Maharashtra Political News Nashik Chagan Bhujbal | Sarkarnama

भुजबळांनी सळो की पळो करून सोडले असते...

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

आघाडी सरकारच्या काळातील गर्भवती महिलांसाठीच्या योजना शासनाने बंद पाडल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील कुपोषित गर्भवती मातांचे प्रमाण वाढले आहे. कुपोषित नवजात बालकांचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. आरोग्यसंदर्भात शासन पूर्णतः उदासीन असून, याचा शासनाला आगामी हिवाळी अधिवेशनात जाब विचारला जाईल.
- चित्रा वाघ, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेस

नाशिक : आजचे सरकार अत्यंत निष्क्रीय आहे. लोकांच्या जीव गेल्याशिवाय त्यांना जाग येत नाही. खोट्या घोषणा करण्यात त्यांना धन्यता वाटते. आज छगन भुजबळ राजकारणात सक्रीय असते तर त्यांनी या सरकारला सलो की पळो करुन सोडले असते असा दावा राष्ट्रवादी काँसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला आहे.

नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, ''राज्यशासन आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्यात कोणताही समन्वय नाही. त्याचाच प्रत्यय बालमृत्यू प्रकरणातून पुन्हा आला आहे. प्रशासनाने पाठपुरावा करून झोपलेल्या शासनाने उपाययोजना केल्या नाहीत. 55 बालके दगावल्यानंतर शासन सी-पॅप आणि इन्क्‍युबेटर वाढविण्याचे आदेश देत आहे. आठवडाभरात वृक्षतोडीचा प्रश्‍नही मार्गी लावणार असल्याचे सांगते आहे. यापूर्वीच हे झाले असते, तर किमान बालकांचा जीव वाचला असता. एकीकडे नाशिक दत्तक घेण्याची भाषा करतात आणि आठवडाभरामध्ये मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री, शहराच्या तिन्ही आमदारांना घटनेचे गांभीर्य नाही,''

''राज्यातील जिल्हा रुग्णालयांमध्ये पुरेशा सोयीसुविधा नाहीत. इन्क्‍युबेटर्सची संख्या वाढविण्यात आलेली नसून त्यासंदर्भातील पाठपुरावा प्रशासनाकडून केला गेला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी ज्या शहराला दत्तक घेतले आहे, त्याच नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात एकाच महिन्यात 55 नवजात बालके दगावली. नवजात बालकांचे बळी गेल्यानंतर सरकारला जाग आली हेच खरे असून, राज्याचे युती शासन हे असंवेदनशील आहे,'' अशी टीकाही त्यांनी केली.  
 
नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात नवजात बालमृत्यूसंदर्भात आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, आमदार दीपिका चव्हाण, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, राष्ट्रवादी शहर युवती काँग्रेसच्या प्रेरणा बलकवडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नाना महाले, हिरामण खोसकर यांनी जिल्हा रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. या वेळी चित्रा वाघ यांनी जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. होले, एसएनसीयू कक्षाचे प्रमुख डॉ. पंकज गाजरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांच्याशी चर्चा केली. त्यांनी एसएनसीयू कक्षात जाऊन प्रत्यक्ष दाखल असलेल्या बालकांची पाहणी केली. त्यानंतर चित्रा वाघ यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., महापौर रंजना भानसी, महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेऊन शहर-जिल्ह्यातील नवजात बालकांच्या आरोग्यसंदर्भात आणि कुपोषणासंदर्भात माहिती घेतली.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख