mahaaaghadi in mahrashtra | Sarkarnama

भाजपचा वारू रोखण्यासाठी राज्यात पुन्हा आघाडीचीच गरज

संजीव भागवत : सरकारनामा न्यूज ब्युरो
सोमवार, 27 मार्च 2017

मुंबई : राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्‍नावर उघडे पडलेले असल्याने राज्यात मध्यावधी विधानसभेच्या निवडणुकांच्या चर्चांनाही उधाण आले आहे. भाजपकडून यासाठी अनेक अफवा पसरवल्या जात असून आपल्या पक्षात इतर पक्षातील आमदार येणार असल्याचा दावा केला जात आहे.

मुंबई : राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्‍नावर उघडे पडलेले असल्याने राज्यात मध्यावधी विधानसभेच्या निवडणुकांच्या चर्चांनाही उधाण आले आहे. भाजपकडून यासाठी अनेक अफवा पसरवल्या जात असून आपल्या पक्षात इतर पक्षातील आमदार येणार असल्याचा दावा केला जात आहे.

अशा स्थितीतच राज्यात खरोखर निवडणुकांना सामोरे जाण्याची वेळ आली तर मागील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढविलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला मात्र आता आपली आघाडी होणे ही काळाची गरज वाटत आहे. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी राज्यात पुन्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससह इतर समविचारी पक्षाची आघाडी झाली पाहिजे, असे मत दोन्ही पक्षातील नेत्यांकडून व्यक्‍त केले जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या आघाडीसाठी आता दोन्ही पक्षांनी पुढाकार घ्यावा आणि त्यासाठी चर्चाही सुरू झाली पाहिजे असेही अनेक नेत्यांना वाटते. 

राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्वतंत्र निवडणुका लढविल्या. या निवडणुकांमध्ये त्यांच्या मतांचे विभाजन झाल्यानेच भाजपला अनेक ठिकाणी यश आले. हीच बाब मागील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही झाल्याने आता काळात या दोन्ही निवडणुकांना सामोरे जातात दोन्ही पक्षांची आघाडी होणे आवश्‍यक बनले आहे. यासंदर्भात विविध नेत्यांशी संपर्क साधला असता त्यांनी महाआघाडीचीच बाजू लावून धरली. 
आघाडी होणे ही काळाची गरज: धनंजय मुंडे 
मागील विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी केली असती तर मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या असत्या. आता राज्यातील स्थिती लक्षात घेतली तर राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका होण्याची शक्‍यता आहे. या निवडणुका झाल्यास भाजपला रोखणे हे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पहिले टार्गेट असणार आहे. यासाठी राज्यात दोन्ही पक्षांनी पुन्हा आघाडी करणे हा एकच पर्याय असून आघाडी करणे ही दोन्ही पक्षासाठी सर्वांत मोठी काळाची गरज आहे. यासाठी दोन्ही पक्ष सकारात्मक पाऊल उचलतील यासाठी पक्षश्रेष्ठीही त्या दृष्टीने निर्णय घेतील असे वाटते. 
आघाडीसाठी चर्चा व्हावी- पृथ्वीराज चव्हाण 
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी दोन्हीही पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. यासाठी दोन्ही पक्षांची आघाडी होणे आवश्‍यक असून त्यासाठी चर्चाही झाली पाहिजे. आता सरकारला दोन्हीही पक्षांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर कोंडीत पकडलेले असल्याने या पार्श्‍वभूमीवर काढण्यात येणाऱ्या संघर्ष यात्रेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आम्ही सर्वांना आवाहन आवाहन करत आहोत. 
मतविभाजन रोखले तर भाजप मागे पडते- नवाब मलिक 
विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुका लागल्या तर आम्ही कॉंग्रेससह इतर समविचारी पक्षांना एकत्र घेऊन निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी आहे. भाजप सत्तेवर आले ते केवळ आमच्या आघाडी आणि समविचारी पक्षांच्या मतविभाजनाचा फायदा घेऊन. आम्ही एकत्र असतो तर भाजपला सत्ता मिळालीच नसती. यामुळे राज्यात येत्या काळात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला रोखणे हा आमचा विषय नाही तर आम्ही एकत्र आलो तरी भाजप आपोआप मागे पडते. यामुळे आमचे मत विभाजन होणार नाही, यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससह इतर समविचारी पक्षाची आघाडी होईल आणि आम्ही सर्व एकत्र येऊ. 
समविचारी पक्षांनी एकत्र यावे- रत्नाकर महाजन 
मध्यावधी निवडणुका होतील असे वाटत नाही. मात्र आगामी निवडणुकांसाठी कॉंग्रेससह राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि इतर समविचारी पक्षांना एकत्र घेऊन काम करण्याची गरज आहे. मुद्यावर दोन्ही पक्ष हे चांगले काम करण्यासाठी एकत्र येतील असे वाटते. त्यासाठी चर्चा सुरू होण्याची गरज आहे. 
कॉंग्रेसने पुढाकार घ्यावा- सुनील तटकरे 
आम्ही नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी आणि नंतरही कॉंग्रेससोबत एकत्र आलो आहोत. आता 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी दोन्ही पक्षांनी एकत्र आले पाहिजे, यासाठी चर्चा झाली पाहिजे. कॉंग्रेसने मोठा भाऊ म्हणून स्वतः: पुढाकार घेण्याची गरज आहे. राज्यात ज्याप्रमाणे राजकीय अस्थिरतेचे वातावरण निर्माण झालेले आहे, त्यादृष्टीने दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याची नितांत गरज असल्याचेही तटकरे यांनी सांगितले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख