पक्षाच्या गोटात - कॉंग्रेस : मामा-भाच्यांवर पक्ष सावरण्याची मदार!

खरे पाहता पक्षाच्या पुनरुज्जीवनाची मदार मामा-भाच्यावर आहे. युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे हे थोरातांचे भाचे आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात तरुण-तरुणींची फळी आक्रमक झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे युवकांच्या संघटनेतील मरगळ दूर होईलही. खरी अडचण आहे ती प्रौढ कॉंग्रेसजनांमध्ये विश्‍वासाचा अभाव असल्याची आणि सोबतच तळागाळात आक्रमक 'फूटसोल्जर्स' नसण्याची.
पक्षाच्या गोटात - कॉंग्रेस : मामा-भाच्यांवर पक्ष सावरण्याची मदार!

नरेंद्र मोदींची प्रचंड लाट असतानाही कॉंग्रेसला गेल्या निवडणुकीत 42 जागा मिळाल्या. असे मानले जाते की सहकारातील दबदबा व अन्य कारणाने ते पक्षाचे बालेकिल्ले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचेही बहुदा असेच आहे. परंतु, आता पक्षांतराच्या लाटेत हे बालेकिल्लेच ढासळताहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुलाच्या खासदारकीसाठी पक्ष सोडला आणि गळती सुरू झाली. ती थांबण्याचे नाव घेईना. 

गेल्यावेळच्या जागा दुप्पट करणे हे दोन्ही कॉंग्रेसचे स्वप्न आहे आणि घाऊक पक्षांतराचा विचार केला तर ते दिवास्वप्न ठरण्याचीच अधिक शक्‍यता आहे. विदर्भ, मराठवाडा व कोकणात कॉंग्रेसपुढील आव्हान अधिक मोठे आहे. गेल्यावेळी ११ जिल्ह्यांमध्ये कॉंग्रेसची पाटी कोरी राहिली. त्यात यवतमाळ, भंडारा, गडचिरोली विदर्भातील, जालना, बीड, परभणी मराठवाड्यातील तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी कोकणातील. नंतर नारायण राणेंच्या भाजप प्रवेशामुळे तांत्रिकदृष्ट्या सिंधुदुर्गही हातून गेला. 

लोकसभा निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचाच पराभव झाला. शिवसेनेतून पक्षात आलेल्या बाळू धानोरकरांच्या चंद्रपूरमधल्या विजयाने राज्यात पाटी कोरी राहण्याची नामुष्की टळली. पक्षाने विखेंचे शेजारी बाळासाहेब थोरात यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यांच्या जोडीला डॉ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, मुझफ्फर हुसेन, बसवराज पाटील व विश्‍वजीत कदम अशा पाच कार्याध्यक्षांना नेमण्यात आले.

परंतु, या टीमला पक्षाचा राज्यात विस्कटलेला संसार सावरण्यासाठी अवघा एक महिना मिळालाय. तीन-तीन माजी मुख्यमंत्री आणि अनेक ज्येष्ठ माजी मंत्र्यांची फळी असलेल्या पक्षात अनेकांचे अहंकार जोपासत, रुसवेफुगवे काढत गेल्या महिनाभरात बैठका, मेळाव्यांच्या माध्यमातून संघटनेत जीव ओतण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, सगळ्या मेळाव्यांमध्ये निवडणुकीनंतरच्या पक्षबांधणीवरच थोरात अधिक बोलताहेत. पालवी फुटण्यासाठी झाडाच्या फांद्या तासाव्याच लागतात. कठीण समयी पक्ष सोडून जाणाऱ्यांमुळे ती पालवी फुटेल, असा विश्‍वास व्यक्‍त करताहेत. 

खरे पाहता पक्षाच्या पुनरुज्जीवनाची मदार मामा-भाच्यावर आहे. युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे हे थोरातांचे भाचे आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात तरुण-तरुणींची फळी आक्रमक झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे युवकांच्या संघटनेतील मरगळ दूर होईलही. खरी अडचण आहे ती प्रौढ कॉंग्रेसजनांमध्ये विश्‍वासाचा अभाव असल्याची आणि सोबतच तळागाळात आक्रमक 'फूटसोल्जर्स' नसण्याची. प्रयत्न असे सुरू आहेत, की राष्ट्रवादी कॉंग्रेससोबतची आघाडी कायम ठेवून लढतानाच राजकीय विश्‍वासार्हता तुलनेने कॉंग्रेसमध्ये अधिक असल्याचा मुद्दा अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचवायचा. 

कॉंग्रेसची दिशा... 
- उरलेसुरले बालेकिल्ले वाचवायचे 
- पक्षांतरातून गळतीचे प्रमाण किमान ठेवायचे 
- वंचित बहुजन आघाडीचा फटका चुकवायचा 
- विदर्भ, मराठवाडा, कोकणात संघटन बांधायचे 
- मुंबई व अन्य शहरांमध्ये जुने यश मिळवायचे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com