विलासरावांना मुख्यमंत्री करूनच माधवरावांनी दिल्लीला प्रयाण केले!

शिंदे घराण्याची महाराष्ट्राच्या मातीशी नाळ आहे. त्यामुळे काँग्रेस असो वा भाजप दोन्ही पक्षांनी शिंदे घराण्यातील सदस्यांना महाराष्ट्राच्या रणांगणात उतरवले आहे.
madhavrao shinde played major role in vilasrao deshmukhs chief chief ministership
madhavrao shinde played major role in vilasrao deshmukhs chief chief ministership

पुणे: मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज पक्षाला जोरदार दणका दिला. पक्षसदस्यत्वाचा राजीनामा देत मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार अस्थिर केले आहे. महत्वाची बाब म्हणजे त्यांचे वडील आणि काँग्रेसचे दिवंगत नेते माधवराव शिंदे यांची आज जयंती असताना त्यांनी हा धक्कादायक निर्णय घेतला आहे.

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचे शिंदे घराणे महाराष्ट्रातील आहे. सातारा जिल्ह्यातील कण्हेरखेड हे त्यांचे मूळ गाव. महाराष्ट्रातून जावून उत्तरेत कर्तबगारी गाजवलेले शिंदे तिकडे सिंधिया म्हणून ओळखले जातात. स्वातंत्र्यपुर्व काळ या घराण्याने गाजवलाच, पण स्वातंत्र्यनंतरही हे घराणे राष्ट्रीय राजकारणात चर्चित राहिले. ज्योतिरादित्य यांच्या आजी विजयाराजे आणि वडिल माधवराव यांची राष्ट्रीय राजकारणावर छाप होती. त्यांच्यानंतर ज्योतीरादित्य यांनी राष्ट्रीय राजकारणात स्थान मिळवले आहे. आज ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून भाजपमध्ये जात असताना त्यांचे स्थान आणखी बळकट होत आहे. 

शिंदे घराण्याची महाराष्ट्राच्या मातीशी नाळ आहे. त्यामुळे काँग्रेस असो वा भाजप दोन्ही पक्षांनी शिंदे घराण्यातील सदस्यांना महाराष्ट्राच्या रणांगणात उतरवले आहे. ज्योतिरादित्य हे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटप समितीचे अध्यक्ष होते. त्यांचे वडिल माधवराव शिंदे यांचा महाराष्ट्र काँग्रेसला नेहमी आधार वाटत होता. 1999 ला ज्यावेळी शरद पवारांनी बंड करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला, त्यावेळी महाराष्ट्रात पक्ष संकटात होता. या संकटसमयी काँग्रेसजनांना माधवराव शिंदे आठवले. त्यांना महाराष्ट्राचे प्रभारी बनवून मुंबईत पाठवण्यात आले. माधवराव यांनी ही जबाबदारी पेलून दाखवली. काँग्रेस पक्ष शिल्लक राहिल की नाही, याची चिंता असताना त्यांनी पक्षाला सत्ता मिळवून दिली. हा घटनाक्रम आजच्या घडामोडींमुळे ताजा झाला आहे. 1999 ला प्रतापराव भोसले प्रदेशाध्यक्ष होते. त्यावेळी भोसलेंचे निकटवर्तिय असलेल्या राजेंद्र शेलार यांनी यासंबंधीचे आपले अनुभव फेसबुक पोस्टद्वारे कथन केले आहेत. 

शेलार म्हणतात,
1999 साली महाराष्ट्रात शरद पवार साहेबांनी काँग्रेसला सोडून स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला त्यावेळी जवळपास सर्व मोठे नेते, आमदार, खासदार काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन पवार साहेबांच्या पक्षात सामील झाले. महाराष्ट्रातील काँग्रेस त्यावेळी मोठ्या संकटात सापडली होती. दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी तातडीने माधवराव शिंदे यांना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी नेमून सर्व सुत्रे त्यांच्याकडे दिली. माधवराव महाराजांनी तत्कालीन प्रदेश अध्यक्ष प्रतापराव भोसले, ज्येष्ठ नेते पतंगराव कदम आणि रणजितबाबु देशमुख यांच्याशी चर्चा करून महाराष्ट्रासाठी नवी राजकीय रणनीती तयार केली. युवक काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करुन मुंबई शहरासाठी व युवक काँग्रेससाठी वेगळी योजना तयार केली. त्यावेळी विलासराव देशमुख साहेब काँग्रेसमध्ये फारसे सक्रिय नव्हते. मला आठवतय एकेदिवशी माधवराव शिंदे दिल्लीवरून आले ते थेट विलासराव देशमुख साहेबांच्या वरळी येथील पुर्णा बिल्डिंगमधिल निवासस्थानी पोहोचले. तासभर चर्चा केल्यानंतर देशमुख साहेबांना सोबत घेऊन पुर्णा जवळच असलेल्या वैतरणा बिल्डिंगमधील प्रतापराव भोसले भाऊंच्या घरी आले. त्यावेळी त्यांच्यासोबत कृपाशंकर सिंग असल्याचेही मला आठवत आहे. येथे दोन अडीच तास चर्चा झाल्यानंतर सर्व नेते टिळक भवन या काँग्रेस मुख्यालयात गेले. पत्रकार परिषद घेतली आणि दोनच दिवसांनी माधवराव महाराजांचा झंजावती महाराष्ट्र दौरा सुरू झाला. पुढील पाच सहा महिने झपाटल्यासारखे काम केलेल्या माधवराव शिंदे यांच्या अनेक राजकीय डावपेचांचा, त्यांच्या गाजलेल्या भाषणांचा आणि कार्यकर्त्यांची आपुलकीने चौकशी करण्याच्या त्यांच्या प्रेमळ स्वभावाचा मी जवळचा साक्षीदार आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना त्यांनी आपल्या मुळ गावाला, कण्हेरखेडला आवर्जून भेट दिली. या दौर्‍याची समारोपाची सभा सांगलीला झाली. पतंगराव कदम साहेबांनी भव्यदिव्य नियोजन केले होते. माधवराव शिंदेंना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांसह सामान्य जनतेने अलोट गर्दी केली होती. असेच झंजावती दौरे विदर्भात व मराठवाडय़ात झाले. माधवराव शिंदे यांनी 1999 साली काँग्रेस पक्षासाठी महाराष्ट्रात केलेल्या सर्व राजकीय डावपेचांचा उल्लेख करणे येथे शक्य नाही. परंतू तत्कालीन प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले भाऊंच्या सहाय्याने माधवराव शिंदेंनी महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता स्थापन केली. विलासराव देशमुख साहेबांना मुख्यमंत्री करुनच त्यांनी दिल्लीला प्रयाण केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com