महाशिवआघाडी इफेक्ट : नारायण राणेंची जिल्हा बॅंकेत अडचण 

जिल्हा बॅंकेवर राणेंना पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्यास महाशिवआघाडीचा मोठा अडसर निर्माण झाला आहे.
narayan rane
narayan rane

वैभववाडी :   राज्यात नावलौकीक असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेवरून विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांना हटवुन पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या खासदार नारायण राणेंच्या प्रयत्नांना नव्याने आकाराला येत असलेल्या महाशिवआघाडीमुळे खीळ बसली आहे.

श्री. सावंत यांना हटविण्याइतके संचालकांचे संख्याबळ भाजपाकडे नसल्यामुळे तुर्तास जिल्हा बॅंकेत सत्तांतर कठीण असल्याचे मानले जात आहे.

जिल्हयातील बहुतांशी सत्ताकेंद्रे खासदार नारायण राणेंच्या अधिपत्याखाली होती. यामध्ये जिल्हा परिषद, जिल्हा बॅंक या महत्वाच्या दोन संस्था राणे समर्थकांच्या ताब्यात होत्या. विधानसभा निवडणुकीत राणेंचे समर्थक आणि जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी राणेंची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला.

त्यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघातुन आमदार नितेश राणेंच्या विरोधात निवडणुक लढविली. या निवडणुकीत सावंतांचा  पराभव झाला. श्री. सावंत यांनी साथ सोडल्यानतंर तत्काळ जिल्हा बॅंकेत सत्तांतर होण्याच्या चर्चेला सुरूवात झाली. मुंबई बॅंकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी तर जिल्हा बॅंकेचे पुढील अध्यक्ष अतुल काळसेकर असतील असे अनेक सभांमध्ये जाहीर करून टाकले.

जिल्हा बॅंकेवर गेल्या काही वर्षापासुन राणेंचेच प्राबल्य होते. श्री. सावंत शिवसेनेत गेल्यामुळे त्यांना हटवुन पुन्हा बॅंकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या हालचाली सुरू होत्या; मात्र जिल्हा बॅंकेत सावंतांना मानणारा संचालकांचा मोठा वर्ग आहे. बॅंकेचे 19 संचालक असुन त्यातील बहुसंख्य विविध पक्षाचे सक्रीय सदस्य आहेत. 

ज्यावेळी जिल्हा बॅंकेचे निवडणुक झाली त्यावेळी नारायण राणे कॉग्रेसमध्ये होते. त्यावेळी कॉंग्रेसचे 13 संचालक निवडुन आले होते. राष्ट्रवादी कॉग्रेसचे 5 तर भाजपाचा एक संचालक निवडुन आला होता. राणेंनी कॉंग्रेस सोडली त्यावेळी मुळ कॉग्रेसच्या तीन संचालकांनी कॉंग्रेसमध्येच राहणे पसंत केले. उर्वरित दहा संचालकांनी राणेसोबत राहण्याचा निर्णय घेतला. 

राणेसोबत असलेल्या संचालकांपैकी निम्म्याहुन अधिक आता श्री. सावंतांसोबत आहेत अशी चर्चा आहे. त्यातच आता राज्यात शिवसेना,राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांची महाशिवआघाडी आकारास येत आहे.राज्यातील राजकीय समीकरणानुसार जिल्हा बॅंकेत कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे 8 तर सतीश सावंत यांच्यासोबत किमान पाच पेक्षा अधिक संचालक असल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे जिल्हा बॅंकेवर राणेंना पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्यास महाशिवआघाडीचा मोठा अडसर निर्माण झाला आहे. जिल्हा बॅंकेची निवडणुक येत्या जुनमध्ये होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जिल्हा बॅंक ताब्यात घेण्यासाठी आता भाजपाला निवडणुकीची वाट पाहावी लागण्याची शक्‍यता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com