भाजपच्या महालाशेजारी 'रासप' ही झोपडी : जानकर

भाजप हा महाल असला, तरी आमचा राष्ट्रीय समाज पक्ष त्याच्याशेजारील झोपडी आहे. त्यामुळं भाजपनं आमच्या झोपडीचा आदर करावा. जमलंच तर झोपडी शेकरायला तणसाच्या पेंड्या द्याव्यात. त्यामुळंच मी कमळाच्या चिन्हावर लढण्यास ठाम नकार दिला. नाहीतर मला बारामती अथवा माढ्यातून उमेदवारी मिळत होती. पण, मला कमळाच्या चिन्हापेक्षा 'कप-बशी' चिन्हावर लढायचं होतं.- महादेव जानकर
भाजपच्या महालाशेजारी 'रासप' ही झोपडी : जानकर

भाजप हा महाल असला, तरी आमचा राष्ट्रीय समाज पक्ष त्याच्याशेजारील झोपडी आहे. त्यामुळं भाजपनं आमच्या झोपडीचा आदर करावा. जमलंच तर झोपडी शेकरायला तणसाच्या पेंड्या द्याव्यात. त्यामुळंच मी कमळाच्या चिन्हावर लढण्यास ठाम नकार दिला. नाहीतर मला बारामती अथवा माढ्यातून उमेदवारी मिळत होती. पण, मला कमळाच्या चिन्हापेक्षा 'कप-बशी' चिन्हावर लढायचं होतं. त्यामुळं मी ठाम नकार दिला, अशा शब्दांत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी 'सकाळ'चे प्रतिनिधी सिद्धेश्‍वर डुकरे यांच्याशी बोलताना भूमिका मांडली. त्यांच्या मुलाखतीचा अंश -

प्रश्‍न : घटकपक्षांना भाजपने वाऱ्यावर सोडले. लोकसभेसाठी तुम्हाला उमेदवारी का नाही दिली?
उत्तर : हे बघा, वाऱ्यावर वगैरे सोडलेलं नाही. मी स्वाभिमानी आहे. मला उमेदवारी देत होते बारामती, माढ्यातून. पण, मला कमळाच्या चिन्हावर लढायचंच नव्हतं. कारण, माझाही पक्ष आहे. तो मला जिवंत ठेवायचाय. 2014 मध्ये माझं दैवत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे मला किती वेळा आग्रह करीत होते, तरीही मी बारामतीतनं कमळाच्या चिन्हावर लढलो का? नाही. मग आता कसा लढणार?

प्रश्‍न : लोकसभेला संधी नाही; मग आता पुढे काय?
उत्तर : लोकसभेला संधी नाही, असं नाही. आमच्या कांचनताई बारामतीतून भाजपच्या चिन्हावर लढत आहेतच की. आता राज्यापुरतं बोलायचं तर विधानसभेवर फोकस केलंय. याची वसुली करणार की भाजपकडून! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. माझ्या पक्षाला विधानसभेसाठी जागा देणार, असा त्यांनी शब्द दिलाय.

प्रश्‍न : तुम्ही विधानसभेला कशाच्या आधारावर जागा मागणार?
उत्तर : म्हणजे, आमची ताकद नाही का? आमच्या पक्षानं आतापर्यंत तीन आमदार, शंभरावर नगर परिषद सदस्य, पंधराच्या आसपास सभापती मिळवलेत. हे कमी आहे का? पुढील काळात पक्षवाढीसाठी झंझावात सुरू करणार आहे.

प्रश्‍न : तुमच्या पक्षाने इतर राज्यांत उमेदवार उभे केलेत, खरे आहे का? त्यांच्या प्रचारासाठी जाणार का?
उत्तर : उत्तर प्रदेशात आमच्या पक्षाकडून 22 जण, राजस्थानात नऊ, गुजरातमध्ये 11 जणांनी उमेदवारी केली आहे. कर्नाटकात पाच आणि तमिळनाडू व केरळात प्रत्येकी दोघे रिंगणात आहेत. ओडिशात एक माजी खासदार आमच्या पक्षाकडून लढताहेत, त्यांच्या प्रचारासाठी जाणार आहे.

प्रश्‍न : धनगर समाजासाठी सरकारने काय केले?
उत्तर : धनगर समाजाला सरकारनं सवलती दिल्यात. समाजाच्या आदिवासी आरक्षणाबाबत प्रयत्न केलेत. महत्त्वाचं म्हणजे आदिवासी समाजबांधवांना मिळणाऱ्या सर्व सवलती धनगर समाजाला दिल्यात. फडणवीस सरकार धनगर समाजासाठी नक्‍कीच भरीव कार्य करणार आहे.

प्रश्‍न : भाजपला काय सांगणार आहात?
उत्तर : हे पाहा, भाजप हा महाल आणि राष्ट्रीय समाज पक्ष त्याच्याशेजारील झोपडी आहे. त्यांनी झोपडीचा आदर ठेवावा. आमची ताकद पाहून विधानसभेला किमान 12 जागा मिळाव्यात.

राजकीय घडामोडींच्या बित्तंबातमीसाठी - www.sarkarnama.in
सरकारनामा ट्वीटर - https://twitter.com/MySarkarnama
सरकारनामा फेसबूक - https://www.facebook.com/MySarkarnama/

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com