भविष्याच्या चिंतेमुळे विद्यार्थी तणावग्रस्त; हेल्पलाईनला मिळालेल्या प्रतिसादाचा निष्कर्ष - Maharashtra News Students Worried about their Future due to Corona Lock Down | Politics Marathi News - Sarkarnama

भविष्याच्या चिंतेमुळे विद्यार्थी तणावग्रस्त; हेल्पलाईनला मिळालेल्या प्रतिसादाचा निष्कर्ष

उत्कर्षा पाटील
बुधवार, 15 एप्रिल 2020

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शालेय परीक्षा रद्द झाल्या असून, महाविद्यालयीन परीक्षांबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे परीक्षा, निकाल आणि भवितव्याच्या चिंतेने विद्यार्थ्यांना ग्रासले आहे

मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शालेय परीक्षा रद्द झाल्या असून, महाविद्यालयीन परीक्षांबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे परीक्षा, निकाल आणि भवितव्याच्या चिंतेने विद्यार्थ्यांना ग्रासले आहे. सुमारे 50 टक्‍के विद्यार्थ्यांना याच ताणाचा सामना करावा लागत असल्याचे हेल्पलाईनवर मिळालेल्या प्रतिसादावरून समोर आले आहे.

राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालयांच्या मानसशास्त्र विभागांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दूरध्वनी आणि व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून हेल्पलाईन सुरू केली आहे. या माध्यमाचा वापर करून विद्यार्थ्यांनी ताणाबाबत मानसोपचार तज्ज्ञांशी संपर्क साधला. या ताणातून बाहेर पडण्यासाठी उपाययोजना सुचवा अशी मागणी केली. उच्चशिक्षणाचे काय होणार, मार्ग कसा सापडणार, परिस्थिती आटोक्‍यात येईपर्यंत काय करायचे, असे अनेक प्रश्‍न विद्यार्थ्यांना सतावत आहेत. या सर्व परिस्थितीमुळे त्यांच्यावरील मानसिक ताण वाढला आहे, असे मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले. या विचारांपासून दूर राहण्यासाठी विद्यार्थी स्वतःला ऑनलाईन गेमिंग, वेबसीरिज यांच्यात गुंतवून घेत आहेत, परंतु, स्क्रीन टाइम वाढल्यामुळे त्यांची जीवनशैली विस्कळित झाली आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागाने सुरू केलेल्या व्हॉट्‌सऍप हेल्पलाईनला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा, निकाल आणि शिक्षणासाठी परदेशात जाण्याबाबतचे प्रश्‍न मांडल्याचे प्रा. प्रतिका पेठारे यांनी सांगितले. आजची परिस्थिती कधी बदलणार याबद्दल काही सांगता येत नाही. त्यामुळे अनिश्‍चिततेला कसे सामोरे जायचे, याबाबत विद्यार्थ्यांना समुपदेशन केले जाते. 

विद्यार्थी वळले मोबाईल, आॅनलाईन गेमिंगकडे

अनेक विद्यार्थ्यांनी परदेशी उच्च शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली. त्यातील अनेकांची निवड झाली, परंतु पुढे संबंधित विद्यापीठ, संस्थेने त्यांच्याशी संपर्क साधला नाही. त्यामुळे ते चिंताग्रस्त झाले आहेत. परिणामी हे विद्यार्थी मोबाईल, वेबसीरिज, गेमिंग, समाज माध्यमे, टीव्ही शो यात जास्त वेळ घालवतात. ते मानसिक आरोग्यासाठी घातक आहे. त्यासाठी ऑनलाईन मोफत अभ्यासक्रमांबाबत त्यांना माहिती देणे, काही कार्यशाळा घेणे अशा उपाययोजन करत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.

अनिश्‍चिततेतून प्रश्‍नच प्रश्‍न

क्वारंटाईनमुळे विद्यार्थ्यांची जीवनशैली विस्कळित झाली आहे. परीक्षा अजून झाल्या नसल्याबद्दल त्यांना चिंता वाटते. घरीच असल्याने किती अभ्यास करायचा असा प्रश्‍न पडतो. अनेकांच्या घरात खूप माणसे असल्याने अभ्यास करण्यात अडचणी येतात. अनेकांना झोपेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे, अशी माहिती पुण्यातील ससून जनरल रुग्णालयाच्या क्‍लिनिकल सायकॉलॉजी विषयाच्या प्रा. दीपिका पाटील यांनी दिली. महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, ससून जनरल रुग्णालय, बी. जे. शासकीय मेडिकल महाविद्यालयाचा मनोचिकित्सक विभाग यांनी "मनसंवाद' हेल्पलाईन सुरू केली आहे. कोरोनामुळे शैक्षणिक भविष्याबाबत निर्माण झालेल्या अनिश्‍चिततेमुळे विद्यार्थी तणावग्रस्त आहेत, असे या हेल्पलाईनला मिळालेल्या प्रतिसादातून समोर आले आहे.

स्क्रीन टाईम कमी करा

रात्री उशिरा झोपणे, सकाळी उशिरा उठणे, सतत मोबाईलवर वेळ घालवणे असे प्रकार दिसून येतात. त्यामुळे मेलाटॉनिन या झोपेशी निगडित संप्रेरकावर अनिष्ट परिणाम होतो. म्हणून झोपण्यापूर्वी दोन तास या सर्वांपासून दूर राहिले पाहिजे. तरच झोप नियमित होईल, असे प्रा. दीपिका पाटील म्हणाल्या.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख