गृहखात्याचे प्रधान सचीव सक्तीच्या रजेवर; वाधवांना दिलेली प्रवासाची परवानगी नडली - Maharashtra News IPS Officer Who Gave Letter to Wadhva Family for Travel Sent on Compulsory Leave | Politics Marathi News - Sarkarnama

गृहखात्याचे प्रधान सचीव सक्तीच्या रजेवर; वाधवांना दिलेली प्रवासाची परवानगी नडली

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 10 एप्रिल 2020

लाॅकडाऊन असतानाही डीएचएफएलच्या वाधवा कुटुंबाला लोणावळा ते महाबळेश्वर या प्रवासासाठी दिलेली परवानगी गृहखात्याचे प्रधान सचीव (विशेष) अमिताभ गुप्ता यांना चांगलीच नडली आहे. हे प्रकरण उघडकीला आल्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे

पुणे : लाॅकडाऊन असतानाही डीएचएफएलच्या वाधवा कुटुंबाला लोणावळा ते महाबळेश्वर या प्रवासासाठी दिलेली परवानगी गृहखात्याचे प्रधान सचीव (विशेष) अमिताभ गुप्ता यांना चांगलीच नडली आहे. हे प्रकरण उघडकीला आल्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. 

वाधवा कुटुंबासह २३ जणांना या प्रवासाची परवानगी गुप्ता यांनी आपल्या अधिकृत लेटरहेडवर दिल्याचे उघडकीला आल्यानंतर खळबळ उडाली होती. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. वाधवा कुटुंबियांवर येस बँक व अन्य एका घोटाळ्यात अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. 

दरम्यान या प्रकरणाची चौकशी होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसारअमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याचे ट्वीट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पहाटे दोनच्या सुमारास केले. त्यांच्या विरुद्धची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. 

वाधवा कुटुंबिय हे माझे परिचित असून ते आमचे कौटुंबिक मित्रही आहेत. त्यांना व त्यांच्याबरोबरील लोकांना 'कौटुंबिक आणिबाणी'च्या कारणासाठी खंडाळा ते पाचगणी असा प्रवास करु द्यावा, असे पत्र गुप्ता यांनी दिले होते. त्यात वाधवा यांच्यासह त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांच्या एकूण पाच गाड्यांचे क्रमांक व त्यात असलेले लोक याचाही तपशील देण्यात आला होता. 

जिल्हाबंदीचा आदेश धाब्यावर बसवून हे उद्योजक २३ जणांसह खंडाळ्याहून महाबळेश्वरला पोहोचले होते. ५ गाड्यांमधून हे वाधवा कुटुंब महाबळेश्वरला पोहोचले होते. पण स्थानिकांनी विरोध केल्याने त्यांना पाचगणीतच थांबवण्यात आले. काल मध्यरात्री या सर्वांना ताब्यात घेऊन विलिनीकरण कक्षात ठेवण्यात आले. या सर्वांवर कलम १८८ नुसार वाई पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 

------

आवर्जून वाचा - उद्धव ठाकरेंचे पद वाचवण्यासाठी शरद पवारांनी वापरला हा फाॅर्म्युला....मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या विधानसभा अथवा विधान परिषदेचे सदस्य नसल्याने शपथविधीनंतर सहा महिन्यांच्या आत त्यांना या दोन्ही सभागृहाचे सदस्य होणे बंधनकारक आहे.  मात्र कोरोना च्या साथीमुळे विधान परिषदेच्या निवडणुका अनिश्चितकाल पुढे ढकलल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन्हीपैकी एका सभागृहाचे सदस्य होणे अवघड झाल्याचे दावे करण्यात येत होते.अशा परिस्थितीत राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य होण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवे डावपेच रचले आहेत. उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर पाठवण्यासाठी २००० सालचा ' मेघे - मेटे' फार्म्यूला वापरून महाविकास आघाडी सरकार वरचे संशयाचे ढग दूर करण्याचा यशस्वी डाव टाकला आहे..

पूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख