this is maharashtra not delhi says raj thackray | Sarkarnama

दिल्ली दिल्ली आहे,  हा महाराष्ट्र आहे : राज ठाकरे

जगदिश पानसरे
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

..

औरंगाबाद :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फक्त झेंडा बदलला आहे , आमची भूमिका तीच आहे ,आम्ही ती बदललेली नाही. विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करून पाहिले पण त्यावर मतदान मिळत नाही , हे नाशिकमध्ये आम्ही बघितले आहे . पण म्हणून विकासाचा मुद्दा सोडून आम्ही हिंदुत्वाचाच मुद्दा पुढे नेणार आहोत असे नाही .एखादे शहर घडवणे हे माझे पॅशन आहे आणि ते मी करत असतो .त्यामुळे दिल्लीच्या निवडणुकीत मतदारांनी हिंदुत्व नाकारत विकासाच्या मुद्द्यावर मते दिली असे म्हणणे योग्य ठरणार नाही. दिल्ली दिल्ली आहे , हा महाराष्ट्र आहे इथे स्थानिक मुद्दे महत्त्वाचे ठरतील अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली पुढील वाटचाल स्पष्ट केली.

तीन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर असलेले राज ठाकरे यांनी आज पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा केली यावेळी त्यांनी दिल्ली ते गल्ली अशा सर्वच विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली .

शरद पवारांनी राज ठाकरे यांच्यावर नुकत्याच केलेल्या टीकेला देखील यांनी सहजपणे उत्तर देत राजकारणापलीकडे काही नाती असतात ,मैत्री असते ती आम्ही जपतो असे सांगत यावर अधिक बोलणे टाळले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने झेंड्यात बदल करत  प्रखर हिंदुत्वाची भूमिका स्वीकारल्याबद्दल बोलतांना राज ठाकरे म्हणाले, मराठीचा मुद्दा , मशिदीवरील भोंगे , पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरां विषयीची माझी भूमिका ही आजपासूनची नाही. 

अनेक वर्षांपासून मी ही भूमिका घेत आलो आहे .तेव्हा आज माझ्यावर टीका करणाऱ्या राजकीय पक्षांनी किंवा सरकारांनी काय केले? पक्षाच्या झेंड्यातील बदल सोडला तर माझ्या भूमिकेत कुठलाही बदल झालेला नाही . मुंबईत रझा अकादमीने मोर्चा काढून पोलिसांवर हल्ले केले तेव्हा हे सगळेच गप्प का होते ? तेव्हा पोलिसांच्या बाजूने मीच मोर्चा काढला होता ना? तेव्हा भूमिका बदलून सत्तेत जाणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये असा टोला देखील राज ठाकरे यांनी शिवसेनेला लगावला.

औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा शिवसेनेचा मुद्दा मनसेने हायजॅक केला का यावर , मुद्दे हे कायम असतात हिंदुत्वाचा मुद्दा सर्वात आधी जनसंघाने घेतला होता मग तो यांनी हायजॅक केला असे म्हणायचे का?  मुद्दे कालांतराने कायम असतात आणि जो तो ते पुढे घेऊन जात असतो असे राज ठाकरे म्हणाले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख