माढ्यावर मोहिते-पाटील यांचेच वर्चस्व!

संपूर्ण राज्यभर गाजलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते-पाटील विरुद्ध शरद पवार अशा झालेल्या चुरशीच्या लढतीत मोहिते-पाटील यांचे पुनश्‍चः वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे.
माढ्यावर मोहिते-पाटील यांचेच वर्चस्व!

सोलापूर : संपूर्ण राज्यभर गाजलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते-पाटील विरुद्ध शरद पवार अशा झालेल्या चुरशीच्या लढतीत मोहिते-पाटील यांचे पुनश्‍चः वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे. जरी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झालेली असली तरी मतदारांनी मोदी सरकारबरोबरच मोहिते-पाटील पॅटर्नला मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे. 

मोहिते-पाटील यांच्याविरोधात या मतदारसंघात समविचारी नेत्यांनी एकत्र बांधलेली मोट मात्र हवेतच विरुन गेली. आगामी विधानसभा निवडणुकीत नव्याने माळशिरसबरोबरच अन्य कोणत्या मतदारसंघात भाजप-सेना युतीला यश मिळेल, यावर लक्ष द्यावे लागेल. मुख्यमंत्र्यांच्या खेळीने राष्ट्रवादीच्या ताब्यातून एक जागा हिसकावून घेण्यात युतीला यश आले. तसेच मोहिते-पाटील यांच्याविरुद्ध नाराजीचा असलेला सूरच पालटल्याचे स्पष्ट जाणवले. आता नव्या खासदारांसमोर विकासाचे मॉडेल बनविण्याचे आव्हान राहणार आहे. 

गेल्यावेळी मोदी लाटेतही माळशिरस विधानसभा मतदारसंघाच्या जीवावर ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांनी विजयश्री खेचून आणली होती. या मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून रणजीतसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी होती. ऐनवेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. परंतु सोशल मिडीयावरून फिरलेला मेसेज, तसेच सर्व्हेमध्ये दिसलेल्या नकारात्मकतेमुळे श्री. पवार यांनी काढता पाय घेतला. परंतु मोहिते-पाटील कुटुंबियातील सदस्यास उमेदवारी देण्यास ते अनुत्सुक दिसल्याने माजी खासदार रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यानंतर या मतदारसंघातील सारी गणितंच बदलत गेली. 

मोहिते-पाटील यांच्याविरोधात जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार राजेंद्र राऊत शहाजी पाटील, समाधान आवताडे, रणजीतसिंह निंबाळकर, जयकुमार गोरे, उत्तम जानकर या मंडळींनी एकत्र येत समविचारी आघाडी केली होती. विधान परिषद निवडणूक, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांची राजकीय खेळी यशस्वी ठरली. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष रणजीतसिंह निंबाळकर यांना पक्षात घेऊन त्यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ घातल्याने त्यांची खेळी मात्र यशाचा मार्ग सुकर करून गेली. 

रणजीतसिंह मोहिते-पाटील यांना पक्षात घेऊन त्यांनाच उमेदवारी मिळेल, असा सर्वांचा कयास मुख्यमंत्र्यांनी धुळीस मिळविला. परंतु मुख्यमंत्र्यांच्या खेळीने सर्वांनाच आश्‍चर्याच्या धक्‍क्‍याबरोबरच समविचारी आघाडीत फूटच पाडली. 

दरम्यान, संजय शिंदे यांना मुख्यमंत्र्यांनी भाजपकडून उमेदवारी देण्यासाठी आमंत्रित केले होते. परंतु त्यांनी श्री. पवार यांच्या हाकेला ओ देत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविली. राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविल्यास संसदेचा मार्ग जवळचा असा त्यांचा झालेल्या समज फोल ठरला. 

करमाळा विधानसभा निवडणूक महायुतीतील स्वाभीमानी शेतकरी संघटनेकडून व जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप, कॉंग्रेस, शिवसेना या सर्वांना एकत्रित आणत श्री. शिंदे यांनी राजकीय गणिते मांडली होती. त्यात जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांना मोठ्ठे यश मिळाले होते. त्यामुळे त्यांची ताकद वाढली होती. तसेच माढा लोकसभा मतदारसंघात त्यांना समविचारीतील सहकारी मदत करतील अशी अपेक्षा होती. मतदानाची आकडेवारी पाहता काही प्रमाणात त्यात तथ्यही आढळते आहे. परंतु अपेक्षेइतका प्रतिसाद न मिळाल्याने पराभवाचा सामना करावा लागला. 

2009 ते 2014 या कालावधीत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी या मतदार संघातून प्रतिनिधीत्व केले. देशाचे कृषीमंत्रीपद त्यांच्याकडे असल्याने या भागाचा विकास होईल अशी अपेक्षा सर्वसामान्यांची होती. पवारांनी प्रतिनिधीत्व करूनही या भागाचा कायापालट झाला नाही अशीच लोकभावना या निवडणूकीत बघायला मिळाली. राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. येथून खासदारही भाजपचा विजयी झाला आहे. राष्ट्रवादीबद्दलची लोकभावना भाजपबाबतीत होऊ नये याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. 

वैशिष्ट्ये 
- मुख्यमंत्र्यांच्या राजकीय खेळीने सारेच घायाळ 
- माळशिरस विधानसभा मतदारसंघातून भाजपला प्रचंड मताधिक्‍क्‍य 
- संजय शिंदे यांना करमाळा, माढा, सांगोल्यात अपेक्षेपेक्षा कमी मताधिक्‍क्‍य 
- मोहिते-पाटलांच्या नेतृत्वास पुन्हा जनमानसाची साथ 
- राष्ट्रवादीची हक्काची जागा भाजपकडे 

विकासाचे मुद्दे 
- कृष्णा- भीमा स्थिरीकरणाचे काम 
- पंढरपूर-लोणंद रेल्वे मार्गाचे काम 
- प्रत्येक तालुक्‍यात एमआयडीसी 
- कृषी प्रक्रिया उद्योगाबरोबरच मोठ्या प्रकल्पाची उभारणी 
- सिंचनासाठीच्या पाण्याचे नियोजन 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com