Made in Nashik Flags for MNS Morcha in Mumbai | Sarkarnama

मोर्चा 'मनसे'चा, आवाऽऽऽज राज ठाकरेंचा अन्‌ झेंडे फडकले फक्त नाशिकचे!

संपत देवगिरे
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

मोर्चासाठी नाशिकच्या 'मनसे'च्या टीमने चौदा हजार झेंडे तयार केले आहेत. यातील दहा हजार झेंडे मुंबईत मोर्चासाठी होते. सर्व कार्यकर्ते, वाहने, खांब, रस्ते अन्‌ स्टेजवर असलेले सर्व झेंडे नाशिकचे आहेत.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विशेष पॉकेट म्हणजे मुंबई, पुणे आणि नाशिक. या सुवर्ण त्रिकोणाच्या शहरांतून मनसेने मुंबईत होणाऱ्या मोर्चाचे खास नियोजन केले आहे

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेकओव्हर नंतर आज (ता.9) मुंबईत राज ठाकरे आक्रमक हिंदुत्वासह गिरगाव चौपाटीवर मोर्चासाठी शक्तीप्रदर्शन केले. थोड्याच वेळेत हा मोर्चा आझाद मैदानाकडे झेपावेल. त्याकडे सबंध राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र त्यात नाशिकची चर्चा असेल. कारण मोर्चा 'मनसे'चा, आवाऽऽऽज घुमणार राज ठाकरेंचा मात्र आसमंतात उसळतील, फडकतील ते सर्व झेंडे असतील फक्त नाशिकचे.

त्याला कारण देखील तसंच आहे. या मोर्चासाठी नाशिकच्या 'मनसे'च्या टीमने चौदा हजार झेंडे तयार केले आहेत. यातील दहा हजार झेंडे मुंबईत मोर्चासाठी होते. सर्व कार्यकर्ते, वाहने, खांब, रस्ते अन्‌ स्टेजवर असलेले सर्व झेंडे नाशिकचे आहेत.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विशेष पॉकेट म्हणजे मुंबई, पुणे आणि नाशिक. या सुवर्ण त्रिकोणाच्या शहरांतून मनसेने मुंबईत होणाऱ्या मोर्चाचे खास नियोजन केले आहे. 

मुंबईसह नाशिक व पुण्याच्या विविध हिंदुत्ववादी संघटना या मोर्चात सहभागी होत आहे. अन्य पक्षाचे कार्यकर्तेही त्यात भाग घेतील. त्यासाठी नाशिक शहरातून दहा हजार कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. तसे नियोजन करण्यात आले होते. ते यशस्वी झाले. मोर्चासाठी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी झेंडे उपलब्ध करण्याची जबाबदारी घेतली होती. त्यासाठी त्यांनी खास सांगलीहून कापड आणले होते. एक आठवड्यापासून नाशिकला झेंडे तयार करण्याचे काम सुरु होते. त्यातून चौदा हजार झेंडे तयार केले. यातील दहा हजार झेंडे मुंबईत गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या मार्गावर लावण्यात आले आहेत. कार्यकर्ते व त्यांच्या वाहनांवर लावण्यात येणारे सर्व झेंडे नाशिकचेच असतील. सबंध मोर्चात, रस्त्यापासून तर स्टेजपर्यंत सगळीकडे नाशिकचेच झेंडे फडकतील हे यंदाच्या मोर्चाचे वैशिष्ठ्य होय.

या मोर्चासाठी आज नाशिकच्या पदाधिकाऱ्यांच्या आठवडाभर बैठका सुरु होत्या, यामध्ये डॉ. प्रदिप पवार, माजी महापौर अशोक मुर्तडक, जिल्हा अध्यक्ष अनंत सुर्यवंशी, अॅड. रतनकुमार इचम, शहराध्यक्ष अनिल मटाले, बंटी कोरडे, नगरसेवक सलीम शेख यांनी उद्याच्या मुंबईतील मोर्चाचा नियमित आढावा घेतला. नाशिकच्या किमान एक हजार वाहनांसाठी झेंडे उपलब्ध करण्यात आले होते. नाशिक ते मुंबई महामार्गावर आज पहाटेपासून केवळ मनसेचेच झेंडे दिसतील अशी व्यवस्था होती. शहर व जिल्ह्यातून या मोर्चासाठी दहा हजार कार्यकर्ते गेले आहेत. त्यामुळे 'मनसे'च्या मोर्चात नाशिकचे नाव वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहे.

पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी नाशिकचे कार्यकर्ते सदैव तप्तर असतात. यंदा झेंडा नव्या पध्दतीने तयार केला आहे. त्यामुळे नाशिकहून मोर्चासाठी दहा हजार तर अन्य वाहने व कार्यकर्त्यांसाठी चार हजार झेंडे आम्ही तयार केले आहेत. नाशिक सदैव राज ठाकरे यांच्या मागे आहे हे आम्ही दाखवून देऊ - अशोक मुर्तडक, माजी महापौर.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख