पक्षाच्या गोटात : राष्ट्रवादी कॉंग्रेस - नव्या दमाचे चेहेरे देण्याचे मोठे आव्हान!

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी गेल्या काही दिवसांत पक्षाचा झेंडा सोडून भाजप-शिवसेनेची सत्ता जवळ केली आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश मतदारसंघात राष्ट्रवादीकडे नावाजलेला चेहरा अपवादानेच आढळत आहे. अशा ढासळलेल्या अवस्थेत राष्ट्रवादीला आगामी विधानसभा निवडणुकांना सामोरे जायचे आहे.
पक्षाच्या गोटात : राष्ट्रवादी कॉंग्रेस - नव्या दमाचे चेहेरे देण्याचे मोठे आव्हान!

राष्ट्रवादी काँग्रेसची 1999 मध्ये स्थापना झाल्यापासून 2014 पर्यंत 15 वर्षांत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे महाराष्ट्राची सत्ता होती. केंद्रातील सत्तेत 10 वर्षांचा वाटा, सहकारी बॅंकावर एकहाती वचक, निम्म्याहून अधिक स्थानिक स्वराज्य संस्थावर पक्षाचा झेंडा... तरीही गेल्या पाच वर्षांत या पक्षाची झालेली वाताहत इतर कोणत्याही पक्षापेक्षा सर्वाधिक ठरली. "आभाळच फाटलंय, तर ढिगळ लावणार तरी कुठं'' अशी अवस्था पक्षाची झाली आहे. देशातील राजकीय समीकरणे जुळवण्याची क्षमता असलेले पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची 'पॉवर' आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना कितपत 'ऊर्जा' देऊ शकेल, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी गेल्या काही दिवसांत पक्षाचा झेंडा सोडून भाजप-शिवसेनेची सत्ता जवळ केली आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश मतदारसंघात राष्ट्रवादीकडे नावाजलेला चेहरा अपवादानेच आढळत आहे. अशा ढासळलेल्या अवस्थेत राष्ट्रवादीला आगामी विधानसभा निवडणुकांना सामोरे जायचे आहे. शेतकरी अन्‌ कामगार ही राष्ट्रवादीची सर्वात मोठी 'व्होट बॅंक'; पण हा मतदारही पक्षापासून दुरावत असल्याचे चित्र 2014 पासून दिसू लागले. ग्रामीण मतदारांवर राष्ट्रवादीची मदार होती. त्यामुळे सुरुवातीपासूनच शहरी मतदारांवर फारसे लक्ष केंद्रीत केले गेले नाही. पिंपरी चिंचवड आणि नवी मुंबईसारख्या महानगरांचा अपवाद सोडल्यास इतर सर्व मोठ्या शहरांत राष्ट्रवादीची स्थिती चिंताजनकच होती. 

2014 पासून त्यात आणखी भर पडत गेली. सहकार पट्ट्यातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे हे राष्ट्रवादीचे बालेकिल्ले होते; पण गेल्या पाच वर्षांत या जिल्ह्यांतून राष्ट्रवादीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागत आहे. पुरोगामी व धर्मनिरपेक्ष संघर्षात या सर्व जिल्ह्यांचे योगदान मोठे राहिले आहे. सध्या कट्टर, उजव्या विचारांच्या पक्षाने मारलेली बाजी राष्ट्रवादीसाठी धोक्‍याची घंटा आहे. 
एकीकडे ढासळता जनाधार आणि दुसरीकडे शहरी मध्यमवर्गातील नाराजी या कात्रीत राष्ट्रवादी अडकली असताना पक्षांतर करणाऱ्यांचे धक्‍के सहन करण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली आहे. पक्षातील प्रमुख नेत्यांची वाढते वयं आणि दुसऱ्या फळीतील नेत्यांचे नवखेपण यातून जनमानसात नव्या दमाचे विश्‍वासार्ह चेहरे देण्याचे मोठे आव्हान आता राष्ट्रवादीसमोर आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसला सर्वाधिक फटका घराणेशाहीमुळे बसला. सामान्य कुटुंबातील नव्या चेहऱ्यांना संधीपासून कायम दूर राहावे लागल्याचा आरोप या पक्षावर होतो. काही अपवाद सोडल्यास घराणेशाहीची मोठी किंमत राष्ट्रवादीला चुकवावी लागली, हे नाकारता येत नाही. काही दिग्गज घराण्यातील नेत्यांनी पक्षांतर करत राष्ट्रवादीला धक्का दिला. अशा प्रस्थापित घराण्यांसमोर नवे नेतृत्व निर्माण करण्याचे आव्हान राष्ट्रवादीला पेलावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com