Maharashtra Governor Bhagtsingh Koshyhari Speech in Legislature | Sarkarnama

महिलांची सुरक्षा, रोजगार निर्मीती : राज्यपालांच्या अभिभाषणात व्यक्त झाला नव्या सरकारचा संकल्प

सरकारनामा ब्युरो
रविवार, 1 डिसेंबर 2019

राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठराव काल मंजूर झाला. त्यानंतर आज राज्यपालांनी आज दोन्ही विधीमंडळाच्या सभागृहांना आपल्या भाषणातून संबोधित केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे दुपारी विधानभवनात आगमन झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या अभिभाषणातून नव्या सरकारचे संकल्प मांडले.

मुंबई : महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची जीवन पुन्हा उभे करणे, स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये ऐंशी टक्के आरक्षण असे महाविकास आघाडीच्या नव्या सरकारचे अनेक संकल्प राज्यपालांच्या अभिभाषणातून आज व्यक्त झाले. 

राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठराव काल मंजूर झाला. त्यानंतर आज राज्यपालांनी आज दोन्ही विधीमंडळाच्या सभागृहांना आपल्या भाषणातून संबोधित केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे दुपारी विधानभवनात आगमन झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या अभिभाषणातून नव्या सरकारचे संकल्प मांडले.

सीमा भागातील नागरिकांच्या महाराष्ट्रात विलिन होण्याच्या भावनेचा यावेळी पुनरुच्चार करण्यात आला. सीमा भागातील मराठी नागरिकांच्या हक्कांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे राज्यपालांनी यावेळी स्पष्ट केले. सरकारला हवामान बदलांमुळे होत असलेल्या परिणामांची पूर्ण कल्पना असून त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

शिक्षण महागडे झाले आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील मुलींना उच्चशिक्षण मोफत देण्यासाठी शासन उपाययोजना करेल. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी जिल्ह्यांच्या ठिकाणी वसतीगृहे बांधली जातील. अंगणवाडी सेविकांना सेवा सक्षम करण्यासाठी त्यांना अधिक सुविधा दिल्या जातील, तसेच महिला बचत गटांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असेही राज्यपाल म्हणाले.  प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सुधारण्यास सरकारचे प्राधान्य राहील, असेही त्यांनी सांगितले. 

राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण सरकारला असल्याचेही राज्यपालांनी यावेळी स्पष्ट केले. पश्चिम महाराष्ट्रात महापुरामुळे मोठे नुकसान. दुष्काळाला सामोरे जावे लागले. पाऊस लहरी झाला आहे. प्रचंड अवकाळी पावसामुळे ३४९ गावांतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना मदत करण्यास शासन वचनबद्ध आहे. पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांना मदत केली जाईल, तसेच शेतमालाला भाव मिळण्यासाठी उपाययोजना केल्या जातील असेही ते म्हणाले. मराठवाड्यातील अवर्षणग्रस्त भागासाठी शाश्वत पाणी पुरवठा योजना शासन हाती घेईल, असेही राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले. 

राज्यात रोजगार निर्मितीसाठी रिक्त असलेल्या सरकारी नोकऱ्यांतील जागा भरण्याच्या हालचाली सुरु केल्या जातील तसेच स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के आरक्षण देण्याचा कायदा केला जाईल, असेही राज्यपाल म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख