पक्षाच्या गोटात - स्वाभिमानी शेतकरी संघटनेपुढे आव्हान ताकद दाखवण्याचे 

संस्थापकांच्याच धक्कादायक पराभवामुळे धक्का बसलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसमोर विधानसभा निवडणुकीत ताकद दाखवण्याचे आव्हान असेल. हे आव्हान कायम राखताना जायचे कोणासोबत हा मोठा पेच असेल. कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन अपेक्षित जागा मिळण्याची शक्‍यता नसल्याने दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते "चार्ज' करण्यासाठी तिसरी आघाडी हाच पर्याय असेल.
 पक्षाच्या गोटात - स्वाभिमानी शेतकरी संघटनेपुढे आव्हान ताकद दाखवण्याचे 

राज्यात किंवा देशात सरकार कोणाचेही असो टीका करायची ती पक्षप्रमुखांवरच ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांची रणनिती. आघाडी सरकारच्या काळात शेती प्रश्‍नावरून त्यांनी तत्कालिन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावरच हल्लाबोल केला. या जोरावर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ते भाजपच्या जवळ गेले. त्यातून त्यांनी लोकसभेचे मैदानही मारले.

पण काही दिवसांतच भाजपसोबत मतभेद झाल्यानंतर त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते कॉंग्रेस आघाडीसोबत राहिले. या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. संघटनेच्या संस्थापकांचाच पराभव झाल्याने कार्यकर्त्याना मानसिक धक्का बसला. यातून कार्यकर्त्यांना उभारी देण्याचे आव्हान त्यांच्यासोबत असेल.

विधानसभेला सामोरे जाताना जायचे कोणासोबत? हा त्यांच्यासमोरचा मोठा प्रश्‍न आहे. लोकसभेला श्री. शेट्टी हे "वंचित'चे उमेदवार असते तर कदाचित निवडूनही आले असते असे राजकीय विश्‍लेषक सांगतात. त्यामुळे विधानसभेला "वंचित' हा त्यांच्यासमोर जवळचा पर्याय आहे. तथापि अलीकड त्यांची उठबस ही कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत दिसत आहे.

कॉंग्रेस आघाडीसोबत राहिल्यास जिल्ह्याचा विचार केल्यास शिरोळशिवाय त्यांना एकही जागा मिळणार नाही. शिरोळच्या जागेवरही आघाडी ठाम राहिल्यास उमेदवार आघाडीचा आणि चिन्ह संघटनेचे अशी लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेलाही होऊ शकते. त्यासाठी या मतदार संघातील संघटनेचे बिनीचे शिलेदार सावकर मादनाईक यांना शांत करावे लागेल. राज्यात 35 जागा लढवण्याचा त्यांचा विचार असला तरी एवढ्या जागा आघाडी त्यांना देईल का हाही प्रश्‍न आहे. दुसरीकडे श्री. शेट्टी यांचे चळवळीच्या माध्यमातून राजकारणात यशस्वी झाल्यामुळे आपल्याला कोठेतरी संधी मिळेल अशी आशा त्यांच्यासोबत 15-20 वर्षे काम केलेल्या कार्यकर्त्यांना आहे.

त्यातून जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, भगवान काटे असो किंवा राजेंद्र गड्ड्यानवार, सावकर मादनाईक यांची राजकीय महत्त्वकांक्षा लपलेली नाही. आघाडीत ती संधी शक्‍य नसल्याची जाणीव त्यांनाही आहे. म्हणून शेट्टी "वंचित'चा पर्याय स्वीकारण्याची शक्‍यता आहे. संघटना टिकवायची असेल किंवा संघटनेच्या हक्काची मते मिळवायची असतील तर त्यांना कॉंग्रेस आघाडीपेक्षा "वंचित' जवळचा पर्याय आहे. कोल्हापूर जिल्ह्यात संघटनेची ताकद राहिली तरच राज्याच्या इतर भागात संघटनेचे अस्तित्त्व दिसणार आहे. 

शेट्टी विधानसभा लढणार नाहीत 
लोकसभेनंतर माजी खासदार शेट्टी शिरोळ विधानसभा लढवतील अशी चर्चा होती; मात्र, पुण्यातील राज्य कार्यकारीणीच्या बैठकीत त्यांनी आपण विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याचा खुलासा करून त्यावर पडदा टाकला. देशातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती आणि शेती मालाला उत्पादन खर्चावर दिडपट हमीभाव हे त्यांच्या अजेंड्यावरील महत्त्वाचे प्रश्‍न आहे. या प्रश्‍नावरूनच भाजपने त्यांचा ताकतुंबा केला. त्यामुळे भाजपासोबत ते अजिबात जाण्याची शक्‍यता नाही. संघटनेत फूट पाडून भाजपानेही श्री. शेट्टी यांच्या विरोधातील पर्याय तयार केले आहेत. या सर्वांवर मात करून संघटना मजबूत आणि एकसंघ ठेवण्याचे मोठे आव्हान श्री. शेट्टी यांच्यासमोर असेल.

राजू शेट्टी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com