21 तारखेनंतर बॅगा भरुन ठेवा!

पदाधिकारी निवडीसाठी महाविकास आघाडीच्या सदस्यांची बस जिल्हा परिषदेत येणार आहे. मात्र ही बस चालवणे मला शक्‍य होणार नाही. त्यामुळे ही बस पी. एन. साहेबांनी चालवावी, असे आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगताच बैठकीत एकच हशा पिकला. गत अध्यक्ष निवडीत भाजपच्या बसचे सारथ्य तत्कालिक खासदार धनंजय महाडिक यांनी केले होते. या संदर्भाने आमदार मुश्रीफ यांनी टोला लगावल्याची चर्चा सदस्यांमध्ये होती.
mahaaaghadi strategy for kolhapur zp president
mahaaaghadi strategy for kolhapur zp president

कोल्हापूर : राज्यात ज्याप्रमाणे महाविकास आघाडीची सत्ता आली आहे तोच फॉर्म्युला जिल्हा परिषदेतही असणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेत सत्ता परिवर्तन अटळ असून सत्तेत महाविकास आघाडीच येणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सदस्यांनी भाजप सदस्यांशी संपर्क ठेवून गैरसमज निर्माण करु नये, अशा सुचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी दिल्या.

जिल्हा बॅंकेत कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत आमदार मुश्रीफ व कॉंग्रेसचे आमदार पी.एन.पाटील यांनी मार्गदर्शन केले.

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची प्रक्रिया गतिमान झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने 21 डिसेंबर रोजी निवड होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही तारीख बदलण्यात यश मिळवले. आता जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या निवडी होणार आहेत. असे असले तरी सदस्यांमध्ये मात्र अस्वस्था आहे. गटातटाने एकमेकांशी संपर्क करुन सदस्य पदाधिकारी निवडीची चर्चा करु लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांना एकत्र करत बुधवारी (ता.11) आमदार मुश्रीफ व आमदार पाटील यांनी पदाधिकारी निवडीबाबत मार्गदर्शन केले.

आमदार मुश्रीफ म्हणाले, राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अशी महाविकास आघाडी अस्तित्वात आली आहे. या आघाडीने राज्यात सत्ता स्थापन केली आहे. यानुसार आता जिल्ह्या-जिल्ह्यातही अशी आघाडी होणार आहे, त्यामुळे कोणीही चिंता करण्याचे कारण नाही. जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीत ही आघाडी असणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचीच सत्ता येणार आहे. गेल्या अडीच वर्षात आघाडीच्या सदस्यांचे भाजप सदस्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी निवड होईपर्यंत भाजप सदस्यांशी संपर्क टाळा, अशी सुचना त्यांनी या बैठकीत केली.

बैठकीस कॉंग्रेसचे राहूल पाटील, सुभाष सातपुते,सरिता खोत यांचे पती शशिकांत खोत, शिल्पा पाटील यांचे पती चेतन पाटील, सविता चौगले, पांडुरंग भांदिगरे, भगवान पाटील, बजरंग पाटील उपस्थित होते. तर राष्ट्रवादीतून युवराज पाटील, जयवंतराव शिंपी, सतीश पाटील, विजय बोरगे, मनोज फराकटे, प्रियांका पाटील यांचे चुलते बाबासाहेब पाटील, विनय पाटील, परवीन पटेल, शिल्पा खोत व शिवसेनेच्या स्वाती सासने उपस्थित होत्या. वंचित आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढलेले जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील हे देखील बैठकीस उपस्थित होते.

आज कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले होते. यापैकी चंदगडचे अरुण सुतार व सचिन बल्लाळ हे चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीमुळे अनुपस्थित होते. मात्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य आणि कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचे कटटर समर्थक उमेश आपटे यांची अनुपस्थिती मात्र चांगलीच चर्चेत होती. त्यांच्या अनुपस्थिीबाबत कोणीच खुलासा केला नाही. तर रेश्‍मा राहूल देसाई या देखील अनुपस्थित होत्या. मात्र सदस्यांनी देसाई यांच्याशी संपर्क झाला असून ते घरगुती कार्यक्रमानिमित्त बाहेर असल्याचे सांगितले.

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सदस्यांनी 21 तारखेनंतर बॅगा भरुन ठेवाव्यात. कोणत्याही क्षणी सर्व सदस्यांना सहलीसाठी जावे लागणार आहे, अशी सुचना आमदार पी.एन.पाटील यांनी केली. तर आजारी असल्याचे कारण कोणत्याही सदस्याने देवू नये. वेळ पडली तर पाच-पाच तज्ञ डॉक्‍टरांची व्यवस्थाही केली जाईल, असे आ.मुश्रीफ यांनी या बैठकीत सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com