महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्षाची वॉररूम पुण्यात उभारणार ?

पक्षाचा विस्तार, जिल्हा-जिल्ह्यांत कार्यालये, सोशल मीडियाची कास धरणे आणि यंत्रणा प्रभावी करण्यावर भर देत रासप आपली ताकद दाखवू पाहात आहे.
mahadev_jankar
mahadev_jankar

मुंबई : समाजमाध्यमांचा वाढता वापर आणि काळानुरूप 'हायटेक' होत जाणारा प्रचार लक्षात घेत राष्ट्रीय समाज पक्षानेही (रासप) 'कात' टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 'रासप'ची राज्यात सध्या 12 जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र कार्यालये असून, लवकरच उर्वरित जिल्ह्यांत कार्यालये थाटण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. समाजमाध्यमांचा वापर सुरू करण्याबरोबरच मुंबई किंवा पुणे येथे लवकरच "रासप'ची "वॉर रूम' उभारली जाणार आहे. पूर्णवेळ प्रशिक्षित कार्यकर्त्यांवर याची जबाबदारी दिली जाणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी 'रासप'ने भाजपकडे 52 जागांची मागणी केली आहे. शिर्डीत झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीनंतर या जागांची यादीच भाजपकडे पाठवण्यात आली आहे. त्यानुसार पक्षविस्तार आणि कार्यकर्त्यांचे जाळे विणण्यासाठी बूथ बांधणीही सुरू करण्यात आली आहे. पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी 2003 मध्ये स्थापन केलेल्या "रासप'चा येत्या 25 ऑगस्ट रोजी स्थापना दिन आहे. सत्ताधारी युतीचा घटक असल्याने या पक्षाच्या विधानसभा निवडणुकीनिमित्त अपेक्षा वाढणे स्वाभाविकच आहे.

2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासूनच राष्ट्रीय समाज पक्ष भाजपसोबत आहे. "रासप'ने आता भाजपकडे 52 जागांची मागणी केली असली, तरी किमान 25 जागा मिळतील, अशी अपेक्षा पक्षाला आहे. त्यादृष्टीने लवकरच भाजपच्या नेत्यांशी बोलणी सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मागील विधानसभा निवडणुकीत भूम-परांडा, दौंड, माण-खटाव, कळमनुरी आणि गंगाखेड या पाच जागा "रासप'ने लढवल्या होत्या. त्यात दौंडची जागा राहुल कुल यांनी जिंकली होती. कुल यांच्या पत्नी कांचन यांनीच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यंदा भाजप किती जागा देणार, याकडे "रासप'च्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. भाजपबरोबर जागा वाटप पूर्ण झाल्यानंतर पक्ष पातळीवरील घडामोडींना आणखी वेग येणार आहे.

महादेव जानकर यांना पक्षाचा विस्तार वाढवत किमान प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळवायचा आहे. त्यामुळे जागा वाटपात जास्तीत जास्त जागा पदरात पाडून त्या जिंकून आणण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे; मात्र भाजपकडून त्यांना किती जागा सोडल्या जातात, यावरच सारे काही अवलंबून आहे. मित्रपक्षांनी 'कमळ' चिन्हावर निवडणूक लढावी, असे भाजपला वाटते; मात्र स्वतंत्र चिन्हावर लढण्याचा हट्ट जानकर धरू शकतात. त्यांचा हा हट्ट पुरवणे भाजपला थोडे जड जाण्याची शक्‍यता आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com