छत्रपती शाहूंच्या घराण्यातील मधुरिमाराजे यांच्यासाठी कॉंंग्रेसचे प्रयत्न

छत्रपती शाहूंच्या घराण्यातील मधुरिमाराजे यांच्यासाठी कॉंंग्रेसचे प्रयत्न

कोल्हापूर ः कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या पत्नी मधुरिमाराजे छत्रपती यांनी कॉंग्रेसची उमेदवारी घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. अखिल भारतीय कॉंग्रेसकडूनच या घडामोडी सुरू आहेत. प्रदेश कॉंग्रेसच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कासाठी प्रयत्न सुरू आहेत.

अलीकडच्या काळातील 2004 चा अपवाद वगळता हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. यापूर्वी (कै.) दिलीप देसाई यांनी एकदा, तर माजी आमदार सुरेश साळोखे, आमदार राजेश क्षीरसागर यांनी दोनदा सेनेकडून या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले.

2004 च्या निवडणुकीत मालोजीराजे यांना राष्ट्रवादीतून कॉंग्रेसमध्ये घेऊन उमेदवारी दिली आणि त्यात ते विजयी झाले; पण 2009 च्या निवडणुकीत त्यांचा धक्कादायक पराभव झाला. त्यामागची कारणेही अनेक आहेत. या पराभवानंतर राजकारणापासून अलिप्त असलेले हे कुटुंब पुन्हा राजकीय चर्चेचे केंद्र बनत आहे. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी पक्षाकडे उमेदवारीही मागितली नाही, त्यामुळे नगरसेवक सत्यजित कदम कॉंग्रेसचे उमेदवार राहिले, पण त्यांचाही पराभव झाला.

शाहू महाराजांचा वारसा, छत्रपती घराण्याची समाजातील क्रेझ व माजी मंत्री (कै.) दिग्विजय खानविलकर यांची कन्या म्हणून असलेली राजकीय पार्श्‍वभूमी या जोरावर विधानसभेसाठी कोल्हापूर उत्तरमधून मधुरिमाराजे छत्रपती यांचे नाव कॉंग्रेसकडून पुढे येत आहे. यापूर्वी या मतदारसंघातून कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज यांना रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू होत्या, पण आजच ऋतुराज हे कोल्हापूर दक्षिणमध्ये कॉंग्रेसचे उमेदवार असतील, अशी घोषणा सतेज पाटील यांनी केल्याने ऋतुराज यांच्या "उत्तर'मधील उमेदवारीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. मग कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात उमेदवार कोण? याचा शोध पक्षाच्या पातळीवर सुरू झाल्यानंतर मधुरिमा राजे यांचे नाव पुढे येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com