नागरिकत्व कायद्यावरून समाजात फूट पाडण्याचा विरोधकांचा प्रयत्न : माधव भंडारी

 नागरिकत्व कायद्यावरून समाजात फूट पाडण्याचा विरोधकांचा प्रयत्न : माधव भंडारी

कऱ्हाड (जि. सातारा) : नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्यांचा मुद्दा हा वस्तुस्थितीला धरून नाही. केवळ समाजात फूट पाडून पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र भाजपने त्यांच्या या कारस्थानाविरोधात राज्यभरात सर्वच जिल्हा केंद्रात कायदा काय आहे हे सांगण्याची मोहिम होती घेतली आहे, अशी माहिती भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी आज कऱ्हाडात पत्रकार परिषदेत दिली. 


श्री. भंडारी म्हणाले, नागरिकत्व सुधारणा कायदा हा मुस्लिम समाजाविरोधात असल्याचा प्रचार चुकीचा आहे. भारतातील मुस्लिम अथवा अन्य कोणत्याही नागरिकांशी या कायद्याचा संबंध नाही. त्यामुळे कोणत्याही भारतीय नागरिकाला नागरिकत्व सिद्ध करावे लागणार नाही. केंद्र सरकारने 1955 मध्ये झालेल्या नागरिकत्व कायद्यात सुधारणा करून हा नवा कायदा केला आहे. याद्वारे पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांगलादेश देशांतील हिंदू, जैन, बौध्द, शिख, पारशी तसेच खिश्‍चन समुदायातील धार्मिक छळामुळे 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेल्या आणि देशात राहणाऱ्या लोकांना कायद्यातील सुधारणेमुळे नागरिकत्व मिळेल. नागरिकत्व सुधारणा कायदा भारताचे नागरिक नसलेल्यांसाठी आहे. 

ईशान्य भारतातील नागरिकांचा बांगलादेश अथवा अन्य कोठूनही आलेल्या व कोणत्याही धर्माच्या निर्वासितांना नागरिकत्व देण्यास विरोध आहे. कायद्यातील ही सुधारणा आसाम, मेघालय, मिझोराम किंवा त्रिपुराच्या आदिवासी विभागांना लागू होत नाही. ईशान्य भारतात अरुणाचल प्रदेश, मिझोराम व नागालॅंड या राज्यांत इनर लाईन परमिट काढावे लागते व ती सुधारणेतून वगळण्यात आली आहेत. भारतात राहणाऱ्या पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांगलादेश येथील अल्पसंख्यांकांनी नागरिकत्वासाठी अर्ज केला तर यापूर्वी बेकायदा राहिले म्हणून कारवाई होणार नाही किंवा आतापर्यंत जे सरकारी लाभ मिळत होते ते रद्द होणार नाहीत. या सुधारणेमुळे अस्तित्वात असलेले अर्ज करून नागरिकत्व घेण्याचे कायदे बाद ठरत नाहीत. 

परकीय देशातील मुस्लिमांसह कोणतीही व्यक्ती भारताचा नागरिक होण्यासाठी सध्याच्या कायद्यानुसार अर्ज करू शकते. शिया, अहमदीया आणि हाजरा हे मुस्लिम वांशिक गट आहेत. मुस्लिमधर्मिय असल्यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक नाहीत. त्यामुळे त्यांचा या कायद्यात समावेश नाही. म्यानमारमध्ये रोहिंग्यांनी हिंदूंसह अन्य लोकांवर दहशतवादी हल्ले केले. त्यांच्यावर लष्कराने कारवाई केली आणि रोहिंग्यांनी पलायन केले. दहशतवादी रोहिंग्या गटांपासून भारताला धोका आहे. त्यांना सरसकट नागरिकत्व देता येणार नाही. नागरीकत्व कायद्याविषयी जागृती करण्यासाठी भाजपने रॅली, सभाद्वारे कायद्याचे समर्थन व लोकांपर्यत पोहोचविण्याचे काम सुरू केले आहे. या कायद्यामुळे नागरिकत्व मिळणाऱ्यांसाठी जानेवारी महिन्यात शिबीराचे आयोजन केले आहे. त्यात आवश्‍यक कागदपत्रांसह अन्य मार्गदर्शन केले जाईल. यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, भाजपचे कऱ्हाड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, कऱ्हाड दक्षिण तालुकाध्यक्ष पैलवान धनाजी पाटील, मुकुंद चरेगांवकर आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com