav Thackeray's Chair
Sharad Pawar Took Lead to Save Uddhav Thackeray's Chair

मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या विधानसभा अथवा विधान परिषदेचे सदस्य नसल्याने शपथविधीनंतर सहा महिन्यांच्या आत त्यांना या दोन्ही सभागृहाचे सदस्य होणे बंधनकारक आहे.  मात्र कोरोना च्या साथीमुळे विधान परिषदेच्या निवडणुका अनिश्चितकाल पुढे ढकलल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन्हीपैकी एका सभागृहाचे सदस्य होणे अवघड झाल्याचे दावे करण्यात येत होते.

अशा परिस्थितीत राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य होण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवे डावपेच रचले आहेत. उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर पाठवण्यासाठी २००० सालचा ' मेघे - मेटे' फार्म्यूला वापरून महाविकास आघाडी सरकार वरचे संशयाचे ढग दूर करण्याचा यशस्वी डाव टाकला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २८ मे २०२० पर्यंत कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य होणे बंधन कारक आहे. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नेमणुका अगोदरच रोखल्या आहेत. तर, विधानसभेतून विधान परिषदेत जाणाऱ्या सदस्यांच्या निवडणुका देखील निवडणूक आयोगाने लांबणीवर टाकल्या आहेत. 

त्यामुळे उद्धव ठाकरे यांना 28 मे च्या अगोदर विधानसभा अथवा विधान परिषद या दोन्ही सभागृहा पैकी एकाही सभागृहाचे सदस्यत्व मिळाले नाही तर त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.  मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राजकारणातील चाणक्य शरद पवार यांनी यामध्ये तोडगा काढत उद्धव ठाकरे यांना रिक्त झालेल्या राज्यपाल नियुक्त जागेवर विधान परिषद सदस्य म्हणून पाठवण्याचे नियोजन केले आहे.  यासाठी सन २००० सालच्या दत्ता मेघे आणि विनायक मेटे यांच्या निवडीचा आधार घेतला आहे. 

काय आहे 'मेघे' - 'मेटे' फार्म्युला?

ऑक्टोबर १९९९ मध्ये युतीचे सरकार गेल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या लोकशाही आघाडीचे सरकार राज्यात आले. यावेळी दत्ता मेघे आणि गंगाधर गाडे यांना मंत्रिमंडळात स्थान दिले.  मात्र, हे दोघे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. त्यामुळे पुढील सहा महिन्यात विधानसभा अथवा विधानपरिषद यापैकी एका सभागृहाचे सदस्य होणे हे या दोघांसाठी बंधनकारक होते.  पण सहा महिने होत आल्यानंतरही या दोघांना कोणत्याही सभागृहाची जागा रिक्त होत नसल्याने अडचणीत भर पडली आणि मंत्रिपदावर पाणी फेरेल की काय अशी शंका घेतली जाऊ लागली.  पण शरद पवार यांनी राज्यपाल नियुक्त विनायक मेटे यांना विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा द्यायला लावला आणि एक जागा रिकामी केली.  

विनायक मेटे यांनी २० एप्रिल २००० ला विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागेवर 26 एप्रिल 2000 ला दत्ता मेघे यांचा राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य म्हणून शपथविधी पार पडला  आणि दत्ता मेघे यांचे मंत्रिपद वाचले. याच सूत्राचा आधार घेत शरद पवार यांनी विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य म्हणून २८ मे च्या अगोदर शपथ विधी करण्याची ची तयारी केली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद वाचणार तर आहेचस पण महा विकास आघाडी सरकार साठी हा सर्वात मोठा दिलासा देखील मानला जात आहे. 

सध्या राज्यपाल नियुक्त कोट्या मधून राष्ट्रवादीच्या दोन जागा रिक्त आहेत. यामध्ये यापैकी एका जागेसाठी उद्धव ठाकरे यांना राज्यपालांनी विधान परिषद सदस्य नियुक्त करावे असा ठराव आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आला. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हे स्वतः मंत्रिमंडळ बैठकीसाठी उपस्थित नव्हते. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रिमंडळ बैठक घेण्याचे सर्वाधिकार त्यांनी दिल्यानंतर अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य यासाठी शिफारस करण्यात आली. 

भाजपचा दावा खोटा ठरणार?

भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरे यांना कोणत्याही एका सभागृहाचे सदस्यत्व सहा महिन्यात मिळणार नाही, असा दावा केला असताना शरद पवार यांच्या चाणक्यनीति ने हा दावा धुळीस मिळवल्याचे मानले जाते.  मंत्रिमंडळाने केलेला ठराव राज्यपालांनी जसाच्या तसा स्वीकारावा, असे संकेत आहेत. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य म्हणून लवकरच शपथविधी देतील, असे सांगितले जाते. मात्र राज्यपालांनी हा मंत्रिमंडळाचा निर्णय पाळला नाही, तर मात्र न्यायालयीन लढाईला सामोरे जाऊन भारतीय जनता पक्षाच्या राजकीय भूमिकेबाबत संशय निर्माण करता येईल येईल, असे जाणकारांना वाटते.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या या बैठकीत उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त म्हणून विधानपरिषद सदस्यत्व देण्याबाबतची शिफारस राज्यपालांना मान्य करावीच लागेल. त्यामुळे २८ मे च्या अगोदर उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेचे सदस्य झाल्याने त्यांचे मुख्यमंत्रिपद कायम राहील. अर्थातच महा विकास आघाडी सरकारचे मंत्रिमंडळ कायम राहील.  

भारतीय जनता पक्षाच्या राजकीय डावपेचांना ओळखून शरद पवार यांनी या अगोदर झालेल्या घटनांचा आधार घेत म्हणजेच मेघे मेटे सूत्राचा आधार घेत उद्धव ठाकरे यांना २८ मे च्या अगोदर विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ घेण्याचे आणि महाविकास आघाडी सरकारचे घट्ट बंधन कायम असल्याचा संदेश देण्याचे डाव खेळल्याची चर्चा सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com