माढ्याची जागा जिंकण्यासाठीच कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या वारसदारांची कुमक

माढ्याची जागा जिंकण्यासाठीच कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या वारसदारांची कुमक

पुणे : माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह मोहिते-पाटील यांना पक्षात घेण्यात आले. पाठोपाठ सातारा जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष रणजित नाईक-निंबाळकर यांना प्रवेश देण्यात आला. शिवाय सातारा जिल्ह्यातील कॉंग्रेस आमदारांची छुपी मदत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. उमेदवार कुणीही असला तरी काहीही करून माढ्याची जागा जिंकायचीच अशी तयारी भारतीय जनता पार्टीने चालविली आहे. 

राज्यातील एकेक जागा पक्षासाठी महत्वाची आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जागेबाबत गेल्या सहा महिन्यांपासून नियोजन करण्यात येत आहे. शरद पवार यांनी माढ्यातून न लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर माढ्याची लढाई भाजपाला आता सोपी वाटू लागली आहे. त्यामुळे मोहिते-पाटील यांना उमेदवारीसाठी पक्षात घेण्यात आल्याचे सुरवातीचे चित्र होते. मात्र, गेल्या चार-पाच दिवसात वातावरण बदलले. 

मोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ सातारा जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष नाईक-निंबाळकर यांनाही पक्षात घेण्यात येणार आहे. होताहोईल तेवढ्या मातब्बरांना पक्षात एकत्र आणून माढ्यातली ताकद वाढविण्याचे पध्दतशीर प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. या मतदारसंघात विजयसिंह मोहिते-पाटील हे राष्ट्रवादीकडून गेल्यावेळी खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांचे चिरंजीव रणजितसिंह यांनी भाजपात प्रवेश केल्याने विजयसिंह यांच्याऐवजी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. 

विजय मिळविण्यासाठी या मतदारसंघात भाजपाची पक्ष म्हणून मूळची ताकद पुरेशी नाही. त्यामुळे उमेदवार निवडणून येण्यासाठी स्थानिक मातब्बर घराण्यांना खिंडार पाडल्याशिाय भाजपाला पर्याय नाही. त्यामुळे पक्षाच्यावतीने गेल्या सहा महिन्यांपासून विविध शक्‍यतांची चाचपणी करण्यात येत होती. त्यास आता मूर्त रूप येऊ लागल्याचे पक्षातील विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सर्व विधानसभा मतदारसंघातून पक्षाच्या उमेदवाराला मतदान होण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. या वेळी माढ्याची जागा मिळवायचीच या उद्देशाने आधीपासून नियोजन करण्यात आल्याचे या सूत्रांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com