madam-wanted to involve-modi-shaha in isharat-jahan-case-mani- | Sarkarnama

इशरत प्रकरण मोदी शहांना फ्रेम करण्याची 'मॅडम'ची इच्छा होती : माजी अवर गृहसचिव मणी

मृणालिनी नानिवडेकर
बुधवार, 19 डिसेंबर 2018

मोदी आणि शहा यांना आपण इशरत प्रकरणात गोवून दाखवू अशी सिन्हा यांची मॅडमशी कमिटमेंट होती . मॅडम म्हणजे कोण याबददलचा उल्लेख मात्र त्यांनी केला नाही.

मुंबई: " इशरत प्रकरणात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना फ्रेम करा ,मॅडमची तशी इच्छा आहे असे ज्येष्ठ पोलिस अधिकारी रणजित सिन्हा सतत सांगत असत ",असे प्रतिपादन केंद्रीय गृह खात्याचे माजी अवर सचिव आर.व्ही.एस.मणी यांनी केले आहे.

हिंदू दहशतवाद नावाचे थोतांड या त्यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.  हॉटेल ताजमध्ये झालेल्या या पुस्तकप्रकाशन समारंभास निवृत्त जनरल दत्तात्रय शेकटकर , मराठी अनुवादकार ज्येष्ठ पत्रकार अरूण करमरकर तसेच परममित्र प्रकाशनचे माधव जोशी हजर होते.

आर.व्ही.एस.मणी यावेळी बोलताना म्हणाले," तपास यंत्रणांचे प्रमुख असा आग्रह सातत्याने धरत ,जे दिसते आहे त्याच्या पलिकडचे काहीतरी कसे सांगणार ? असे त्यांना आम्ही म्हणत असू . उच्च न्यायालयात आपण प्रतिज्ञापत्र सादर केले आहे अशी माहिती दिल्यावर ते दबाव टाकत असत . आपले कुटुंबिय या काळात अनन्वित अत्याचाराला सामोरे गेले अन वृध्द आईचा यातच अंत झाला पण देशसेवा करड्‌यास आपण सर्वोच्च प्राधान्य दिले ."

" हिंदू दहशतवाद हा शब्द मतांच्या राजकारणासाठी प्रत्यक्षात आला . कर्नल पुरोहित यांच्यासारख्या उत्तम लष्करी अधिकाऱ्याला कटात गोवले गेले असे सांगून आर.व्ही.एस.मणी  यांनी  असा सनसनाटी आरोप केला की   ,"मोदी आणि शहा यांना आपण इशरत प्रकरणात गोवून दाखवू अशी सिन्हा यांची मॅडमशी कमिटमेंट होती ." मॅडम म्हणजे कोण याबददलचा उल्लेख मात्र त्यांनी केला नाही.

"नांदेड येथील समीर कुळकर्णी उदयोजक होते ,ते बजरंग दलात जायचे मात्र त्यांच्या कारखान्यात लागलेली आग हा स्फोट दाखवला गेला . ती घटना कथित हिंदू दहशतवादाचा प्रारंभ म्हणून दाखवली गेली ,'असेही मणी म्हणाले. 

जनरल शेकटकर यावेळी म्हणाले,"  भारताला मोठा समुद्रकिनारा आहे . देशात समुद्र किनारा  लाभलेले प्रदेश  प्रगतीपथावर आहेत. अतिरेकी हाच भाग दहशतवादी हल्ल्यासाठी निवडतात . त्यामुळे मुंबईकरांनी  सावध राहायला हवे . या पुढच्या हल्ल्यात कसाब जहाजातून पाठवण्याची गरज पडणार नाही.  तर समुद्रातून पाच सहा किलोमीटर अंतरावरून  रॉकेटव्दारे हल्ला होईल , अशी भीती त्यांनी व्यक्‍त केली.मात्र दशहतवादाला कोणताही रंग नसतो असेही ते म्हणाले.

मकरंद मुळे यांनी या कार्यक्रमाचे संचालन केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख