Maharashtra Bandh Vidarbha Gave Good response to Bandh | Sarkarnama

#MaharashtraBandh विदर्भात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद - एसटीची चाके थांबली 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

नागपुरात काही महिन्यांपूर्वी निघालेल्या मराठा मूक मोर्चाला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. यामुळे महाराष्ट्र बंदला कसा प्रतिसाद मिळेल, याबद्दल आयोजकांमध्ये साशंकता होती. परंतु यावेळी समाजातील विविध घटक मराठा आरक्षणासाठी सरसावल्याने नागपूरसह विदर्भातील शहरांमध्ये बंद यशस्वी ठरला आहे.

नागपूर : ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दिलेली हाळी विदर्भात यशस्वी झाली. नागपूरसह विदर्भातील प्रमुख शहरातील प्रमुख बाजारपेठा बंद आहेत. तसेच विदर्भात वाहतुकीचे मुख्य साधन असलेल्या एसटीची चाके आगराबाहेर न पडल्याने वाहतूक थांबली आहे. खासगी बस चालकांनी बंदला पाठिंबा दिला आहे. तसेच नागपूर, अमरावती व यवतमाळ याशहरांमध्ये ऑटोचालक संघटनांनीही बंदला पाठिंबा दिल्याने बाजारपेठा व रस्त्यांवर शुकशुकाट आहे. 

नागपुरात काही महिन्यांपूर्वी निघालेल्या मराठा मूक मोर्चाला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. यामुळे महाराष्ट्र बंदला कसा प्रतिसाद मिळेल, याबद्दल आयोजकांमध्ये साशंकता होती. परंतु यावेळी समाजातील विविध घटक मराठा आरक्षणासाठी सरसावल्याने नागपूरसह विदर्भातील शहरांमध्ये बंद यशस्वी ठरला आहे. अमरावतीमध्ये प्रमुख चौकात काही जणांनी टायर जाळून निषेध व्यक्त केला. परंतु, विदर्भात अद्यापही हिंसक घटनेचे वृत्त आलेले नाही. 

नागपूर शहरातील महाल भागात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सकाळी 10 वाजता महाआरती करण्यात आली. नागपूरकर भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसले यांच्या नेतृत्वात ही महाआरती करण्यात आली. यावेळी जय शिवाजी, जय भवानी अशा घोषणा देण्यात आल्या. भगवे ध्वज यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात होते. नागपुरातील मुख्य बाजारपेठही महाल भागातच आहे. या बाजारपेठेतील दुकाने आज उघडली नाही. सकाळी 10 वाजेपासून वर्दळ राहणाऱ्या या भागात आज सामसूम होती. 

नागपूर आगरातून आज एसटीच्या फेऱ्या झाल्या नाहीत. तसेच विदर्भातील इतर शहरातूनही एसटी आलेल्या नाही. यवतमाळ आगरातील 384 बसफेऱ्या आज रद्द करण्यात आल्याचे तेथील आगरप्रमुखांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख