महाराष्ट्र दिल्ली समोर झुकत नाही हे दाखवून दिले - संजय राऊत 

मी उद्यापासून बोलणार नाही कारण माझ्यावर दिलेली जबाबदारी मी पूर्ण केली आहे. माझे काम आता संपले आहे, मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आता मिशन पूर्ण झाले आहे. - संजय राऊत
महाराष्ट्र दिल्ली समोर झुकत नाही हे दाखवून दिले - संजय राऊत 

 मुंबई : महाराष्ट्र दिल्ली समोर झुकत नाही, तुटत नाही हे दाखवणारी घटना राज्याच्या इतिहासात पुन्हा एकदा घडली आहे. भाजपने अघोरी प्रयत्न करूनही त्यांना आपला मुख्यमंत्री महाराष्ट्रावर लादता आला नाही ,कारण महाराष्ट्राच्या मातीत परिवर्तनाचे बीज रोवलेले आहे, अशा शब्दात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन काल झालेल्या घडामोडी बद्दल सविस्तर प्रतिक्रिया दिली .

संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणे ही एक ऐतिहासिक घटना असून यामुळे देशात परिवर्तनाला एक प्रकारे सुरुवात झाली आहे असे म्हणावे लागेल .

महाराष्ट्राच्या स्थैर्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्रित आले, दिल्लीच्या तख्तापुढे शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र ,शाहू ,फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र कधी चुकत नाही हे पुन्हा एकदा या देशाने पाहिले आहे .

शिवसेनेला सत्तेपासून रोखण्याचे भाजपने केलेले अघोरी प्रयत्न यशस्वी झाले नाही त्यांना या महाराष्ट्रावर आपला मुख्यमंत्री लागता आला नाही असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

आमचे सूर्ययान यशस्वीपणे लँड 

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचे प्रयत्न सुरू असताना मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर शिवसेनेचे सूर्ययान यशस्वीपणे लँड करेल, असा विश्वास मी व्यक्त केला होता. त्यावर विरोधकांनी मोठी टीका केली होती ,मात्र आज ते शब्द आम्ही खरे करून दाखवले आहे ,शिवसेनेचे सूर्ययान मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर यशस्वीपणे लँड झाल्याचे महाराष्ट्रात पाहतोय असा चिमटा राऊत यांनी विरोधकांना काढला.

मी उद्यापासून बोलणार नाही कारण माझ्यावर दिलेली जबाबदारी मी पूर्ण केली आहे. माझे काम आता संपले आहे, मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आता मिशन पूर्ण झाले आहे. पक्षाचे काम वेगळे आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे काम वेगळे असल्याचेही राऊत यांनी सांगितले. आपण शिवसेनेचे चाणक्य आहात का? या पत्रकाराच्या प्रश्नावर मी योद्धा असल्याचे संजय राऊत म्हणाले.




 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com