प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांच्या शहरात "महाजनादेश' ला थंडा प्रतिसाद!

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांच्या शहरात "महाजनादेश' ला थंडा प्रतिसाद!

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय जनता पक्षाने काढलेल्या महाजनादेश यात्रेला कोल्हापुरात थंडा प्रतिसाद मिळाला. यात्रेत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात गर्दी पण रस्त्यावर शुकशुकाटच होता. पालकमंत्री तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या शहरात महाजनादेश यात्रेची ही अवस्था पहायला मिळाली.

महाजनादेश यात्रेचे कोल्हापुरात सोमवारी रात्री आगमन झाले. ताराराणी चौकात या यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. मंगळवारी ही यात्रा शहराच्या प्रमुख मार्गावरून फिरून राधानगरीमार्गे कोकणात रवाना झाली. तत्पूर्वी शहराच्या प्रमुख मार्गावरून मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास या रॅलीला सुरूवात झाली. पण रस्त्यावर कामासाठी निघालेल्या लोकांव्यतिरिक्त कोणीही दिसले नाही. यात्रेच्या ताफ्यात मात्र मोठ्या संख्येने कार्यकर्ते दुचाकी व चारचाकी वाहनांतून सहभागी झाले होते. यामुळे वाहतुकीची कोंडी मात्र मोठी झाली.

शहरात काही ठिकाणी या यात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. अशा ठिकाणीही कार्यकर्त्यांची फारशी गर्दी नव्हती. यात्रेच्या स्वागतासाठी मात्र शहराच्या कोपऱ्या कोपऱ्यात आणि मुख्य मार्गावरील दुभाजकांवर मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे जंगी फलक लागले होते. यात्रा हॉकी स्टेडियमपासून कळंब्याच्या दिशेने जात असताना तर रस्त्याच्या दुतर्फा लोकही नव्हते. कळंबा येथे जाहीर सभा झाली, त्यावेळी झालेली कार्यकर्त्यांची गर्दी वगळता शहरात या यात्रेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

पूर्वनियोजित वेळेपेक्षा लवकर यात्रा सुरू झाल्याने कार्यकर्ते ठरलेल्या ठिकाणी वेळेत पोहचले नसल्याचा दावा काही भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मात्र केला. जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता आहे, शहराचा काही भाग असलेल्या कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजपाचे आमदार आहेत तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हेही या शहराचे रहिवाशी आहेत. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीसह विविध समित्यावर भाजापाने शहरातील अनेकांना संधी दिली आहे. महापालिकेतही भाजपाचे लक्षवेधी नगरसेवक आहे. एवढी ताकद असूनही यात्रेला मात्र हवी तेवढी गर्दी पहायला मिळाली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com