पवारांची शेतकऱ्यांसाठीची पॉवर कुठं गेली होती : बच्चू कडू

"जेव्हा राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार होते तेव्हा शरद पवार साहेब केंद्रात कृषी मंत्री होते व राज्यातही त्यांचीच सत्ता होती. तेव्हा शेतकऱ्यांसाठीची पवारांची पॉवर कुठे गेली होती?" असा हल्लाबोल आमदार बच्चू कडू यांनी आज येथे केला.
पवारांची शेतकऱ्यांसाठीची पॉवर कुठं गेली होती : बच्चू कडू

अकोला : "जेव्हा राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार होते तेव्हा शरद पवार साहेब केंद्रात कृषी मंत्री होते व राज्यातही त्यांचीच सत्ता होती. तेव्हा शेतकऱ्यांसाठीची पवारांची पॉवर कुठे गेली होती?" असा हल्लाबोल आमदार बच्चू कडू यांनी आज येथे केला.

शेतकरी जागर मंचतर्फे अकोल्यात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात बुधवारी (ता. 6 ) सहभागी होत आमदार बच्चू कडू यांनी केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजप सरकारवर चौफर टीका केली. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसवरही कडू यांनी शरसंधान केले. ते म्हणाले, "2006 मध्ये स्वामिनाथन आयोग आल्यावर त्याचवेळी तो मंजुर झाला असता तर आज हमीभावासाठी शेतकऱ्यांना झगडण्याची वेळ आली नसती. मात्र, तेव्हा सत्तेवर असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने आयोग लागू न केल्यामुळेच शेतकऱ्यांची दैनावस्था झाली आहे. 2006 ते 2014 सत्तेवर असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेत्यांना आता शेतकऱ्यांचा कळवळा आला आहे. मात्र, सत्ता आली तर व्यापारी आणि गेली तर शेतकरी ही काँग्रेस-राष्ट्रवादीची निती आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कारखाने या नेत्यांचेच आहेत. तिकडे आंदोलन केले तर त्यांची गोची होते, म्हणून अजित पवार विदर्भात येऊन आंदोलने करत आहेत."

सध्याच्या भाजप सरकारवर टीका करताना बच्चू कडू म्हणाले, "केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र अद्यापही सुरूच आहे. पण अस्मानी आणि सुलतानी संकटांशी लढतांना आत्महत्या हा काही पर्याय नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ‘तुम मुझे खुन दो, मै तुम्हे आझादी दुंगा’ असे म्हटले होते. आता या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला वठणीवर आणण्यासाठी शेतकऱ्यांनी मरायचं नाही, तर मारायला सज्ज झाले पाहिजे. कुणाच्या मनात आत्महत्येचा विचार येत असेल तर फक्त एक मिस कॉल द्या, तुमच्या हक्कासाठी, लढण्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावून न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही,''

"निसर्गाची अवकृपा आणि सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांची दयनिय अवस्था झाली आहे. वाढती महागाई आणि सरकारच्या अडवणुकीच्या धोरणांमुळे काबाडकष्ट करून पिकविलेल्या धान्य मालाला योग्य हमी भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. कुटुंबांच्या पालन-पोषणाची चिंता, डोक्यावर असलेल्या कर्जाचा वाढता डोंगर कसा दूर करावा, या विवंचनेतून शेतकरी आत्महत्या करतो आहे. पण आत्महत्या हा काही संकटांतून सुटण्याचा मार्ग नाही. आम्ही आत्महत्या करण्यापैकी नसलो पाहिते," असे आवाहन बच्चू यांनी केले.

ते पुढे म्हणाले, "आजकाल चांगल्याचा जमाना राहिलेला नाही. या सरकारला शेतकरी का आत्महत्या करतोय, तो जगतोय कसा? याच्याशी काही देणे-घेणे नाही. त्यामुळे अशा दळभद्री सरकारविरुद्ध पेटून उठत मरायला नाही, तर मारायला तयार व्हा. आम्ही किसान आर्मी तयार करतोय. आता अंतीम लढा द्यावा लागेल. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यावेळी म्हटल्यानुसार आता आम्ही 'खून' काढणाऱ्याची आणि देणाऱ्यांची फौज तयार करतोय. आता शांततेची लढाई करण्यापेक्षा आरपारची लढाई करण्याची वेळ आली आहे,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com