नाशिकमधील घसरलेला टक्का भाजप, शिवसेनेच्या पथ्थ्यावर की चिंता वाढवणारा?

नाशिक शहराशी संबंधीत सर्व चारही मतदारसंघ सध्या भाजप, शिवसेना महायुतीच्या ताब्यात आहेत. 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत येथील मतदानाचा टक्का यंदा घसरला. मतदारांत सकाळपासूनच निरुत्साह होता. त्यामुळे जेव्हा जास्त मतदान वाढते तेव्हा विद्यमान आमदारांची धडधड वाढते. त्यामुळे यंदा घसरलेले मतदान महायुतीच्या उमेदवारांच्या पत्थ्यावर पडणार अशी चर्चा रंगली आहे.
Devyani Fanade - Seema Hiray- Balasaheb Sanap - Yogesh Gholap
Devyani Fanade - Seema Hiray- Balasaheb Sanap - Yogesh Gholap

नाशिक : नाशिक शहराशी संबंधीत सर्व चारही मतदारसंघ सध्या भाजप, शिवसेना महायुतीच्या ताब्यात आहेत. 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत येथील मतदानाचा टक्का यंदा घसरला. मतदारांत सकाळपासूनच निरुत्साह होता. त्यामुळे जेव्हा जास्त मतदान वाढते तेव्हा विद्यमान आमदारांची धडधड वाढते. त्यामुळे यंदा घसरलेले मतदान महायुतीच्या उमेदवारांच्या पत्थ्यावर पडणार अशी चर्चा रंगली आहे.

सोमवारी मतदान झाले. या चारही मतदारसंघांत यंदा, कंसात 2014 मध्ये झालेले मतदान, नाशिक पूर्व 50.19 (52.38 टक्के), नाशिक पश्‍चिम 57.33 (58.25), नाशिक मध्य 49 (51.73 टक्के) तर देवळालीत 54.20 (54.70) असे मतदान झाले. त्यामुळे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते आकडेमोड व केलेल्या डावपेचांचे परिणाम मोजण्यात व्यस्त आहेत. बहुतांश उमेदवारांनी त्यासाठी आजच श्रमपरिहाराचे आयोजन केले आहे. या पार्श्‍वभूमीवर कमी झालेले मतदानाचे परिणाम, परिमाण, भौगोलीक स्थिती व जातनिहाय घटकांची आकडेमोड होत आहे. 

पक्षांतर्गत विरोध, बंडखोरी या पार्श्‍वभूमीवर घटलेले मतदान विद्यमान आमदारांना दिलासादायक असल्याचा अंदाज नेत्यांचा आहे. शहरातील पश्‍चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे, मध्यच्या देवयानी फरांदे या दोन्ही भाजपच्या आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळाली. पूर्व मतदारसंघ देखील भाजपकडेच होता. मात्र, तेथे विद्यमान बाळासाहेब सानप यांच्या ऐवजी मनसेतून आलेले राहुल ढिकले यांना उमेदवारी मिळाली. देवळाली मतदारंसघात शिवसेनेचे योगेश घोलप विद्यमान आमदार आहेत. पदाधिकाऱ्यांचे आडाखे बरोबर ठरल्यास चारही जागावंर महायुतीला फायदा होईल. त्यामुळे कार्यकर्ते खुषीत आहेत.

पश्‍चिम मतदारसंघात शिवसेनेचे नगरसेवक विलास शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी राजीनामा देऊन मनसेची उमेदवारी घेतली. या दोघांना शहरातील शिवसेनेचे पस्तीस नगरसेवक तसेच महायुतीचे घटक असलेल्या नेत्यांचाच पाठींबा होता. प्रचारातही तेच सक्रीय होते. त्यांचा गाजावाजा विचारात घेता मतदानाचा टक्का वाढायला हाव होता. मात्र, तसे झाले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अपूर्व हिरे यांचे येथे भाजपच्या सीमा हिरे यांना प्रमुख आव्हान आहे. अशा स्थितीत भाजपचा मतदार सर्व भागात आहे. त्यामुळे ठराविक भागात जोर लावूनही त्यांच्या विरोधकांना मतदान वाढवता आले नाही. गेल्या निवडणुकीतही शिवसेनेचे सुधाकर बडगुजर उमेदवार होते. बंडखोरीही झाली होती. तरीही सीमा हिरे विजयी झाली. त्यामुळे यंदाचे चित्र फारसे वेगळे नसल्याने कमी मतदान भाजपच्या पत्थ्यावर पडण्याची शक्‍यता आहे.

नाशिक मध्य मतदारसंघात दलित, मुस्लीम तसेच मराठा मतदार मोठ्या संख्येने आहेत. हा फॅक्‍टर निकालावर परिणाम करणारा आहे. यंदाच्या निवडणुकीत तसे संकतेही मिळाले होते. भाजपच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे येथून उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात कॉंग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, 'मनसे'चे माजी आमदार नितीन भोसले यांच्याशी फरांदे यांची लढत होती. यामध्ये फरांदे यांची यंत्रणा सक्रीय होती. त्या तुलनेत विरोधक विभागले. त्यात मतदान कमी झाले. त्याचा लाभ प्रस्थापित उमेदवार म्हणून फरांदे यांना होऊ शकतो.

नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार सानप यांना उमेदावरी नाकारल्याने त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारी दिली. मनसेचे राहुल ढिकले भाजपचे उमेदवार झाले. या मतदारसंघाची भोगोलिक रचना आणि सामाजिक समिकरणे पाहता शेवटच्या टप्प्यात निवडणूक 'कास्ट' फॅक्‍चरकडे नेण्याचा प्रयत्न झाला. तसे झाले असते तर मतदान वाढले असते. मात्र मतदानाचे प्रमाण व कल पाहता त्यात विरोधकांना यश आलेले दिसत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com