19 फेब्रुवारीच्या शिवजयंतीवर महाराष्ट्र सरकारने असे शिक्कामोर्तब केले..

...
chatrapati-shivaji-mahajra
chatrapati-shivaji-mahajra

पुणे : शिवजयंती तिथीनुसार फाल्गुन वद्य तृतीयेला साजरी न करता इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे 19 फेब्रुवारीला साजरी करण्याची भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेनेसमोर मांडली आहे. इंग्रजी कॅलेंडरला विरोध करीत 19 फेब्रुवारीऐवजी मराठी तिथीनुसार फाल्गुन वद्य तृतीयेचा आग्रह धरणारी शिवसेना सत्तेत आल्यानंतर आता नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवजयंतीला 19 फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्लयावर जातील. मात्र, इतकी वर्षे 19 फेब्रुवारीला विरोध करणारा पक्ष म्हणून ते काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे.  शिवसेना तसेच राज्यातील इतर बहुतांश सार्वजनिक संस्था व गणेश मंडळे तिथीनुसार फाल्गुन वद्य तृतीयेला साजरी करतात. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून राज्यात दोन शिवजयंती साजरी करण्यात येतात. परिणामी एक सरकारची व एक जनतेची शिवजयंती अशी स्थिी सध्या महाराष्ट्रात आहे. तिथीप्रमाणे फाल्गन वद्य तृतीयेला शिवजयंती साजरी करणाऱ्यांची संख्या राज्यात अधिक आहे. सर्वांनी एकाच दिवशी म्हणजे 19 फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करावी, अशी मागणी गेल्या काही वर्षापासून करण्यात येत आहे. अनेक संस्था त्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. शिवजयंती अधिक व्यापक प्रमाणात देशभर साजरी व्हावी ही या मागील प्रमुख भूमिका आहे. यासाठी इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे 19 फेब्रुवारीला सर्वांनी शिवजयंती साजरी करावी, अशी भूमिका मांडण्यात येत आहे.

या संदर्भात इतिहासाचे अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी दिलेली माहिती महत्वपूर्ण आहे. ते म्हणाले, ""आपल्याकडे इंग्रजी सत्तेच्या आधी महापुरूषांची जयंती किंवा पुण्यातिथी तिथीनुसार केली जात होती. इंग्रजी सत्ता भारतात स्थिर झाल्यानंतर (1818) इंग्रजांच्या प्रोटेस्टंट कॅलेंडरप्रमाणे इंग्रजी कालगणनेप्रमाणे कामकाज करण्यात येऊ लागले. त्यामुळे या काळानंतरच्या सर्व गोष्टी आपण इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे मोजू लागलो. मात्र, त्याआधीही सर्व सण, समारंभ आपण मराठी तिथीप्रमाणे साजरे करीत होतो. शिवजयंतीबाबत मराठी तिथीमध्येदेखील दोन प्रवाह आहेत. सुरवातीला अनेक वर्षे वैशाख शुद्ध द्वितीयेला शिवजयंती साजरी करण्यात येत होती. जेधे शकावली व परमानंदाच्या शिवभारतातील नोंदीप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया ही तिथी पुढे आली. बिकानेरमधील राजस्थान दप्तरात छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मकुंडली सापडली. या जन्मकुंडलीनुसार फाल्गुन वद्य तृतीया ही शिवजन्माची तारीख असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. यामुळे जेधे शकावली व शिवभारतातील नोंदीला आणखी पुष्टी मिळाली. फाल्गुन वद्य तृतीया व वैशाख शुद्ध द्वितीया या दोन तिथीमुळे इतिहास संशोधकांमध्ये दोन मतप्रवाह होते. अनेक वर्षे यावर चर्चा सुरू होती. मात्र, 1925 सालापासून इतिहास संशोधन मंडळाने फाल्गुन वद्य तृतीयेला शिवजयंती साजरी करण्यास सुरवात केली होती. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी इतिहास संशोधकांची समिती नेमली. या समितीने ऐतिहासिक साधनांचा संपूर्ण अभ्यास केला. त्याआधारे राज्य सरकारला अहवाल सादर केला. समितीतील पाच सदस्यांपैकी तीन सदस्यांनी फाल्गुन वद्य तृतीया तर एका सदस्याने वैशाख शुद्ध द्वितीया ही शिवाजी महाराजांची जन्मतिथी निश्‍चित केली. एक सदस्य तटस्थ राहिला. मात्र, निर्णय एकमताने व्हावा, अशी सरकारची भूमिका होती. समितीचा निर्णय एकमताने झाला नाही. त्यामुळे राज्य सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही. या समितीच्या निष्कर्षावर अभ्यास करून तारीख निश्‍चित करण्यासाठी युती सरकारच्या काळात तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. या समितीने तिथीप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया व 19 फेब्रुवारी ही इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे शिवजन्माची तारीख निश्‍चित केली. त्यावर विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी अंमलबजावणी केली. तेव्हापासून राज्य सरकारच्यावतीने दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करण्यात येऊ लागली.''

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांचा विलासराव देशमुख यांच्याशी स्नेह होता. त्यामुळे त्यांनी हा सारा घटनाक्रम जवळून पाहिला आहे. या संदर्भात संपर्क साधला असता, पवार म्हणाले, " शिवजयंतीच्या संदर्भात वास्तवदर्शी निर्णय घेण्यासाठी युती सरकारच्या काळात तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. या समितीने यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या समितीचे निष्कर्ष तपासले व अभ्यासपूर्वक आपला अहवाल दिला. तोपर्यंत राज्यात विलासाराव देशुमख यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आले होते. विलासारांवानी पुढाकार घेऊन या समितीच्या शिफारशींच्या आधारे 19 फेब्रुवारी ही तारीख स्वीकारून राज्य सरकारने दर वर्षी या दिवशी शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला.तिथीप्रमाणे फाल्गुन वद्य तृतिया हा महाराजांच्या जयंतीचा दिवस असला तरी देशभर व देशाबाहेर शिवजयंती साजरी होण्यासाठी इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे एक तारीख आपण निश्‍चित करायला हवी, अशी भूमिका त्यावेळी विलासरावांनी घेतली. समितीने दिलेल्या निष्कर्षाच्या आधारे निर्णय घेऊन तातडीने अंमलबजावणी करण्याची क्षमता विलासराव देशमुख यांनी दाखवल्याने ऐतिहसिकदृष्टया अत्यंत महत्वाच्या विषयावर प्रत्यक्ष निर्णय झाला.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com