माढा लोकसभा : थेट पवार-फडणवीस यांच्या प्रतिष्ठेचाच प्रश्न

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उमेदवारीवरून आरंभीच्या काळात गाजलेला, देशाच्या राजकीय पटलावर विविध माध्यमातून चर्चिल्या गेलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे रणजितसिंह निंबाळकर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय शिंदे यांच्या चुरशीचा सामना होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे विजय मोरे आपले नशिब आजमावत आहेत.
माढा लोकसभा : थेट पवार-फडणवीस यांच्या प्रतिष्ठेचाच प्रश्न

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उमेदवारीवरून आरंभीच्या काळात गाजलेला, देशाच्या राजकीय पटलावर विविध माध्यमातून चर्चिल्या गेलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे रणजितसिंह निंबाळकर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय शिंदे यांच्या चुरशीचा सामना होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे विजय मोरे आपले नशिब आजमावत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळे या मतदारसंघात मोठी राजकीय घुसळण झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपने हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला असून शरद पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचा प्रस्ताव त्यांनी नाकारला. दरम्यान, या मतदारसंघातून हमखास निवडून येणारा उमेदवार म्हणून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी श्री. शिंदे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली.

माढा मतदारसंघातील लढाई जरी संजय शिंदे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात होत असली तरी ही लढाई राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात होत आहे. दोघांच्या राजकीय डावपेचातून माढ्यातील उमेदवारी कोणाला इथपासून ते मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुख्यमंत्री फडणवीस आणि राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष पवार यांनी राजकीय डावपेच खेळले. या डावपेचात काँग्रेस-राष्ट्रवादीतील मंडळी आपल्या गोटात ओढण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले तर शरद पवारांनी भाजपच्या गोटात जाऊ पाहणाऱ्या शिंदे यांना उमेदवारी देऊन बाजी मारली.

माळशिरस व माण या दोन्ही मतदारसंघातील मोहिते-पाटील व आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधकांना सोबत घेण्यासाठी पवार यांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र माजी खासदार रणजितसिंह यांच्या विरोधात संजय शिंदे, आ. प्रशांत परिचारक, रणजितसिंह निंबाळकर, कल्याणराव काळे, शहाजी पाटील, जयकुमार गोरे, शेखर गोरे, उत्तम जानकर असे सर्व समविचारी एकत्र आले. मात्र यातील श्री. शिंदे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाल्याने ते विरुद्ध उर्वरित समविचारी असे चित्र सध्या दिसत आहे. या मतदारसंघातील तिन्ही उमेदवार आपापल्या पक्षासाठी उपरेच आहेत.

निंबाळकर सहा महिन्यांपूर्वीच कॉंग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष झाले होते. त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करुन उमेदवारी मिळविली. तर शिंदे यांनी पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत करमाळा मतदारसंघातून महायुतीतील घटक पक्ष स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवडणूक लढविली होती. दोन्ही उमेदवार आपापल्या पातळीवर प्रचाराची रणनिती आखत एकमेकांवर शरसंधान करण्याची संधी सोडत नसल्याचे चित्र आहे.
माढा मतदारसंघात कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेवरून मोठे रणकंदन उठले आहे. परस्परविरोधी भूमिकांची मंडळी एकत्रित येत असताना या विषयावर चर्चा सुरू आहे. दोन्ही उमेदवार मतदारसंघातील विकास कामांबाबत भूमिका स्पष्ट करताना आपल्या जमेच्या बाजू मांडत आहेत.

धनगर, मराठा, दलितबहुल या मतदारसंघात जातीची समीकरणेही मोठी विचित्र पद्धतीने मांडली जात आहेत. वंचित बहुजन आघाडीने विजय मोरे यांच्या रुपाने धनगर समाजाचा उमेदवार दिला आहे. ते देखील उपरेच (बारामतीचे) आहेत. त्यामुळे या मतदारसंघात आघाडीला संधी असतानाही उपरा उमेदवार दिल्याने आघाडी सध्या चर्चेत देखील नाही.

उमेदवारांची बलस्थाने
संजय शिंदे
जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून जिल्हाभर संपर्क
माढा, करमाळा भागात वर्चस्व
साखर कारखाना
उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती
मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक असल्याची प्रतिमा
यशस्वी उद्योजकाची प्रतिमा

रणजितसिंह निंबाळकर
समविचारी सहकाऱ्यांचा पाठिंबा
दूध व साखर उद्योगाच्या माध्यमातून विणलेले जाळे
मोहिते-पाटील यांची साथ असल्याने सोलापूर जिल्ह्यात शिरकाव
कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची संधी
केंद्र व राज्यात सरकार
मोदी करिश्‍मा

मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न
कृष्णा-भीमा स्थिरीकरण
पंढरपूर-लोणंद रेल्वे मार्ग
कृषी पूरक उद्योग
उजनीचे रखडलेले प्रकल्प
एमआयडीसीची गरज
सिंचनाचा प्रश्‍न
साखर कारखानदारीसमोरील आव्हाने
कुर्डुवाडी रेल्वे कारखान्यासाठी ब्रॉडगेजचे काम
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे मळे पडल्याने हजारो एकर शेती पडीक
मजूर बेरोजगार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com