अघळपघळ अंगतपंगत सुरूच; जेवणाच्या वेळेबद्दलचा सरकारी आदेश कचऱ्याच्या डब्यात

अघळपघळ अंगतपंगत सुरूच; जेवणाच्या वेळेबद्दलचा सरकारी आदेश कचऱ्याच्या डब्यात

मुंबई : कुठल्याही सरकारी कचेरीतील टेबल वा केबिन... तेथे काही अपवाद वगळता "कामात' मग्न असलेले कारकून "साहेब' वा "मॅडम'... समोर टेबलावर अस्ताव्यस्त पडलेला फायलींचा ढीग आणि अनेक महिने रखडलेले आपले काम आज होईल का, या आशेने समोर रांगेत आशाळभूतपणे उभे असलेले या देशाचे सार्वभौम नागरिक... म्हणजे तुम्ही-आम्ही. हे सर्वांच्याच परिचयाचे संतापजनक चित्र. "सरकारी काम आणि सहा महिने थांब' या उक्तीची प्रचीती आणून देणारे... 
ते बदलून सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी राज्य सरकारने काही उपाययोजना आखल्या आहेत. कामाच्या वेळेत टंगळमंगळ करणाऱ्या सरकारी बाबूंना थोडीफार शिस्त लागावी, जनताजनार्दनाची कामे जरा "कमी उशिरा'ने व्हावीत, या हेतूने सरकारी कर्मचाऱ्यांच्या दुपारच्या जेवणाची वेळ अर्ध्या तासावर आणली आहे. दुपारी 1 ते 2 च्या दरम्यानच जेवायला जावे; मात्र लोकांच्या कामांचा खोळंबा होऊ नये म्हणून खात्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी जेवायला जाऊ नये, असा आदेश सरकारने काढला आहे; पण या सरकारी बाबूंनी नित्याच्या सवयीनुसार या आदेशालाही केराची टोपली दाखवल्याचे चित्र "टीम सकाळ'ने अलीकडेच विविध सरकारी कार्यालयांत केलेल्या पाहणीत आणि टिपलेल्या छायाचित्रांतून दिसले. "तुम्ही कितीही प्रयत्न करा, हम नहीं सुधरेंगे' हेच मंत्रालयासह अनेक ठिकाणच्या सरकारी कर्मचाऱ्यांनी (अर्थातच काही अपवाद वगळता) फडणवीस सरकारला दाखवल्याचे त्यांच्या कृतीतून प्रतिबिंबित झाले. 
स्थळ ः मंत्रालय 
वार ः शनिवार (15 जून) 
वेळ ः दुपारी 1.35 
खाते ः गृहनिर्माण विभाग 
सर्वच कर्मचारी जेवणासाठी निघून गेलेले. कार्यालयात शुकशुकाट. तेथील पंखे-लाईट रिकाम्या खुर्च्यांना "सेवा' देत होते. दुपारी 3 वाजून गेल्यानंतरही एकही कर्मचारी जागेवर आला नव्हता. त्याबाबत विचारले असता, "काही कर्मचारी सुट्टीवर आहेत. आज शनिवार आहे ना? त्यामुळे आज लोकांची वर्दळ कमी असते. काम नसल्याने दर शनिवारी कर्मचारी "रिलॅक्‍स' असतात' असे उत्तर मिळाले. 
.... 
खाते ः अन्न व औषध प्रशासन विभाग 
वेळ ः दुपारी 1.45 
घरून डबा आणलेले कर्मचारी जेवण झाल्यानंतर कार्यालयातच आराम करत होते. अन्य कर्मचारी जेवणासाठी बाहेर गेलेले. काही दुसऱ्या कक्षातील मित्राची वाट पाहत कक्षाबाहेर रेंगाळत होते. जेवण झाल्यानंतरही अनेक जण मंत्रालयाच्या व्हरांड्यात गप्पा मारत उभे. दुपारी 2.30 ते 3 च्या सुमारास काही कर्मचारी पुन्हा जागेवर आले; पण टेबलावरील संगणक किंवा फाईल न उघडता ते मोबाईलमध्येच "रमलेले' होते. 
.... 
खाते ः गृह व सामान्य प्रशासन विभाग 
वेळ ः दुपारी 2 
संपूर्ण दालन रिकामे. तेथील शिपायाकडे विचारणा केली असता, "आता लंच टाइम सुरू आहे. तुम्ही 3 नंतर या. तेव्हाच कर्मचारी-अधिकारी भेटतील' असे उत्तर मिळाले. 
... 
खाते ः महसूल विभाग 
वेळ ः दुपारी 2.15 
एखाद्‌ दुसरा कर्मचारी वगळता संपूर्ण कक्ष रिकामाच. सर्व कर्मचारी जेवणासाठी निघून गेलेले. दुपारी 3 नंतर काही जण जागेवर आले, पण अनेक कर्मचारी मंत्रालयाच्या वऱ्हांड्यातच फिरत किंवा कठड्यावर बसून गप्पा मारत होते. "हे अधिकारी कुठे भेटतील' किंवा "अमूक कक्ष कुठे' आहे अशी विचारणा कुणा नागरिकाने त्यांच्याकडे केल्यावर त्यांना "तळमजल्यावर चौकशी कक्ष आहे, तेथे विचारणा करा' अशी उत्तरे मिळत होती. 
.... 
खाते ः मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष 
वेळ : दुपारी 1.23 
कक्षाच्या पाचव्या मजल्यावरील चौकशी विभागात दोनतीन कर्मचारी स्वतःच्या टेबलवर काम करत होते. अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या मजल्यावरील मुख्य कार्यालयात तीन कर्मचारी उपस्थित होते. अर्ज कसा दाखल करायचा, कोणती कागदपत्रे लागतात, असे विचारता संबंधित कर्मचाऱ्याने "पेपर आणलेत का' असा प्रश्‍न केला. त्याची काहीच कल्पना नाही, असे सांगितल्यावर त्या कर्मचाऱ्याने सविस्तर माहिती दिली. 
हेच कार्यालय. वेळ : 1.39 मिनिटे- मुख्य कक्षाबाहेर काही कर्मचारी मुख्य साहेबांची वाट बघत होते. थोड्या वेळाने पन्नाशीतील, गावाकडचे साधेसे जोडपे अर्ज करण्यासाठी आले. त्यातील महिलेने आत जाऊन चौकशी केली. बाहेर आल्यानंतर सर्व कागदपत्रे काढून नीट लावून तपासत तेथे थांबली. थोड्या वेळाने आणखी एक व्यक्ती आत जाऊन चौकशी करून आली. ते सगळे 8-10 मिनिटे वाट पाहत होते. तेवढ्यात जेवणासाठी गेलेले चारपाच कर्मचारी कार्यालयात आले. बरोबर 2 वाजता मुख्य केंद्रातील कामाला सुरुवात झाली. 
----- 

मुंबई महापालिका मुख्यालय 
कर्मचाऱ्यांच्या जेवणाची वेळ दुपारी 1 ते 1.30 आहे. नागरी सुविधा केंद्रांमध्ये नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तेथील कर्मचारी जेवणाच्या वेळा आपापसात बदलतात. इतर कार्यालयांत 1.30 वाजता लंच टाइम होतो, पण अनेक कर्मचाऱ्यांचा जेवण झाल्यानंतरही कॅन्टीनमध्ये तासभर गप्पांचा फड रंगला होता. 
.... 
स्थळ ः ताडदेव आरटीओ 
वेळ : दुपारी 1.55 वाजता 
लंच टाइम 2 ते 3 या वेळेत असला, तरी त्याआधीच सातआठ खिडक्‍यांवरील कर्मचारी जेवणासाठी बाहेर गेले होते. त्या खिडक्‍यांसमोर वाहनचालक-मालकांच्या रांगा लागल्या होत्या. अर्ध्या तासानंतर जेवण झाल्यानंतरही कर्मचारी खिडकी न उघडता आत गप्पा मारत होते. बराच वेळ होऊनही एकाही खिडकीवर कर्मचारी येत नसल्याने रांगेतील अनेक जण वैतागून निघून गेले. 3 वाजून गेल्यानंतरही पाच ते सहा खिडक्‍या बंद होत्या. 3.20 नंतर सर्व कर्मचारी जागेवर हजर झाले. या कार्यालयातील सहायक रोखपाल कर भरणा खिडकी क्रमांक 18 दररोज सकाळी 10.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू असतो; पण 2 वाजण्यापूर्वीच खिडकी बंद करण्यात आली. 
.... 
मुंबई पोलिस आयुक्त कार्यालय 
वेळ ः दुपारी 1 ते 4 
आर्थिक गुन्हे शाखा व गुन्हे शाखेत अनेक नागरिक येतात. प्रत्येक विभागात दोनतीन अधिकारी/ कर्मचारी उपस्थित होते. काही कर्मचारी जेवणासाठी गेले. बरेच अधिकारी-कर्मचारी न्यायालयीन कामकाजासाठी गेले होते; पण कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांना मार्गदर्शन करण्यासाठी कोणी ना कोणी कर्मचारी हजर होते. स्वागत कक्षातील महिला कर्मचारीही बदली कर्मचारी आल्यानंतरच जेवणासाठी गेल्या. तेच चित्र प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षक कार्यालयातही दिसले. वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सहायक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांचे जेवण झाल्यानंतर मिळालेल्या वेळेत जेवण केले. 
.... 
झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालय (एसआरए) 
वेळ ः दुपारी 1.25 
एसआरए कार्यालयात उच्चस्तरीय बैठक असल्याने नागरिकांची प्रचंड गर्दी होती. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरच्या पायऱ्यांवरही गर्दी होती. याच मजल्यांवर कार्यकारी अभियंता आणि उपजिल्हाधिकाऱ्यांचीही दालने असल्याने तेथे येणाऱ्या नागरिकांचे प्रमाणही मोठे होते. तळमजल्यावर आवक-जावक कक्ष आहे. तेथेही नागरिक संबंधित कक्ष अधिकारी आपल्याला कधी बोलावेल याची वाट पाहत होते. 1.15 पासूनच लंच टाइमसाठी एकेक कक्ष रिकामा होऊ लागला. प्रत्येक कक्षात शिपाई धरून पाच-सात कर्मचारी असतात. लंच टाइममध्ये या कक्षांमध्ये एखाद्‌ दुसरा कर्मचारीच दिसत होता. या तिन्ही मजल्यांवरील कर्मचारी ग्रुप करून जेवण्यासाठी निघून गेले होते. घरून डबा आणणारे काही कर्मचारी टेबलवर जेवत होते. दुपारी 2.15 वाजता उच्चस्तरीय समितीचे काम सुरू झाले. नागरिक आणि त्यांचे वकील बोलावणे आल्यावर सुनावणीसाठी दालनात निघून जात होते, परंतु 2.30 वाजले तरीही अभियंता कक्ष, इस्टेट मॅनेजर कक्ष, आवाक-जावक कक्ष, उपजिल्हाधिकारी कार्यालयातील लंचला गेलेले कर्मचारी जागेवर आले नव्हते. संबंधित कर्मचारी थोड्या वेळात येतील, वाट पाहा असेच उत्तर सुरक्षारक्षक आणि शिपाई देत होते. सुमारे पाऊण तासानंतर एकेक कर्मचारी आले, पण त्यापैकी काही कॉरिडोअरमध्ये चर्चा करत होते. 
.... 
नवी मुंबईत आदेशाला हरताळच 
केवळ अर्ध्या तासात दुपारचे जेवण उरका, या सरकारी आदेशाला नवी मुंबईतील सिडको, नवी मुंबई महापालिका व कोकण भवनातील कर्मचाऱ्यांकडून हरताळ फासल्याचे चित्र होते. जेवणाची सुट्टी संपल्यानंतरही सिडको भवनमधील बहुतांश विभागांतील कर्मचारी जागेवर नव्हते. वसाहत विभागातील सर्व कर्मचारी दुपारी 1 च्या ठोक्‍याला जेवायला बसले. कामासाठी आलेल्या नागरिकांना सुरक्षारक्षक प्रवेशद्वारावरच अडवत होते. जे नागरिक आत गेले होते, ते कर्मचाऱ्यांचे जेवण केव्हा संपेल याची प्रतीक्षा करत होते. सिडकोच्या रायगड भवनातही हेच चित्र होते. या इमारतीमधील पणन- 2 विभागातील अनेक कर्मचारी जेवणाच्या सुट्टीत बाहेर गेल्यानंतर एक-दीड तासाने कार्यालयात आले. कोकण भवनमध्येही हेच चित्र होते. तेथील विविध कार्यालयांतील सर्वच कर्मचारी एकाच वेळेला भोजनालयात जेवायला गेले; पण अनेक कर्मचारी दुपारी 2 वाजल्यानंतरही तेथेच होते. पालिकेतही जवळपास असेच चित्र होते. 
.... 

राज्य विद्युत मंडळ कार्यालय, कल्याण 
1.30 ते 2 या लंच टाइममध्ये कार्यालयातील विविध भागांतील कर्मचारी टेबलवर जेवत होते. काही बाहेर जेवायला गेले होते. जेवण झाल्यावर काही कर्मचारी आवारातच फिरत होते, पण त्यांची संख्या कमी होती. लिपिक आणि त्या दर्जाचे कर्मचारी अर्ध्या तासानंतर जागेवर आल्यानंतरही उपअभियंता दर्जाचे अधिकारी टेबलवर नव्हते. चौकशी केली असता ते दुपारी प्रत्यक्ष पाहणीसाठी जातात असे उत्तर मिळाले. 
.... 
पनवेल महापालिका मुख्यालय 
लंच टाइम ः 1.30 ते 2 
सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांचा लंचटाईम वेळेवर सुरू झाला. या कार्यालयात जेवण्याच्या वेळेची सूचना देण्यासाठी घंटा वाजवली जाते; तर वेळ संपली हे सांगण्यासाठी भोंग्यावरून इशारा देण्यात येतो; मात्र तो इशारा झाल्यानंतरही अनेक कर्मचारी जागेवर नव्हते. 
.... 
जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग 
1.30 वाजता जेवणाची सुट्टी होत असली, तरी या कार्यालयात दुपारी 1 वाजताच लंच टाइमचा माहौल होता. आता "लंच टाइम' सुरू आहे. 3 वाजता या, अशी उत्तरे नागरिकांना मिळत होती. 3 वाजल्यानंतरही अनेक कर्मचारी जागेवर नव्हते. टेबलवर आल्यानंतरही प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठी ते 15 ते 20 मिनिटे घेत होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com