विधान परिषदेत भाजपचे आता 18 आमदार : जून-जुलैमध्ये सभापतिपद भाजपकडे; विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे - Maharashtra Legislative Council News | Politics Marathi News - Sarkarnama

विधान परिषदेत भाजपचे आता 18 आमदार : जून-जुलैमध्ये सभापतिपद भाजपकडे; विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे

प्रशांत बारसिंग
शुक्रवार, 8 डिसेंबर 2017

नारायण राणे यांच्या राजिनाम्यानंतर रिक्‍त झालेल्या विधान परिषदेतील एका जागेसाठी गुरुवारी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे प्रसाद लाड मोठ्या मताधिक्‍क्‍याने निवडून आले. यामुळे विधान परिषदेतील भाजप आमदारांची संख्या 18 झाली आहे. जून आणि जुलै 2018 मध्ये विधान परिषदेतील 21 जागा रिक्‍त होताना भाजपचे बळ वाढणार आहे. या पार्श्‍वभूमीवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले सभापतिपद भाजपकडे येणार असून, राष्ट्रवादीचे संख्याबळ घटणार असल्याने विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे येणार आहे.

मुंबई : नारायण राणे यांच्या राजिनाम्यानंतर रिक्‍त झालेल्या विधान परिषदेतील एका जागेसाठी गुरुवारी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे प्रसाद लाड मोठ्या मताधिक्‍क्‍याने निवडून आले. यामुळे विधान परिषदेतील भाजप आमदारांची संख्या 18 झाली आहे. जून आणि जुलै 2018 मध्ये विधान परिषदेतील 21 जागा रिक्‍त होताना भाजपचे बळ वाढणार आहे. या पार्श्‍वभूमीवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले सभापतिपद भाजपकडे येणार असून, राष्ट्रवादीचे संख्याबळ घटणार असल्याने विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे येणार आहे.

जून आणि जुलै 2018 मध्ये विधान परिषदेतील 21 जागा रिक्‍त होत आहेत. यात विधानसभा सदस्यांतून निवडून द्यावयाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार, काँग्रेसच्या तीन, भाजपच्या दोन, शिवसेना आणि शेकापच्या प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. विधानसभेत भाजपचे 122, शिवसेनेचे 63, काँग्रेसचे 42 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 असे पक्षीय बलाबल आहे. या निवडणुकीत साडेसव्वीस किंवा 27 मतांचा कोटा गृहीत धरल्यास काँग्रेसच्या दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा निवडून येऊ शकते. गेल्या वेळी काँग्रेसने राष्ट्रवादीसाठी हात सैल सोडल्याने त्याची परतफेड म्हणून राष्ट्रवादीकडील अतिरिक्‍त मतांच्या जोरावर दुसरी जागा काँग्रेसला मिळण्याची शक्‍यता आहे. भाजपला तीन आणि शिवसेनेच्या पारड्यात एक अशा जास्त जागा पडण्याची शक्‍यता आहे.

सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून जयवंतराव जाधव, कोकणातून अनिल तटकरे आणि परभणीतून बाबाजानी दुर्रानी पुन्हा निवडून येतील की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून मात्र निरंजन डावखरे निवडून येतील, असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. त्यामुळे बदललेल्या राजकीय परिस्थितीत लातूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघ काँग्रेसकडून गेला तरी काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिक नुकसान होईल. त्यामुळे जुलै 2018 मध्ये विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडून काँग्रेसकडे येणार असल्याचे स्पष्ट होते.

सभापतिपद भाजपकडे?
या निवडणुकीत विधान परिषदेतील संख्याबळ बदलणार असून राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा भाजपचे संख्याबळ जास्त होईल. परिणामी, सभापतिपद भाजपकडे जाण्याची शक्‍यता आहे.

विधान परिषदेतील सध्याचे संख्याबळ
पक्ष                        सध्याची संख्या
राष्ट्रवादी काँग्रेस              23
काँग्रेस                          19
भाजप                          18
शिवसेना                         9

जून आणि जुलै 2018 मध्ये रिक्‍त होणाऱ्या जागा
1. कॉंग्रेस - विधानसभा सदस्यांतून निवडून द्यावयाच्या जागा - संजय दत्त, शरद रणपिसे आणि माणिकराव ठाकरे
लातूर स्थानिक स्वराज्य संस्थांतून निवडून द्यावयाची जागा - दिलीप देशमुख, एकूण - 4
2. राष्ट्रवादी - विधानसभा सदस्यांतून निवडून द्यावयाच्या जागा - जयदेव गायकवाड, सुनील तटकरे, नरेंद्र पाटील आणि अमरसिंह पंडित
स्थानिक स्वराज्य संस्था - जयवंतराव जाधव, अनिल तटकरे, बाबाजानी दुर्रानी आणि निरंजन डावखरे, एकूण - 8
3. भाजप -  विधानसभा सदस्यांतून निवडून द्यावयाच्या जागा - भाई गिरकर आणि महादेव जानकर
स्थानिक स्वराज्य संस्था - प्रवीण पोटे आणि नितेश भांगडिया, एकूण- 4
4. शिवसेना - विधानसभा सदस्यांतून निवडून द्यावयाच्या जागा - अॅड. अनिल परब, मुंबई पदवीधरमधून - डॉ. दीपक सावंत, एकूण- 2
5. अन्य जागा - जयंत पाटील- शेकाप, अपूर्व हिरे- भाजपसमर्थक अपक्ष, कपिल पाटील- लोकभारती.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख